सिग्नलची वेळच ठरतेय कर्दनकाळ

By admin | Published: August 22, 2015 02:12 AM2015-08-22T02:12:56+5:302015-08-22T02:12:56+5:30

अत्यंत वर्दळीच्या पुणे -मुंबई महामार्गाला जोडणारे अंतर्गत रस्ते यामुळे निगडी भक्ती-शक्ती चौकात शहरातील सर्वांत मोठे वाहतूक बेट तयार झाले आहे

The timing of the signal is fixed | सिग्नलची वेळच ठरतेय कर्दनकाळ

सिग्नलची वेळच ठरतेय कर्दनकाळ

Next

संजय माने, पिंपरी
अत्यंत वर्दळीच्या पुणे -मुंबई महामार्गाला जोडणारे अंतर्गत रस्ते यामुळे निगडी भक्ती-शक्ती चौकात शहरातील सर्वांत मोठे वाहतूक बेट तयार झाले आहे. सिग्नलचा चुकीचा टायमर, एकाच वेळी चारही बाजूंनी जमा होणारी वाहने यांमुळे वाहनचालक संभ्रमात पडतात. वाहतूक नियमांचे पालन करण्याची इच्छा असूनही संभ्रमात पडणाऱ्या वाहनचालकांमुळे या चौकात अपघात घडू लागले आहेत. बुधवारी दुचाकीवरून जाणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा बळी गेला. अशा घटना यापूर्वीही घडल्या असून, त्यावर नियंत्रण आणण्यासाठी वाहतूक व्यवस्थेतीतील त्रुटी दूर होणे आवश्यक असल्याचे मत नागरिकांनी नोंदविले आहे.

शहरातील कोणत्याही मोठ्या चौकात किमान चार वाहतूक नियंत्रक दिवे असतात. निगडीतील भक्ती-शक्ती चौक त्यास अपवाद आहे. या ठिकाणी तब्बल आठ सिग्नल आहेत. पुणे- मुंबई महामार्गाने चिंचवडकडून देहूरोडच्या दिशेने जाणारी वाहने भक्ती-शक्ती चौकात सिग्नलला थांबतात.
या ठिकाणी एक सिग्नल उंचावर आहे. दुसरा समोर, परंतु थोडा दूर अंतरावर आहे. चिंचवडहून आलेल्या मोटारचालकांना उंचावरील सिग्नल दिसत नाही. समोरच्या सिग्नलचा हिरवा दिवा दिसताच, वाहनूे पुढे येतात. परंतु त्याचवेळी उंचावरील सिग्नलचा लाल दिवा लागलेला असतो.
उंचावरील की समोर दिसणाऱ्या सिग्नलचा दिवा महत्त्वाचा मानायचा, हेच वाहनचालकांना कळत नाही. काही वाहने पुढे निघून जातात. तर काही त्याच ठिकाणी थांबून राहतात. चिंचवडहून देहूरोडच्या दिशेने जाण्याच्या मार्गावरील हिरवा दिवा लागल्यानंतर या मार्गाने पुढे जाऊन काही वाहने वाहतूक बेटाला वळसा घेऊन यमुनानगरच्या दिशेने जातात. ती वाहने वाहतूक बेटाला वळसा घालण्याच्या पूर्वीच देहूरोडकडून पुण्याच्या दिशने जाण्याच्या मार्गावरील सिग्नल सुरू होतो. हिरवा दिवा दिसताच वाहने मार्गस्थ होतात. सिग्नलचे टायमर यंत्रणेचे चुकीचे सेटिंग असल्याने या चौकात वाहनचालकांची गोंधळाची स्थिती निर्माण होते. थांबायचे का जायचे, हेच कळत नाही. त्यात अपघात घडू लागले आहेत.
निगडी चौकात वरच्या बाजूला प्राधिकरणात जाण्यासाठी रस्ता आहे. तसेच, पुढे जाऊन वळण घेतल्यास ट्रान्सपोर्टनगरीकडे जाता येते. मुंबईहून, तसेच ट्रान्सपोर्टनगरीतून बाहेर पडणारी वाहने वाहतूक बेटाजवळून पुण्याकडे मार्गस्थ होतात. त्यामध्ये मोठे कंटेनर आणि अवजड वाहनांचा समावेश असतो. मोठी अवजड वाहने वाहतूक बेटाला वळसा पूर्ण करण्याअगोदरच सिग्नलची वेळ संपते. वळण घेताना अवजड वाहने रस्ता व्यापून टाकतात. तेवढ्यात दुसऱ्या बाजूची वाहतूक सुरू होते.

निगडी चौकात मोठ्या प्रमाणावर वाहतूक, तसेच वर्दळ असताना वाहतूक नियोजनासाठी पोलिसांची मात्र कमतरता जाणवते. उपलब्ध वाहतूक पोलीस आणि कर्मचारीही या चौकात लक्ष देण्याऐवजी भक्ती-शक्ती उद्यान परिसरात लावण्यात येणाऱ्या वाहनचालकांना हटकण्यात, त्यांची वाहने उचलण्यात आणि त्यांच्याकडून पैसे उकळण्यात व्यस्त असतात. दर दहा मिनिटाला वाहतूक पोलिसांचे वाहन उचलण्याचे पथक या परिसरात घिरट्या मारताना दिसून येते. हातगाड्या, टपऱ्यांच्या बाजूला दुचाकी लावली की, लगेच उचलून न्यायची, वाहनचालक शोध घेत आल्यास त्याच्याकडून पैसे उकळायचे, दंडाची पावती फाडायची. यामध्ये उपलब्ध स्टाफ कायम व्यस्त असतो. हे काम वाहतूक बेटाजवळील वाहतूक नियंत्रणापेक्षा फायद्याचे असल्याने त्याच कामाला प्राधान्य दिले जात असल्याने अपघाताच्या घटनांवर नियंत्रण आणणे शक्य होत नाही.

Web Title: The timing of the signal is fixed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.