विकासाचे ‘तरुण’ पूल
By admin | Published: August 14, 2014 03:13 PM2014-08-14T15:13:32+5:302014-08-14T15:13:32+5:30
केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयानं २0१२ पासून पंतप्रधान ग्रामीण विकास फेलोज (पीएमआरडीएफ) ही अनोखी योजना खास तरुण मुलांसाठी सुरू केली आहे. ‘डेव्हलपमेंट प्रोफेशनल्स’ म्हणून या मुलांनी काम करत सामान्य जनता, त्याच्या समस्या आणि सरकारी यंत्रणा यातला दुवा बनत काम करणं यात अपेक्षित आहे.
Next
>
लेखन : राहुल कलाल
केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयानं २0१२ पासून पंतप्रधान ग्रामीण विकास फेलोज (पीएमआरडीएफ) ही अनोखी योजना खास तरुण मुलांसाठी सुरू केली आहे. ‘डेव्हलपमेंट प्रोफेशनल्स’ म्हणून या मुलांनी काम करत सामान्य जनता, त्याच्या समस्या आणि सरकारी यंत्रणा यातला दुवा बनत काम करणं यात अपेक्षित आहे. यासाठी देशपातळीवर स्पर्धा परीक्षेसारखी एक परीक्षा घेतली जाते. हजारो तरुण ही परीक्षा देतात. त्यातून १५0 ते १६0 तरुणांचीच निवड केली जाते. निवड झालेल्या मुलांना टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस संस्थेकडून पाच आठवडयांचं प्रशिक्षण दिलं जातं. २ वर्षं मग ग्रामीण भागात फेलो म्हणून काम करावं लागतं. ग्रामीण भागातील समस्यांचा अभ्यास, त्या सोडवण्याची नव्या दमाची दृष्टी आणि सरकारी यंत्रणेला येणारे अडथळे यांचा अभ्यास ही मुलं करतात. पुण्याच्या पीयूष, ऋत्विक आणि मृणालची त्यासाठी निवड झाली आहे. हायली क्वालिफाईड असणार्या या मुलांनी ग्रामीण भागात जाऊन ‘अनुभव’ कमवायचं का ठरवलं ?
मृणाल देशमुख
मुक्काम : जिल्हा जोरहाट, आसाम
काम : सरकारी यंत्रणा नागरिकांपर्यंत का पोहचत नाही, हे शोधून पाहणं.
इंजिनिअरिग्ांचे शिक्षण पूर्ण केलं, पण देशासाठी काहीतरी करायचं, सिस्टिममध्ये जाऊन काम करायचं या विचारानं स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरू केला. ग्रामीण भागातील लोकांसाठी काहीतरी करावं असं मनात होतं म्हणून ‘रुरल डेव्हलपमेंट’ या विषयामध्ये मास्टर्स केलं. त्यादरम्यान पंतप्रधान ग्रामीण विकास फेलोज (पीएमआरडीएफ) परीक्षेची माहिती मिळाली. अधिकारी होण्याअगोदर प्रत्यक्षात ग्रामीण भागात जाऊन काम करण्याचा अनुभव मिळाला तर बरं म्हणून ही परीक्षा दिली आणि गुणवत्ता यादीत नंबरही आला. ईशान्य भारताचाही या योजनेत समावेश झाल्याचं कळलं आणि मी आसाममध्ये जाऊन काम करायचं ठरवलं. सरकारी योजना राबविण्यासाठी सरकारी यंत्रणा आहे. पण प्रत्यक्षात ग्रामीण भागात तळागाळापर्यंत या योजना अनेकदा का पोहोचत नाहीत किंवा नेमक्या कुठल्या समस्या सरकारी यंत्रणेच्या लक्षात येत नाही याचा मला अभ्यास करायचा आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यात स्थानिक माणसांचा विश्वास जिंकावा लागेल. जिल्ह्याच्या विविध भागांमधील लोकवस्त्यांवर जाऊन माणसांशी बोलावं लागेल, सरकारी अधिकार्यांच्याही अडचणी समजून घ्याव्या लागतील. मुख्य समस्या काय आहे ते समजून त्यावर काही योजना बनवता येईल का, असा मी प्रयत्न करणार आहे, मुख्य म्हणजे मला तो राबवूनही पहायचा आहे. आता कामाची सुरुवात होतेय, प्रयत्न तर शंभर टक्के करायलाच हवेत.
