चीनची ऎतिहासिक सैन्यकपात, हा आहे ड्रॅगनचा नवा प्लॅन
By Admin | Published: July 12, 2017 04:38 PM2017-07-12T16:38:48+5:302017-07-12T17:07:15+5:30
जगातील सर्वात मोठी सैन्यांची फौज असणाऱ्या चीननं आपले सैन्य कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. 1980 पर्यंत सैनिकांची संख्या 45 लाख होती
ऑनलाइन लोकमत
बीजिंग, दि. 12 - जगातील सर्वात मोठी सैन्यांची फौज असणाऱ्या चीननं आपले सैन्य कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. 1980 पर्यंत सैनिकांची संख्या 45 लाख होती. 1985 मध्ये ही संख्या 30 लाखांवर आणण्यात आली. आता ती 23 लाखांवर आली आहे.
23 लाखांचे विशाल सैन्य असलेल्या चीननं 13 लाखांपेक्षा अधिक सैनिकांना घरचा रस्ता दाखवण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त स्थानिक माध्यमांनी दिले आहे. चीन सरकारचे अधिकृत वृत्तपत्र असलेल्या पीएलए डेलीने याबद्दलचे वृत्त दिले आहे. पीएलए डेलीने दिलेल्या वृत्तानुसार चीन सरकारने आपली सैन्यक्षमता 10 लाखांपर्यंत करण्याचा निर्णय घेतला आहे.
चीन सरकारने आपल्या सैन्यांची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये त्यांनी आपल्या सैन्यांची संख्या कमी करुन स्ट्रॅटजिक सपोर्ट फोर्स, नौदल, रॉकेट फोर्समधील सैन्याचे प्रमाण वाढवले जाणार आहे. तर चिनी हवाई दलातील सैनिकांची संख्या पूर्वी इतकीच ठेवण्यात आली आहे.
सोशल साईट असलेल्या वी चॅटवर पीएलए डेली वृत्तपत्राचे खाते असलेल्या जुन झेंगपिंग स्टुडिओवर सैन्याने ढाचा सुधारण्यासंदर्भात एक लेख लिहिला आहे. सुधारणांनंतर विशाल सैन्य क्षमता असलेल्या ढाच्यात बदल करण्यात येतील. चीनच्या सामारिक गरजा लक्षात घेऊन सैन्याच्या ढाच्यात बदल केले जाणार आहेत, असे लेखात म्हटले आहे. याआधी चीनकडून जमिनीवर केले जाणारे युद्ध आणि अंतर्गत सुरक्षा या मुद्यांकडे लक्ष केंद्रीत केले जात होते. मात्र आता यामध्ये मुलभूत बदल केले जाणार असल्याचे या लेखात म्हटले आहे.
याआधी 2015 मध्ये तीन लाखांनी सैन्यांची कपात करण्यात येणार असल्याची घोषणा चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी केली होती. चिनी संरक्षण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार 2013 मध्ये सैन्यात 8.50 लाख युद्ध सैनिक होते. मात्र सध्या चिनी सैन्याचा नेमका आकडा किती, याची अधिकृत माहिती उपलब्ध नाही.