१६२ प्रवाशांसह विमान बेपत्ता!

By admin | Published: December 29, 2014 06:09 AM2014-12-29T06:09:44+5:302014-12-29T06:09:44+5:30

एअर एशियाचे इंडोनेशियातील सुराबायाहून सिंगापूरला जाणारे विमान १६२ प्रवाशांसह बेपत्ता झाले. त्यानंतर ११ तासांच्या अथक शोधानंतरही त्याचा कसलाही मागमूस लागलेला नाही

162 passengers missing plane! | १६२ प्रवाशांसह विमान बेपत्ता!

१६२ प्रवाशांसह विमान बेपत्ता!

Next

जकार्ता - सिंगापूर : एअर एशियाचे इंडोनेशियातील सुराबायाहून सिंगापूरला जाणारे विमान १६२ प्रवाशांसह बेपत्ता झाले. त्यानंतर ११ तासांच्या अथक शोधानंतरही त्याचा कसलाही मागमूस लागलेला नाही. प्रवाशांत १६ लहान मुले व नवजात अर्भक यांचा समावेश आहे. मलेशियन एअर लाइन्सच्या बेपत्ता विमानाचे गूढ कायम असतानाच झालेल्या या नव्या अपघाताने जगाला हादरवून टाकले असून, या वर्षात झालेला हा तिसरा मोठा विमान अपघात आहे. या विमानात भारतीय प्रवासी नव्हते, अशी प्राथमिक माहिती आहे.
सुराबायाहून पहाटे ५.२० वाजता निघालेले हे विमान सकाळी ८.३० वाजता सिंगापूरच्या चांगी विमानतळावर उतरणार होते. विमानाने उड्डाण करून ४२ मिनिटे झाली तेव्हा खराब हवामानामुळे या विमानाच्या वैमानिकाने मार्ग बदलण्याची परवानगी मागितली होती. मात्र नंतर त्याचा संपर्क तुटला. या अपघातात कोणीही वाचले असण्याची शक्यता मावळत असून एअरबस ३२०-२०० या विमानाचा शोध घेण्यासाठी जोरदार मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी इंडोनेशियाने दोन लष्करी विमाने तैनात केली आहेत. अंधार व
खराब हवामानामुळे रविवारी सायंकाळी शोधमोहीम बंद करण्यात आली. काही जहाजे रात्रीही शोध घेत राहिली, पण सर्वंकष शोधमोहीम पुन्हा सोमवारी सकाळी सुरू होईल. एअर एशिया ही इंडोनेशियन हवाई कंपनी असून, अपघातग्रस्त विमानात १५५ प्रवासी व ७ कर्मचारी होते.
इंडोनेशियाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या विमानातील इंधन कधीच संपले असावे. विमानाबाबत अनेक वृत्ते येत आहेत, पण त्याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. हे विमान सुमात्रा बेटाच्या पूर्व किनारपट्टीजवळ बालितुंग येथे कोसळले. या अपघाताचे नक्की स्थान कळलेले नाही, असे वृत्त प्रसारित होत असले तरी त्यास अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. मलेशियाचे वाहतूकमंत्री लिओ तियांग लाई यांनी विमानाचे अवशेष सापडले नसल्याचे स्पष्ट केले आहे. विमान बालितुंगजवळ पडल्याचे वृत्त निराधार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. (वृत्तसंस्था)

एअर एशियाचा लोगो करडा
एअर एशियाचे विमान क्यूझेड ८५०१ हे बेपत्ता झाल्यानंतर एअर एशियाने टिष्ट्वटर व फेसबुकवरील लोगोचा रंग बदलून करडा केला आहे.

बेपत्ता विमानाला मार्ग बदलण्याच्या सूचना
ढगांचा धोका टाळण्यासाठी विमानाला ३८ हजार फुटांवरून उडण्याचा सल्ला दिला होता. पण मार्ग बदलल्यानंतर विमानाने धोक्याचे सिग्नल दिले नाहीत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

ते बचावले : सुराबाया येथील एक रहिवासी अरिपुट्रो कयोनो हे आपल्या नऊ जणांच्या कुटुंबासह या विमानाने प्रवास करणार होते. मात्र त्यांचे विमान चुकल्याने ते बचावले. विमानाची वेळ ७.२० ची ५.२० झाल्याचे त्यांना माहीत नव्हते.

निवेदन : एअर एशियाच्या फेसबुक पानावर कंपनीने निवेदन प्रसिद्ध केले आहे. फ्लाईट क्रमांक क्यूझेड ८५०१ सुराबाया ते सिंगापूरचा एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क तुटला आहे. आता यासंदर्भात आम्हाला दुर्दैवाने काहीही माहिती नाही. जशी माहिती मिळेल तसतशी ती आम्ही संबंधितांना देऊ, असे म्हटले आहे.

दावा : हवामान खराब होते म्हणून वैमानिकाने मार्ग बदलला, असे एअर एशियाने म्हटले आहे. इंडोनेशियाच्या एटीसीने दिलेल्या माहितीनुसार, ढगांचा अडथळा टाळण्यासाठी ३२ हजार फुटांवरून ३८ हजार फुटांवर जाण्याची परवानगी वैमानिकाने मागितली होती. पण वादळी हवामान असल्याने ५० हजार फुटांपर्यंत ढग होते.

Web Title: 162 passengers missing plane!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.