नरेंद्र मोदींच्या भेटीसाठी बेने इस्रायली समुदाय उत्सुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2017 05:30 PM2017-07-01T17:30:56+5:302017-07-01T17:30:56+5:30

पंतप्रधान मोदींची ही भेट नक्कीच ऐतिहासिक म्हणावी लागेल. त्यांना भारतीय ज्यूंबद्दल भरपूर माहिती असून या समुदायप्रती सहानुभूतीही आहे.

The Israeli community is eager to meet Narendra Modi | नरेंद्र मोदींच्या भेटीसाठी बेने इस्रायली समुदाय उत्सुक

नरेंद्र मोदींच्या भेटीसाठी बेने इस्रायली समुदाय उत्सुक

Next
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
एलियाझ दांडेकर (तेल अविव), दि.1- बेने इस्रायली समुदाय हा भारतातून इस्रायलमध्ये आलेल्या पाच ज्यू समुदायांपैकी एक आहे. बेने इस्रायलींसह कोचीनी, बगदादी, बेने मनाशे, बेने एफ्राइम हे भारतातून आलेले ज्यू समुदाय इस्रायलमध्ये राहतात. बेने इस्रायली समुदाय दोन हजार वर्षांपासून कोकण किनारपट्टीवर राहात होता. 18 व्या शतकामध्ये हा समुदाय सर्व भारतभर पसरला. या समुदायाने विविध काळामध्ये भारताच्या विकासात योगदान दिले आहे. भारताच्या स्वातंत्र्यासाठी चाललेल्या आंदोलनामध्येही बेने इस्रायलींनी सहभाग घेतला होता. उदाहरणच द्यायचे झाले तर महात्मा गांधींचे वकिल आणि डॉक्टर दोघेही या समुदायाचेच सदस्य आणि दोघेही एरुलकर कुटुंबातील होते. 
 
19 व्या शतकाच्या शेवटी ज्यूं लोकांची पितृभूमी असलेल्या भूभागावर म्हणजेच तेव्हाच्या एरेत्झ इस्रायल आणि पॅलेस्टाइनवर जगभरातल्या ज्यूंना बोलवण्यास सुरुवात झाली. त्यानुसार भारतीय ज्यू देखिल इस्रायलला येऊ लागले. ब्रिटीश लष्कराने पहिल्या महायुद्धात ऑटोमन साम्राज्याकडून आजच्या जेरुसलेमची भूमी मिळवली तेव्हाही त्या लष्करामध्ये बेने इस्रायली लोकांचा समावेश होता. 1930 पासून भारतीय ज्यूंचा इस्रायलकडे येण्याचा ओघ वाढला. 1947 साली दुसऱ्या महायुद्धात लढलेल्या 50 बेने इस्रायली ज्यूंनी इस्रायली स्वातंत्र्ययुद्धातही सहभाग घेतला. त्यातील अनेकांना वीरमरण आले. इस्रायलची निर्मिती झाल्यावर सर्व ज्यूंनी हजारो वर्षे केलेली प्रार्थना फळास आली आणि त्यांना त्यांचे राज्य मिळाले. 1949 साली भारतीय ज्यूंना घेऊन येणारे पहिले विमान इस्रायलला उतरले त्यानंतर 1950 साली दुसरे विमानही आले. 1948 साली 30,000 ज्यू असणाऱ्या भारतामध्ये आज केवळ 4 हजार ज्यू उरले आहेत. सुरुवातीच्या काळात बेने इस्रायली समुदायाला इस्रायलमध्ये मोठ्या आव्हानांचा , अडथळ्यांचा सामना करावा लागला. आज इस्रायलमध्ये 1 लाख भारतीय ज्यू राहतात. 
 
1992 साली भारत आणि इस्रायल यांच्यामध्ये मुत्सद्दी पातळीवरचे संबंध प्रस्थापित झाले, त्यापुर्वीही दोन्ही देशांमध्ये संबंध होतेच. आज इस्रायल आणि भारत यांचे विज्ञान, शेती, पर्यटन, व्यापार, संरक्षण, तंत्रज्ञान यांमधील संबंध अत्यंत चांगल्या स्थितीत आहेत आणि ते अधिकाधिक बळकट होत आहेत. 2015 साली भारताचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी इस्रायलच्या भेटीवर आले असता त्यांनी बेने इस्रायली समुदायाची भेट घेतली, त्यावेळेस त्यांना भेटण्याची संधी मला मिळाली होती. त्यानंतर दोन्ही देशांच्या नेत्यांनी या संबंधांना बळकटी आणण्यास प्रयत्न केले. मागील वर्षी इस्रायलचे राष्ट्रपती रियुविन रिवलीन यांनी भारताचा दौरा केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनी सर्वप्रथम न्यू यॉर्कमध्ये भेट घेतली तेव्हा माध्यमांनी त्याकडे सर्वांचे लक्ष वेधले. इतर कोणत्याही दोन नेत्यांच्या भेटीपेक्षा या भेटीला सर्वात जास्त प्रसिद्धी मिळाली होती आणि त्यावर चर्चाही झाली होती. आता पंतप्रधान मोदी इस्रायलच्या भेटीवर येणार आहेत. इस्रायलला भेट देणारे पहिलेच भारतीय पंतप्रधान होणार आहेत. 5 जुलै रोजी ते येथे राहणाऱ्या ज्यू समुदायाचीही भेट घेणार आहेत. भारताचे इस्रायलमधील राजदूत पवन कपूर आणि त्यांचे सहकारी एलदोस पुनुसू यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात अनेक पुस्तकांचे प्रकाशन होणार आहे. येथील इतिहास अभ्यासक एलाना शाजोर (सोगावकर) आणि मी लिहिलेल्या मदर इंडिया, फादर इस्रायल तसेच निस्सिम मोझेस तळकर यांनी लिहिलेल्या द बेने इस्राएल तसेच मी लिहिलेल्या द डिफरंट ब्रॅंच या पुस्तकाचा या प्रकाशन सोहळ्यात समावेश आहे. पंतप्रधान मोदींची ही भेट नक्कीच ऐतिहासिक म्हणावी लागेल. त्यांना भारतीय ज्यूंबद्दल भरपूर माहिती असून या समुदायप्रती सहानुभूतीही आहे. महाराष्ट्र राज्याने ज्यूंना अल्पसंख्यांक दर्जा देण्याच्या निर्णयाचेही आम्ही स्वागत करतो. या भेटीमुळे दोन्ही देशांच्या व्हीसा प्रक्रियेत थोडी सुलभता येईल अशी आमची अपेक्षा आहे.
 
(एलियाझ दांडेकर तेल अविवजवळ ओर अकिवा येथे राहतात, बेने इस्रायली समुदायाच्या इतिहासावर त्यांनी विपुल लेखन केले असून त्यांची दोन पुस्तके प्रसिद्ध झालेली आहेत.)
 

Web Title: The Israeli community is eager to meet Narendra Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.