पीयूष ओझर्डे
मुक्काम : जिल्हा धलाई, त्रिपुरा
काम : डोंगरदर्यांमधल्या गावांमध्ये मन्वयाचा प्रयत्न करणं.
इंजिनिअरिंग केलं. स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू झाली. अभ्यास करत असताना ईशान्य भारतात विविध अभ्यास दौर्यांच्या निमित्तानं जाऊन आलो होतो. देशाच्या इतर भागांचा ज्या वेगानं विकास झाला त्या वेगानं या भागाचा विकास झाला नसल्याचं प्रत्येकवेळी जाणवत होतं. त्यामुळे तेथे जाऊन प्रत्यक्ष काम करण्याची इच्छा मनात होतीच. धलाई जिल्ह्यातील समस्या खूप वेगळ्या आहेत. या जिल्ह्याच्या दोन्ही बाजूंनी बांग्लादेशाच्या सीमा आहेत. हा जिल्हा डोंगरदर्यांमध्ये असल्यानं तेथून बांग्लादेश व्यवस्थित दिसतो. पण एक चांगली गोष्ट म्हणजे तेथील लोक शिक्षणाबाबत खूप जागरूक आहेत. त्यामुळे शिक्षणाची स्थिती खूप चांगली आहे. ई प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. मात्र या जिल्ह्यात राहणारे बहुतांशी आदिवासी आहेत. जंगलांच्या माध्यमातून निर्माण होणार्या रोजगारांवरच ते अवलंबून आहेत. पण वन विभाग आदिवासी यांमध्ये या जिल्ह्यात खूप वाद आहेत. त्यात मलेरियाचा खूप प्रादुर्भाव आहे. यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. या भागातील लोकांना उत्तम जीवनमान मिळणं, रोजगार वाढून, स्थानिक हस्तकला उद्योगाला बाजारपेठ कशी मिळेल यासाठी प्रयत्न करणं हे माझं काम असेल. त्यासाठी सरकारी यंत्रणेचा उत्तम उपयोग कसा करता येईल हे पहावं लागेल.
ऋत्विक फाटक
मुक्काम : जिल्हा हायलाखंदी, आसाम
काम : आसाम आणि मिझोरामच्या सीमेवर अशांत भागात ‘संवादा’ची धडपड.
हॉस्पिटॅलिटी विषयात ग्रॅज्युएशन केलं. शिलाँग येथे त्याच विषयात एमबीए केलं. शिलॉँगमध्ये राहिल्यानं ईशान्य भारताशी नातं जुळलंच होतं. संधी मिळाली म्हणून ठरवलं काम करायचं तर तिकडेच. तसंही शालेय जीवनापासून ग्रामीण भागात कामं केली असल्यामुळे वाटायचं की, आपण प्रत्यक्ष कामात सहभागी व्हावं. ईशान्येतले प्रश्न तर आणखी वेगळे. अधिकारी बनण्याअगोदर प्रत्यक्षात तळागाळात काम करण्याचा अनुभव पाठीशी असावा म्हणून खरंतर हे ‘फेलो’ म्हणून काम स्वीकारलंच.
हायलाखंदी हा जिल्हा मिझोराम राज्याच्या बॉर्डरवर आहे. इथे लोकसंख्या वाढीचा वेग खूप म्हणजे १८ टक्के आहे. अशातच बोडो आणि बिगरबोडो यांच्यात संघर्ष आहे. प्रामुख्याने चहाच्या बागा आहेत, त्यात खूप मजूर काम करतात. राजकीय नेतृत्व, सरकारी यंत्रणा आणि सामान्य माणूस यांच्यात संवाद पूल निर्माण करणं हे काम मी आव्हान म्हणून स्वीकारलंय. या कामामुळे मला निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य असेल, त्यामुळे आता कामाला लागायचं, एवढंच.
