सौंदर्यामुळे गमवावी लागली नोकरी?
By admin | Published: March 4, 2017 04:46 AM2017-03-04T04:46:32+5:302017-03-04T04:46:32+5:30
सुंदर असल्यामुळे एखाद्या महिलेच्या करिअरमध्ये अडचण निर्माण होऊ शकते काय?
लंडन : सुंदर असल्यामुळे एखाद्या महिलेच्या करिअरमध्ये अडचण निर्माण होऊ शकते काय? या तरुणीची कथा ऐकल्यानंतर तर होऊ शकते, असेच वाटते. लंडनमध्ये टीव्ही चॅनेलसाठी काम करणारी एक तरुणी खूपच सुंदर असल्यामुळे तिला नोकरीवरून काढण्यात आले. आता तुम्हाला वाटेल की, टीव्हीवर तर सुंदर मुलींनाच मागणी असते. मग असे का झाले? २४ वर्षांची एमा हल्से युनिटी टीव्ही या निर्मिती संस्थेत काम करीत होती. तिला तेथे फ्रिलान्सर रनर म्हणून नोकरी मिळाली होती. मात्र, काम सुरू केल्यानंतर अवघ्या पाच मिनिटांत तिला कामावरून काढून टाकण्यात आले. आपण सुंदर दिसतो, त्यामुळे कंपनीने आपल्याला नोकरीवरून काढले, असा आरोप एमाने केला. मॅनेजरने तिला टीव्हीत नोकरी करण्याऐवजी मॉडेलिंग करण्याचा सल्ला देऊन तिला ड्रिंकसाठी घरी आमंत्रित केले. मात्र, एमा प्रचंड निराश झाली. मी कार्यालयात कोणतेही आक्षेपार्ह कपडे घातले नव्हते. तरीही मला नोकरीवरून काढण्यात आले. दुसरीकडे कंपनीने असे काही घडले नसल्याचे म्हटले. तथापि, एमाला नोकरीवरून काढणाऱ्या मॅनेजरचेही काम तेव्हापासून थांबविण्यात आले आहे.