‘स्मार्ट’साठी केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्र्यांना साकडे
By Admin | Published: September 1, 2015 04:05 AM2015-09-01T04:05:32+5:302015-09-01T04:05:32+5:30
‘स्मार्ट सिटी’ योजनेत पिंपरी-चिंचवड शहराचा समावेश व्हावा, या मागणीसाठी पिंपरी-चिंचवड शहर स्वाभिमान समितीच्या शिष्टमंडळाने सोमवारी पालकमंत्री
पिंपरी : ‘स्मार्ट सिटी’ योजनेत पिंपरी-चिंचवड शहराचा समावेश व्हावा, या मागणीसाठी पिंपरी-चिंचवड शहर स्वाभिमान समितीच्या शिष्टमंडळाने सोमवारी पालकमंत्री गिरीश बापट यांची भेट घेतली. शिष्टमंडळाने त्यांना निवेदन दिले. योजनेत समावेश होण्यासाठी केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन बापट यांनी दिले.
केंद्र सरकारच्या नगरविकास विभागामार्फत २७ जुलैला ‘स्मार्ट सिटी’ योजनेतील शहरांची नावे जाहीर केली. मात्र, त्यातून पिंपरी-चिंचवड शहराला वगळले. असे न करता शहराला या योजनेत सामावून घ्यावे, या मागणीसाठी भाजपा-सेना वगळता सर्वपक्षीय पदाधिकारी एकत्र आले आहेत. सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने सोमवारी पालकमंत्री बापट यांची पुण्यात भेट घेतली. शहराच्या समावेशासाठी केंद्रीय नगरविकासमंत्री व्यंकय्या नायडू यांच्यासमवेत बैठक घेणार आहोत. तसेच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांची भेट घेऊन शहराच्या समावेशासाठी विनंती करण्यात येईल, असे बापट यांनी सांगितले.
शिष्टमंडळात महापौर शकुंतला धराडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, उपमहापौर प्रभाकर वाघेरे, काँगे्रसचे शहराध्यक्ष सचिन साठे, सभागृहनेत्या मंगला कदम, स्वराज अभियानचे मारुती भापकर, समाजवादी पार्टीचे रफीक कुुरेशी, बाबासाहेब तापकीर आदींचा
समावेश होता. (प्रतिनिधी)