उत्तर कोरियाचा हल्ला परतवण्यास अमेरिकेची Anti missile सिस्टिम सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2017 10:58 AM2017-05-02T10:58:56+5:302017-05-02T10:58:56+5:30
उत्तरकोरियाकडून सातत्याने अणू चाचणी आणि क्षेपणास्त्र चाचणीच्या धमक्या दिल्या जात आहेत. उत्तरकोरियावर दबाव वाढवण्यासाठी अमेरिकेने...
Next
ऑनलाइन लोकमत
सेऊल, दि. 2 - उत्तरकोरिया आणि अमेरिकेमध्ये सातत्याने तणाव वाढत असताना अमेरिकेची "थाड" ही क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणा सज्ज झाली आहे. अमेरिकेने दक्षिणकोरियामध्ये थाड यंत्रणा कार्यान्वित केली असून, उत्तरकोरियाचा कुठलाही क्षेपणास्त्र हल्ला परतवून लावण्यास ही यंत्रणा सक्षम असल्याचे अमेरिकन लष्कराने म्हटले आहे. अमेरिकेची थाड यंत्रणा कार्यान्वित झाली असली तरी, ही क्षेपणास्त्र विरोधी यंत्रणा पूर्ण क्षमतेने काम करण्यास अजून काही महिने लागतील अशी माहिती आहे.
उत्तरकोरियाकडून सातत्याने अणू चाचणी आणि क्षेपणास्त्र चाचणीच्या धमक्या दिल्या जात आहेत. उत्तरकोरियावर दबाव वाढवण्यासाठी अमेरिकेने आपली युद्धजहाजे आणि पाणबुडया कोरिया जवळच्या समुद्रात तैनात केल्या आहेत. सोमवारी अमेरिका आणि दक्षिण कोरियाच्या हवाई दलाने संयुक्त युद्ध सराव केला.
सीऑनग्जुमध्ये अमेरिकेने थाड यंत्रणा तैनात केली असली तरी, तिथल्या स्थानिकांनी मात्र या विरोधात निदर्शने केली. अमेरिकेच्या मिसाईल सिस्टीममुळे इथेच संभाव्य हल्ला होईल त्यामुळे आपण धोक्यात येऊ असे इथल्या स्थानिकांचे मत आहे. या सिस्टीमच्या रडार रेंजमध्ये चीन लष्कराच्याही हालचाली येत असल्याने चीननेही थाडच्या तैनातील विरोध केला आहे.
उत्तर कोरियाने कोणत्याही क्षणी कोणत्याही स्थळी अणुचाचणी घेण्याचा इशारा दिल्याने कोरिया खंडात आधीच वाढलेल्या तणावात भर पडली असताना अमेरिकेने प्रत्युत्तरात लष्करी कारवाईची शक्यता नाकारलेली नाही. उत्तर कोरिया लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राच्या किंवा सहाव्या अणुचाचणीच्या तयारीत असल्याच्या वृत्तानंतर गेल्या काही आठवड्यांपासून तणाव वाढत आहे.
अमेरिकेने केलेल्या कारवाईच्या प्रत्युत्तरात कोणताही पर्याय निवडण्याची आमची पूर्ण तयारी आहे, असे उत्तर कोरियाच्या विदेश मंत्रालयाच्या प्रवक्त्याने प्याँगयांग येथे म्हटले. अमेरिकेने वैमनस्याचे धोरण रद्द न केल्यास अणुहल्ल्याच्या क्षमतेची चाचपणी केली जाईल, असे उत्तर कोरियाच्या केसीएनए या वृत्तसंस्थेने जारी केलेल्या निवेदनात म्हटले.