सोशल इंजिनिअरिंग
विवेकानंद सेवा मंडळ, डोंबिवली
काय काम करतात?
१) तरुण मुलांसाठी इंजिनिअरिंगच्या पुस्तकांची लायब्ररी. इंजिनिअरिंगच्या विविध शाखांची ६५00 पुस्तकं या लायब्ररीत आहेत. विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका.
२) ‘विई’ आणि खोडगे या आदिवासी गावातल्या मुलांसाठी ‘झेप’ आणि ‘उमंग’ असे दोन उपक्रम.
३) डोंबिवली परिसरातील महानगरपालिकेच्या तीन शाळांत जाऊन विद्यार्थ्यांना ई-लर्निंगद्वारे शिकवतात.
४) याशिवाय विविध प्रदर्शनं आणि व्याख्यानमालांचे आयोजन.
या कामाची प्रेरणा काय?
इंजिनिअरिंगला शिकणार्या तरुण मुलांनी एकत्र येऊन ही लायब्ररी सुरू केली त्याला आता दहा वर्षांहून अधिक काळ उलटून गेला. इंजिनिअरिंग करणार्या अनेक मुलांना पुस्तकं घेणं परवडत नाही. त्यामुळे जी मुलं इंजिनिअर होतात त्यांच्याकडे जाऊन त्यांची पुस्तकं गोळा केली. त्यातून गरजू विद्यार्थ्यांसाठी ही लायब्ररी सुरू झाली. अनेक मुलं या लायब्ररीच्या अभ्यासिकेत येतात. मंडळाची स्वत:ची वास्तूही आहे. तरुण मुलं एकत्र येऊन त्यांनी विविध उपक्रम करावेत, त्यातून त्यांच्याही व्यक्तिमत्त्वाला पैलू पडावेत या हेतूनं मग विविध कार्यक्रम सुरू झाले. त्यातूनच आदिवासी गावात जाऊन तिथल्या तरुण मुलांना शिक्षणासाठी मदत करणं, शेती आणि पाणीवापराचं मार्गदर्शन करणं, यासह महिला बचत गटांच्या वस्तूंना बाजारपेठ मिळवून देणं असं काम सुरू झालं. दिवाळीत ३५ हजार उटण्याच्या पुड्या गावातल्या महिलांनी बनवल्या आणि त्या या मंडळाच्या मुलांनी विकल्या. त्यातून आलेले पैसे त्या महिलांना दिले. डोंबिवलीतल्याही तीन शाळांत अनेक इंजिनिअरिंगची मुलं दोन तास शिकवायला जातात. हे सारे उपक्रम जो तो आपापला अभ्यास, आणि नोकरी सांभाळून करतात. आपण समाजासाठी ‘काहीतरी’ करतोय या भावनेपेक्षा आपण खूप काही शिकतोय. निराशा-मरगळ कमी होऊन सकारात्मक दृष्टिकोन वाढीस लागतोय हे महत्त्वाचं आहे. मुख्य म्हणजे ग्रामविकासाच्या प्रयत्नातून अनेक तरुण मुलांना हे कळतं की आपली शहरी लाइफस्टाइलही आपण बदलली पाहिजे, निसर्गाच्या अधिक जवळ कसं जायचं, माणसं कशी जोडायची हे शिकायला हवं. मंडळाच्या कामातून तरुण इंजिनिअर्स हे शिकतात, तेच महत्त्वाचं आहे.
संपर्क : शैलेश निपुंगे
www.vsmandal.org
गौरी चौधरी
मुक्काम : वरुड, जि. अमरावती (मूळची पुण्याची.)
