पवनेतील गाळ काढण्यास अखेर सुरुवात
By admin | Published: May 10, 2016 12:39 AM2016-05-10T00:39:29+5:302016-05-10T00:39:29+5:30
दुष्काळग्रस्त परिस्थिती आणि वाढते तापमान, त्याचबरोबर गेल्या वर्षी तुलनेने कमी झालेला पाऊस यामुळे पवना धरणातील पाण्याचा साठा प्रथमच कमी झाला आहे.
पवनानगर : दुष्काळग्रस्त परिस्थिती आणि वाढते तापमान, त्याचबरोबर गेल्या वर्षी तुलनेने कमी झालेला पाऊस यामुळे पवना धरणातील पाण्याचा साठा प्रथमच कमी झाला आहे. भविष्यात तो आणखी कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सद्य:स्थितीला या धरणामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. अनेक वर्षांपासून धरणातील गाळ काढला नसल्याने सध्या धरणातील पाणीसाठ्याची क्षमता कमी होत चालली आहे. हा गाळ काढण्यास सोमवारी सुरुवात झाली.
गेल्या ४५ वर्षांत पवना धरणातील पाणीसाठा प्रथमच घटला असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने ठळकपणे दिले होते. त्याची दखल घेत प्रशासन खडबडून जागे झाले. त्यांची दखल घेत जिल्हाधिकारी, तसेच पाटबंधारे, पिंपरी-चिंचवड महापालिका अधिकाऱ्यांनी धरणात जाऊन पाहणी केली. पवना धरण परिसरात गाळ काढण्यास सोमवारी प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली. या वेळी खासदार श्रीरंग बारणे, पिंपरी-चिंचवड महापालिका, पाटबंधारे विभागाचे अधिकारी, तसेच महसूल विभागाचे अधिकारी व स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.
गाळ काढण्यासाठी बारणे यांनी त्यांच्या खासदार स्थानिक विकास निधीतून १० लाख रुपये निधी पुणे जिल्हाधिकारी यांच्याकडे दिला आहे. गाळ काढण्याची मोठी जबाबदारी पिंपरी-चिंचवड महापालिकेची आहे. या संदर्भात आयुक्त दिनेश वाघमारे यांना माहिती देण्यात आली आहे. यासाठी विशेष तरतूद करण्याची मागणी केली.
पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणारा पवना धरण हा एकमेव स्रोत आहे. गेल्या ५० वर्षांत पवना धरणातील गाळ काढला नाही. साचलेला गाळ काढण्याची जबाबदारी संपूर्णपणे राज्य शासन व महापालिकेची आहे. सध्या पावसाळा सुरू होण्यास काही अवधी असल्याकारणाने आतापासून सुरुवात केल्यास पाण्याचा साठा काही प्रमाणात पुढील वर्षासाठी वाढेल. परंतु धरण भागातील पाण्याचा साठा कमी झाल्यानंतर प्रत्येक वर्षी गाळ काढण्याची प्रक्रिया सुरू ठेवल्यास पवना धरणातील पाण्याचा साठा कायमस्वरूपी वाढेल व जास्तीत जास्त पाणी उपलब्ध होईल. गाळ काढण्याच्या या प्रक्रियेमध्ये सामाजिक संस्था, स्थानिक
बांधकाम व्यावसायिक, उद्योजक यांनी सहभागी होऊन स्थानिक शेतकऱ्यांना गाळ काढण्यासाठी यंत्रसामग्री पुरविल्यास कमी वेळेत मोठ्या क्षमतेने पवना धरण पात्रातील गाळ काढला जाऊ शकतो.(वार्ताहर)