उद्योजकांकडून भूखंडाचे ‘श्रीखंड’
By admin | Published: September 21, 2015 04:04 AM2015-09-21T04:04:07+5:302015-09-21T04:04:07+5:30
पिंपरी, भोसरी व चिंचवड भागात उद्योगाच्या नावावर महाराष्ट्र राज्य औद्योगिक महामंडळाकडून (एमआयडीसी) भूखंड खरेदी केले जातात
नीलेश जंगम, पिंपरी
पिंपरी, भोसरी व चिंचवड भागात उद्योगाच्या नावावर महाराष्ट्र राज्य औद्योगिक महामंडळाकडून (एमआयडीसी) भूखंड खरेदी केले जातात. तेथे काही काळापुरता उद्योग-व्यवसाय केला जातो. नंतर याच भूखंडावर इमले बांधून तिथे संसार केला जातो. काही ठिकाणी ‘नीचे मकान उपर दुकान’ अशी परिस्थिती आहे. दाखवण्यापुरते व्यवसाय केले जातात किंवा एखाद-दुसरे बंद यंत्र ठेवले जाते. मात्र, वरच्या मजल्यावर राहण्यासाठी घरे बांधली जातात.
उद्योगासाठी कमी दरात एमआयडीसीकडून भूखंडाची खरेदी केली जाते. मात्र, ते भूखंड निवासासाठी लाटले जाऊन एमआयडीसीची फसवणूक केली जात आहे. एकीकडे पिंपरी-चिंचवड शहरातील जागांचे भाव आकाशाला भिडले आहेत. दुसरीकडे उद्योगनगरीत मंदीचे सावट पसरले आहे. इतर जागांच्या तुलनेत एमआयडीसीचा भूखंड कमी दरात मिळतो. यामुळे अधिकाऱ्यांशी हातमिळवणी करून एमआयडीचे भूखंड खरेदी केले जातात. उद्योग न चालल्यास राहण्यासाठी किमान घर तरी होईल, या हेतूने राजरोसपणे भूखंड लाटण्याचे प्रकार शहरात सुरू आहेत. नियमानुसार एमआयडीसीचा भूखंड खरेदी केल्यानंतर ठरावीक कालावधीत विकसित न केल्यास एमआयडीसीकडून कारवाई केली जाते. काही उद्योजकांना येणाऱ्या अडचणींमुळे त्यांना एमआयडीसीकडून घेतलेल्या भूखंडाचा लाभ घेता येत नाही. दिलेल्या मुदतीत व्यवसाय सुरू न करता आल्याने ते अपात्र ठरतात. यामुळे त्यांच्याकडून भूखंड जप्त केले जातात. परंतु, उद्योजकांसाठीचे भूखंड निवासी वापरासाठी घेणाऱ्यांकडे एमआयडीसीचे अधिकारी डोळेझाक करतात. अशा प्रकारचे भूखंड विक्री करण्यामध्ये एमआयडीसीचेच काही अधिकारी, कर्मचारी, तर काही निवृत्त अधिकारीही सक्रिय आहेत. औद्योगिकचे निवासी व व्यापारी भूखंडात रुपांतर करण्याची तरतूद झाली. लोकवस्तीच्या भागातल्या औद्योगिक भूखंडांचे निवासी व व्यापारी भूखंडात रुपांतर करण्याकरिता परवानगी मिळाली. असे अनेक भूखंड रुपांतरित झाले.
भारनियमनाची चिंता नाही
उद्योजक म्हणून ज्या सोयी-सुविधा मिळतात, त्याचा फायदा निवासासाठी केला जातो. एमआयडीसीकडून वीज, पाणी व इतर सुविधा मुबलक प्रमाणात मिळतात. शहरातील इतर रहिवासी भागाच्या तुलनेत या सुविधा महाग असल्या, तरी पूरक प्रमाणात मिळतात. या सुविधांचा लाभ घेत लोक येथे पिढ्यान्पिढ्या राहत आहेत. शहरातील अनेक भागांत पाण्याची कमतरता आहे. अनेक सोसायट्यांमध्ये शेवटच्या मजल्यापर्यंत पाणी पोहोचत नाही. एमआयडीसीत विजेच्या बाबतही विजेच्या भारनियमानाची चिंता नसते.
अधिकाऱ्यांशी हातमिळवणी
एमआयडीसीकडून घेतलेल्या भूखंडाचा पुरेपूर वापर केला जातो. एकाच छताखाली कारखाना, कार्यालय, घर सगळेच उभारण्यात येते. अनेक ठिकाणी तर पिढ्यान्पिढ्या लोक राहत असल्याचे चित्र पाहायला मिळते. इतर ठिकाणी कामाला असणाऱ्या नातेवाइकांसह लोक या भूखंडाचा पुरेपूर फायदा घेत आहेत. अनेकांना उद्योगातले काहीही ज्ञान नसतानही केवळ नावाला दिखाव्यासाठी एखादे यंत्र ठेवले आहे. एमआयडीसीच्या अधिकारी-कर्मचारी यांना हाताशी धरून भूखंड घेतले जात असल्याने बिनधास्तपणे व राजरोसपणे या भूखंडावर संसार थाटले जात आहेत.