काम : ग्रामीण भागातल्या रुग्णांची सेवा
ग्रामीण भागात पाठदुखी, कंबरदुखी, लकवा. यासारख्या आजारांचे रुग्ण खूप आहेत. पण त्यावर ते ना उपचार घेत, ना ते त्यांना परवडत. सोप्या उपायांनी त्यांची रोजची दुखणी कमी व्हावीत यासाठी प्रयत्न आणि असंसर्गजन्य रोगनियंत्रण कार्यक्रमांतर्गत कृतिशील सहभाग.
बाबा आमटे यांनी सुरू केलेल्या श्रमसंस्कार छावणीला हेमलकसा, लोकबिरादरी प्रकल्प, गडचिरोली येथे २0११ साली जाण्याची संधी मिळाली. तिथून पुढे आनंदवन येथे भेट दिली आणि आनंदवन येथे भेट दिल्यानंतर तेथील लोक पाहिले, त्यांना भेटलो. बाबांनी या लोकांच्या हाताला काम दिलं आणि जगण्याचा मार्ग दाखवला. हे सर्व पाहून मी खूप भारावून गेले आणि या लोकांसाठी मी काय करू शकते असं वाटलं. त्याचबरोबर प्रश्न पडला की, इथे शारीरिकदृष्ट्या अपंग लोक आहेत आणि त्यांना फिजिओथेरपीचा फायदा होऊ शकतो का?
यानंतर आनंदवनात काही दिवस राहून तिथेच राहण्याचा आणि काम करण्याचा निर्णय घेतला. तिथे सहा महिने राहून दवाखान्यात येणार्या रु ग्णांना उपचार दिले. यानंतर, पुन्हा पुढे काय असा प्रश्न उभा राहिला. ग्रामीण भागातच राहून अजून खूप काही बघण्याची, शिकण्याची गरज आहे असं वाटत होतं. अशातच, ‘निर्माण’बद्दल माहिती मिळाली. यातूनच ‘सर्च’सोबत ग्रामीण भागातील पाठ-कंबरदुखी याविषयी अभ्यास करण्याची संधी मिळाली. ‘सर्च’, गडचिरोली येथे दीड वर्ष राहून दवाखान्यात काम करताना, गावोगावी फिरताना ग्रामीण भागातील आरोग्याच्या अनेक समस्या दिसत गेल्या. त्याचबरोबर, स्वत:च्या क्षेत्राबाबत अनेक प्रश्न पडू लागले. कारण, फिजिओथेरपी ही तशी महागडी उपचारपद्धती. आता कुठे शहरातील लोकांना याबद्दल माहिती होऊ लागली आहे. पण, खेडोपाडी लोकांना याबद्दल अजूनही काही माहीत नाही आणि जरी माहीत झालं तरी त्यांना हे उपचार घेणं परवडणार तरी कसं?.
पाठ-कंबरदुखी, लकवा यासारख्या आजारांसाठी मोठय़ा प्रमाणात पेनकिलर्स, इंजेक्शन्स हे लोक घेतात. पण त्यामुळे फक्त तात्पुरता आराम पडतो. काम करण्याच्या चुकीच्या पद्धती, वर्षानुवर्षं चुकीच्या स्थितीत वाकून, बसून हे लोक कष्टाची कामं करत आहेत आणि त्यामुळे शरीराच्या मूळ रचनेत अनेक बदल होऊन गेलेले असतात. त्यामुळे यावर इलाज काय, फिजिओथेरपी हे उत्तर आहे पण हे खेड्यात कसं शक्य आहे? लोक हे मान्य करतील का?. असे अनेक प्रश्न पडत गेले. या दरम्यान गावातील लोकांसोबत बोलून, त्यांच्यासोबत शेतात काम करून त्यांचा त्रास समजून घेण्याचा प्रयत्न केला. यातून काही उत्तरं मिळाली. काही सापडायची आहेत. खेड्यातही दिवसभर शेतात कष्टाची कामं केल्यानं शेतकर्यांची कंबर दुखते, चुलीवर स्वयंपाक करताना उकिडवे बसल्यानं बाईची कंबर आणि गुडघे दुखतात, एखाद्या घरात सेरेब्रल पाल्सीचं मूल जन्माला येतं तर एखाद्या लहानग्याला पोलिओसारखा आजार होतो. एखाद्याला साप चावतो आणि पस झाल्यानं त्याचा पाय कापावा लागतो. एखादा मजूर बांधकाम करताना पडून अपघात होतो आणि मज्जारज्जूला इजा झाल्यानं कायमस्वरूपी अपंग होतो. कुण्या म्हातार्या माणसाला अचानक लकवा मारतो तर एखाद्या म्हातार्या आजीचं खुब्याचं हाड मोडतं, पण शस्त्रक्रिया करायला पैसे नाहीत म्हणून ती तशीच कशीबशी लंगडत चालत राहते.
