कर चुकविण्यासाठी हद्दीबाहेर पासिंग
By admin | Published: September 1, 2015 04:04 AM2015-09-01T04:04:05+5:302015-09-01T04:04:05+5:30
स्थानिक संस्था कर चुकविण्यासाठी महागडे वाहन खरेदी करणारे ग्राहक बनावट पत्ता देऊन महापालिका हद्दीबाहेर वाहनाची नोंदणी करीत आहेत.
पिंपरी : स्थानिक संस्था कर चुकविण्यासाठी महागडे वाहन खरेदी करणारे ग्राहक बनावट पत्ता देऊन महापालिका हद्दीबाहेर वाहनाची नोंदणी करीत आहेत. मात्र परिवहन अधिकारी रहिवासी पुराव्यांबाबत खात्री करण्याची तसदी घेत नाहीत. तसेच, महापालिकाही दुर्लक्ष करीत असल्याने पालिकेचे लाखो रुपयांचे उत्पन्न बुडत आहे.
महापालिकेकडून २०१३ पासून स्थानिक संस्था कर लागू करण्यात आला आहे. १ आॅगस्ट २०१५ पासून ५० लाखांच्या वर उत्पन्न असलेल्यांनाच एलबीटी लागू आहे. शहरातील महागड्या गाड्यांच्या शोरूममध्ये पिंपरी-चिंचवड हद्दीतील पत्ता दिल्यास साधारण तीन टक्के एलबीटी लागू होतो. हद्दीबाहेरचा पत्ता दिल्यास गाडीच्या किमतीत बराच फरक पडतो. त्यामुळे ग्राहक हद्दीबाहेरील बनावट पत्ते देऊन गाडी खरेदी करतात व महापालिकेचा महसूल बुडवतात. शहरातील गुंठामंत्री, उद्योजक यांच्यामध्ये सध्या १० लाखांपासून १ कोटी रुपयांपर्यंत आलिशान गाडी घेण्याची क्रेझ आहे. एलबीटी भरण्याची मात्र त्यांची इच्छा नसते. एलबीटी चुकवण्यासाठी ते पालिका हद्दीबाहेर राहत असल्याचा एखादा बनावट पुरावा देतात. (प्रतिनिधी)