कझाकिस्तानमध्ये मोदी आणि नवाज शरीफ यांची भेट ?

By admin | Published: June 9, 2017 12:24 AM2017-06-09T00:24:34+5:302017-06-09T07:31:50+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यात कझाकिस्तानमध्ये भेट झाल्याची चर्चा आहे.

Modi and Nawaz Sharif meet in Kazakhstan? | कझाकिस्तानमध्ये मोदी आणि नवाज शरीफ यांची भेट ?

कझाकिस्तानमध्ये मोदी आणि नवाज शरीफ यांची भेट ?

Next

ऑनलाइन लोकमत
अस्ताना, दि. 9 - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यात कझाकिस्तानमध्ये भेट झाल्याची चर्चा आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, शांघाई को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन(SCO)शिखर संमेलनाच्या आधी दोन्ही नेत्यांनी लीडर्स लाऊंजमध्ये एकमेकांना अभिवादन केलं.

मात्र दोन्ही नेत्यांची भेट झाल्याची अधिकृत माहिती अद्याप समोर आली नाही. पाकचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यावरील खुल्या शस्त्रक्रियेनंतरची दोन्ही नेत्यांमधली ही पहिली भेट असल्याची चर्चा आहे. यावेळी मोदींनी नवाज शरीफ यांच्याकडे त्यांच्या तब्येतीबाबतही विचारपूस केल्याची माहिती आहे. तसेच त्यांच्या कुटुंबीयांबाबतही विचारणा केली. मात्र मोदींसोबत नवाज शरीफ यांच्या भेटीवरून अनेक तर्कवितर्क लढवले जात आहे. दोन्ही नेत्यांमध्ये कोणतीही औपचारिक भेट होणार नसल्याचं बोललं जात होतं. काल दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्रालयांनी दोन्ही नेत्यांमध्ये कोणत्याही भेटीचं शेड्युल ठरलं नसल्याचं स्पष्ट केलं होतं. 2015च्या ब्रिक्स आणि एससीओच्या बैठकीत मोदी आणि शरीफ यांची भेट झाली होती. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय करारांवरही सहमती झाली होती.

मात्र 2016मध्ये झालेल्या पठाणकोट हल्ल्यानंतर परिस्थिती बिघडली. दोन्ही देशांमध्ये कटुता आली. 2016च्या जुलैमध्येही पुन्हा एकदा नवाज शरीफ आणि मोदी शांघाई सहयोग संघटनेच्या बैठकीत आमने-सामने आले होते. मात्र त्यावेळीही दोघांमध्ये चर्चा झाली नाही. मात्र आताची परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. अस्तानामध्ये मोदी आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्यातही भेट होण्याची शक्यता आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिका-यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच मोदींनी सीमेबाबत केलेल्या वक्तव्याला चीनने समर्थन दिलं आहे. चीनच्या सीमा वादावर मोदींनी सांगितलं होतं की, दोन्ही देशांमध्ये 40 वर्षांत एकदाही गोळी चालली नाही. चीन आणि भारतामधील मतभेदाची प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले होते. चीनच्या महत्त्वाकांक्षी वन बेल्ट वन रोड प्रोजेक्टमध्ये भारतानं सहभाग न घेतल्यानं चीनचा तीळपापड झाला होता. तसेच धर्मगुरू दलाई लामा यांच्या भारत भेटीवरूनही चीननं आगपाखड केली होती. चीननं भारताला अणु पुरवठादार गटात सहभागी करून घेण्यासही विरोध दर्शवला होता. 

Web Title: Modi and Nawaz Sharif meet in Kazakhstan?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.