हक्काचा मोबदला द्या; अन्यथा आत्महत्या करू
By admin | Published: January 31, 2016 12:31 AM2016-01-31T00:31:54+5:302016-01-31T00:31:54+5:30
महिलांचे सक्षमीकरण होणार, या उद्देशाने राबूनही मोबदला मिळाला नाही. मोबदल्यासाठी अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ होत आहे.
बचतगटातील महिलांचा इशारा : माविमच्या गैरव्यवहाराची चौकशी करा
भंडारा : महिलांचे सक्षमीकरण होणार, या उद्देशाने राबूनही मोबदला मिळाला नाही. मोबदल्यासाठी अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ होत आहे. त्यामुळे आत्महत्येशिवाय आता पर्याय उरलेला नाही, असा इशारा अन्नपूर्णा महिला उत्पादक बचत गट भंडारा, सहयोग महिला उत्पादक गट मोहाडी, अंकुर कोसा उत्पादक गट सीतेपार येथील महिलांनी आयोजित पत्रपरीषदेत दिला आहे.
अन्नपूर्णा महिला उत्पादक बचत गटाची माहिती देताना जयनंदा हुमणे व जया मेहर यांनी माविमंच्या जिल्हा समन्वयक ज्योती निंबोळकर यांच्याकडून अन्याय झाल्याचा पाढा वाचला. त्या म्हणाल्या, १५ आॅगस्ट २०१५ पासून जिल्हा परिषद आवारामध्ये बचत गटातील महिलांचे उपहारगृह सुरु आहे. उपहारगृह सुरु करण्याकरिता ७ लाख ६० हजार रुपयांचे कर्ज घेण्यात आले. परंतु माविमंच्या अधिकारी निंबोळकर यांच्या अवाढव्य खर्चामुळे बचत गटातील महिलांवर भुर्दंड बसला आहे. उपहारगृहात काम करणाऱ्या महिलांना प्रतीमाह ३ हजार रुपये व प्रती दिन प्रवास भाडे ५० रुपये देण्याचे ठरविले होते. परंतु आजपर्यंत महिलांना एकही रुपया मिळाला नाही. उपहारगृहा करिता जिल्हाधिकारी कार्यालयाकडून २ लाख रुपयांचे अनुदान मंजूर झाले. याचा हिशोब जिल्हा समन्वयक निंबोळकर यांनी दिला नाही.
माविमच्या गैरव्यवहाराची चौकशी करा
भंडारा : उपहारगृहासाठी जवळपास ९० हजार रुपये खर्च केलेला आहे. मोबदल्याविषयी उडवाउडवीचे उत्तर मिळत आहे. जिल्हाधिकाऱ्यांना या समस्येविषयी निवेदन देण्यात आले. मात्र त्यांच्याकडूनही टाळाटाळीचे उत्तर मिळत आहे.
अंकुर कोसा उत्पादक गटातील महिला झुलवंता झंझाड, भारती झंझाड, मंजुषा झंझाड, निर्मला सार्वे यांनी माविमंच्या प्रकल्प संचालक यांच्या समस्यांचा पाढाच वाचला. त्या म्हणाल्या, २०१२ पासून कोसा व्यवसाय, स्टेशनरी व्यवसाय मोहाडी येथे कन्हाळगाव येथील महिलांच्या सहकार्याने सुरु करण्यात आले. महिलांना विविध ठिकाणाहून कर्ज घ्यायला लावून व्यवसाय करण्यास माविमंच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. व्यवसायामध्ये १५ लाख ७५ हजारांचे कर्ज महिलांच्या नावे घेण्यात आले आहेत. त्यापैकी ९ लाख ५ हजार रुपये खर्च करण्यात आले. आजपावेतो काम करूनही त्यांना छदामही मोबदला मिळाला नाही. कर्ज परतफेडीसाठी बँकेचे अधिकारी तगादा लावत आहेत. व्यवसाय वृद्धींगत होण्यासाठी महिलांसह पुरुषांनीही हिरहिरीने सहभाग घेतला. मात्र कामाचा मोबदला मिळाला नाही. परिणामी उपासमारीचे संकट ओढावले आहे. आर्थिक व्यवहाराची चौकशी करून महिलांना न्याय मिळावा, अशी मागणी बचत गटातील महिलांनी केली आहे.
सहयोग महिला उत्पादक बचत गट २०१२ पासून आॅगस्ट २०१५ पर्यंत कार्यरत होते. येथील महिलांनी ब्लॉक प्रिंटींग प्रशिक्षण घेतले. या गटात १५ महिला १०० रुपये प्रतिदिन प्रमाणे काम करीत होत्या. कर्ज काढून व्यवसाय उभारला, साहित्य खरेदी केले. घरात अठराविश्वे दारिद्र्य असताना अधिकाऱ्यांकडून मानसिक त्रास होत आहे. न्यायासाठी अधिकाऱ्यांच्या कार्यालयाच्या येरझारा मारूनही न्याय मिळत नाही. पत्रपरिषदेला गणेशपूरच्या सरपंच वनिता उके, नंदा हुमणे, जया मेहर, झुलवंता झंझाड, निर्मला सार्वे, आरती झंझाड, प्रज्ञा सुखदेवे, सुनंदा नेवारे उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)