स्वच्छतागृहांचा अभाव, तुटलेल्या खिडक्या, दरवाजे
By admin | Published: December 9, 2015 12:16 AM2015-12-09T00:16:08+5:302015-12-09T00:16:08+5:30
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळांतील विविध समस्या सोडविण्यासाठी शिक्षण मंडळाचे सभापती चेतन घुले, उपसभापती नाना शिवले यांच्यासह सदस्य व अधिकाऱ्यांच्या संयुक्त शाळा
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळांतील विविध समस्या सोडविण्यासाठी शिक्षण मंडळाचे सभापती चेतन घुले, उपसभापती नाना शिवले यांच्यासह सदस्य व अधिकाऱ्यांच्या संयुक्त शाळा पाहणी दौऱ्याला आजपासून सुरुवात झाली. शाळा इमारतींचे बांधकाम झाल्यापासून फरश्या बदललेल्या नाहीत. तुटलेले दरवाजे, फुटलेल्या फळ्या, स्वच्छतागृहांची दुरवस्था, कमी संख्या, वर्गांच्या खिडक्यांना जाळया नसणे आणि मैदानांची दुरवस्था झाल्याचे पाहायला मिळाले.
पहिल्या दिवशी १४ शाळांची पाहणी झाली. त्यामध्ये आढळलेल्या समस्या दूर करण्यासाठी लगेच दुसऱ्या दिवसापासून कामे हाती घेण्यात येणार आहेत. महापालिका शाळांतील प्रश्नाबाबत पाहणी करावी, अशी मागणी शिक्षण मंडळाने केली होती. सुरुवातीला घुले, शिवले यांनी निवडक शाळांची पाहणी केली होती. त्यामध्ये अनेक शाळांची दुरवस्था झाल्याचे चित्र समोर आले. सार्वजनिक आरोग्य आणि स्वच्छतेचा अभाव, स्थापत्य, पाणीपुरवठा, विद्युत विभागाकडून होणारे दुर्लक्ष याकडे मंडळाने लक्ष वेधले होते. आयुक्तांबरोबर बैठक घेऊन संयुक्त बैठकीची मागणी केली होती. संबंधित शाळांचे मुख्याध्यापक लेखी तक्रार करूनही स्थापत्य, पाणीपुरवठा, विद्युत व अन्य विभागांचे अधिकारी दखल घेत नसल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार लवकरच शाळांची पाहणी करू, असे आश्वासन आयुक्तांनी दिले होते. त्यानुसार सदस्य व अधिकारी यांच्या संयुक्त पाहणी दौऱ्यास आजपासून सुरुवात झाली. यात सदस्य फजल शेख, सदस्य निवृत्ती शिंदे, विष्णू नेवाळे, विजय लोखंडे, सविता खुळे, लता ओव्हाळ, धनंजय भालेकर, श्याम आगरवाल, चेतन भुजबळ, शिरीष जाधव आणि स्थापत्य, विद्युत आणि पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता व उपअभियंता यांनी खराळवाडी, संत तुकारामनगर आणि नेहरुनगरातील शाळांची पाहणी केली.
मुख्याध्यापकांनीही अधिकाऱ्यांसमोर समस्यांची यादीच सादर केली. पाहणीत आढळलेल्या सर्व समस्यांची अधिकाऱ्यांनी
लेखी नोंद घेतली आहे.
बुधवारपासून शाळांतील किरकोळ समस्या तातडीने दूर करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे.(प्रतिनिधी)