लंडनमध्ये अग्नितांडव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2017 04:00 AM2017-06-15T04:00:04+5:302017-06-15T04:00:04+5:30
लंडनमध्ये २४ मजली निवासी संकुलाच्या इमारतीला बुधवारी लागलेल्या अतिशय भीषण अशा आगीत १२ जण ठार, तर ७४ जण जखमी झाल्याचे जाहीर झाले असले, तरी मृतांची
लंडन : लंडनमध्ये २४ मजली निवासी संकुलाच्या इमारतीला बुधवारी लागलेल्या अतिशय भीषण अशा आगीत १२ जण ठार, तर ७४ जण जखमी झाल्याचे जाहीर झाले असले, तरी मृतांची संख्या खूपच मोठी असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. जखमींपैकी २० जणांची प्रकृती चिंताजनक आहे. इंग्लडमध्ये गेल्या तीन दशकांतील आगीची ही सर्वात भीषण घटना आहे.
लँकेस्टर वेस्ट इस्टेटमधील लॅटिमेर रस्त्यावरील ग्रेनफेल टॉवरला स्थानिक वेळेनुसार पहाटे १.१६ मिनिटांनी आग लागली.
ही २४ मजली इमारत सध्याही आगीने वेढलेली असून ती कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आत जाऊ न आग विझविणे आणि अडकलेल्यांना बाहेर काढणे अग्निशामक दलाचे जवान आणि पोलीस यांना शक्य झालेले नाही.. सुमारे २०० अग्निशामक, ४० फायर ट्रक्स, २० रुग्णवाहिका घटनास्थळी उपस्थित होत्या. या इमारतीला नवे रूप देणे व नूतनीकरणावर १०.३ दशलक्ष पौंड खर्च करण्यात आले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
अग्निशामक दलांनी अनेक लोकांना वाचवले. लोक जळत्या इमारतीत मदतीसाठी किंचाळत होते आणि आमच्या मुलांना वाचवा, असे ओरडताना दिसत होते. काही रहिवासी इमारतीतून बाहेर पडण्यासाठी चादरींचा वापर करताना दिसले.
बाळ झेलले
अग्निशमन दलाचे कर्मचारी आग विझवण्यात गुंतलेले असताना नवव्या मजल्याच्या खिडकीतून खाली सोडलेले बाळ लोकांनी झेलले.
सर्वात मोठी आग
माझ्या २९ वर्षांच्या सेवेत अशी भीषण आग मी कधी बघितली नाही, असे लंडन अग्निशमन तुकडीचे प्रमुख डॅनी कॉटन म्हणाले. तिसऱ्या किंवा चौथ्या मजल्यावरील सदोष रेफ्रीजरेटरमुळे मध्यरात्री आग लागल्याचे सांगितले जाते. तिने फ्लॅटमागून फ्लॅट नष्ट केले. मात्र पोलिसांनी आगीचे नेमके कारण स्पष्ट व्हायला काही वेळ लागेल, असे म्हटले जात आहे.