‘त्या’ कर्मचाऱ्यांना ‘रिलिव्ह’ करण्याचे फर्मान

By admin | Published: February 21, 2017 12:05 AM2017-02-21T00:05:12+5:302017-02-21T00:05:12+5:30

बदली आदेशाला केराची टोपली दाखविण्याच्या कर्मचाऱ्यांनी चालविलेल्या प्रयत्नाला आयुक्त हेमंत पवार यांनी सोमवारी ब्रेक लावला.

Decision to 'retrieve' those 'employees' | ‘त्या’ कर्मचाऱ्यांना ‘रिलिव्ह’ करण्याचे फर्मान

‘त्या’ कर्मचाऱ्यांना ‘रिलिव्ह’ करण्याचे फर्मान

Next

आयुक्त संतापले : विभागप्रमुखांची कानउघाडणी
अमरावती : बदली आदेशाला केराची टोपली दाखविण्याच्या कर्मचाऱ्यांनी चालविलेल्या प्रयत्नाला आयुक्त हेमंत पवार यांनी सोमवारी ब्रेक लावला. बदलीच्या ठिकाणी रुजू न होता ही बदलीप्रक्रिया ‘रद्द’ करण्यासाठी ‘त्या’ कर्मचाऱ्यांकडून जोरकस प्रयत्न केले जात होते. त्या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी सोमवारी संबंधित बदलीप्राप्त कर्मचाऱ्यांना ‘रिलिव्ह’ करण्याचे आदेश सर्व सहायक आयुक्त व संबंधित विभागप्रमुखांना दिलेत.
‘भ्रष्ट साखळीला ‘ब्रेक’ लावण्याचे आव्हान’ याशिर्षाखाली सोमवारी ‘लोकमत’ने बदली आदेशांच्या पायमल्लीवर प्रकाशझोत टाकला.
आयुक्तांनी ९ फेब्रुवारीला कनिष्ठ लिपिक, वसुली लिपिक व वरिष्ठ लिपिक अशा २२ कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले होते. भ्रष्ट साखळी तोडण्यासाठी ही बदली प्रक्रिया राबविली गेली. यात काही नवखे असले तरी ‘चिपकू’ यानामाभिधानाला यथार्थ ठरविणाऱ्या काहींचा या यादीत समावेश होता. ९ फेब्रुवारीला बदली आदेश निघाल्यानंतर याकर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली. निवडणूक काळात बदली करता येत नाही, असा सूरही निघाला. ‘जीएडी’कडून बदली आदेश घ्यायलाही अनेकांनी नकार दिला. एखाद-दुसरा अपवाद वगळता बदली आदेश घेणाऱ्यांनी निर्धारित ठिकाणी रुजू न होता ‘चिपकू’ हे त्यांचे नामभिधान खरे ठरले. आयुक्तांच्या आदेशांची पायमल्ली करीत आणि प्रशासनाला आव्हान देत अनेकांनी ‘आमचे गॉडफादर परतू द्या, आम्ही बदली रद्द करतो की नाही ते बघाच,’ असा इशाराही प्रशासन म्हणजेच एका अर्थाने आयुक्तांना देऊन टाकला.
२० फेब्रुवारीपर्यंत १ ते २ कर्मचाऱ्यांचा, अपवाद वगळता उर्वरित १७ ते १८ कर्मचाऱ्यांनी निवडणूक काम, न्यायालयीन प्रकरणाचा बागुलबुवा करीत बदली झालेल्या ठिकाणी जाणे टाळले. त्या पार्श्वभूमीवर सोमवारी दुपारी आयुक्तांनी या बदलीप्रक्रियेचा विभागप्रमुखांकडून आढावा घेतला व संबंधित कर्मचाऱ्याला तातडीने म्हणजे तासाभराच्या आत ‘रिलिव्ह’ करण्याचे फर्मान सोडले आहे. (प्रतिनिधी)

सबब ऐकणार नाही
चार सहायक अयुक्तांसह बांधकाम, लेखा, जीएडी, अग्निशमन, आरोग्य आणि उद्यानासह संबंधित विभागप्रमुखांशी आयुक्तांनी सोमवारी दुपारी बदली आणि कार्यमुक्ततेबाबतची माहिती जाणून घेतली. निवडणूक कामात असतील त्यांनाही मूळ जागेवरुन तत्काळ कार्यमुक्त करा आणि बदलीच्या ठिकाणी रुजू होऊन निवडणुकीचे काम करण्यासंदर्भात आदेश काढा, असे निर्देश आयुक्तांनी दिलेत. ही प्रशासकीय लेटलतिफी सहन केली जाणार नाही आणि कार्यमुक्ततेबद्दल कुठलीही सबब ऐकून घेतली जाणार नाही, असेही आयुक्तांनी बजावले.

९ फेब्रुवारीला काढलेल्या बदली आदेशाचा सोमवारी आढावा घेतला व संबंधित विभागप्रमुखांना बदलीप्राप्त कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्याचे आदेश दिलेत. कर्मचाऱ्यांनी तातडीने बदलीस्थळी रुजू व्हावे.
-हेमंत पवार, आयुक्त, महापालिका

Web Title: Decision to 'retrieve' those 'employees'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.