या सर्व प्रवासात ग्रामीण भागातील या क्षेत्राची गरज आणि लोकांच्या अडचणी दिसत गेल्या. त्यामुळे ग्रामीण भागात राहून काम करण्याचा निर्णय घेतला. विवाहाचा निर्णय घेतल्यानंतर समविचारी, ग्रामीण भागातील शेतकरी मुलाशी मी लग्न केलं. (सेंद्रीय शेती आम्ही करतो.) सध्या मी अमरावती जिल्ह्यातील वरूड तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात असंसर्गजन्य रोगनियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत काम करत आहे. या कार्यक्रमाअंतर्गत गावोगावी फिरून लकवा झालेल्या रुग्णांना गृहभेटी देणं सुरू आहे तसेच नव्या नव्या प्रश्नांची उत्तरं शोधणं सुरू आहे. ग्रामीण भागातील कामाला आता कुठे सुरु वात झाली आहे. या सर्व प्रवासात ‘निर्माण’, ‘सर्च’, अनेक मित्र-मैत्रिणी कायमच पाठीशी उभे राहत, सोबत राहून साथ देत राहिले. आपल्या शिक्षणाचा फायदा समाजातील गरीब व गरजू लोकांना योग्य प्रकारे कसा होईल याचं उत्तर मला ‘निर्माण’मुळे मिळालं. समाजाकरिता काही करताना फक्त भावना महत्त्वाच्या नसतात तर त्याचबरोबर योग्य विचार आणि कृतीचीही जोड आवश्यक असते हे ‘निर्माण’नं शिकवलं. ‘दिशा’ मला सापडली आहे. त्या दिशेनं अधिकाधिक जाण्याचा प्रयत्न करते आहे.
प्रफुल्ल शशिकांत,
मुक्काम : आंबेजोगाई (आता पुणे)
काम : पुस्तकी शिक्षणाची सांगड प्रत्यक्ष अनुभवाशी घालण्याची धडपड
(विद्यार्थ्यांनी आपापल्या परिसरातील सामाजिक प्रश्न स्वत:च शोधायचे आणि कृतिशील सहभागानं त्यावरची उत्तरंही स्वत:च मिळवायचा प्रयत्न करायचा. सामाजिक प्रश्नांवरील उत्तरं ‘शोधण्या’ पेक्षाही त्या त्या प्रश्नांसंदर्भात मुलांच्या जाणिवा, संवेदना जागृत व्हाव्यात हा या ‘सोशल ऑलिम्पियाड’ उपक्रमाचा मुख्य हेतू आहे.)
सामाजिक क्षेत्नामध्ये ‘शिक्षण’ या विषयावर प्रचंड काम झालेलं आहे व अजूनही चालू आहे. तरीही बर्याच सामाजिक समस्यांची मुळं अजूनही शिक्षणात दडलेली आहेत. त्याची कारणं शोधण्यासाठी मी बर्याच शाळांमध्ये फिरलो. तिथले विद्यार्थी, पालक, शिक्षकांशी बोललो. त्यातून एक गोष्ट स्पष्टपणे जाणवली की, या शाळांमधून विद्यार्थ्यांना साक्षर करण्याचे प्रयत्न तर मोठय़ा प्रमाणात होतात, परंतु ज्ञान व कौशल्य, समाजातील विविध प्रश्न व त्यांच्याकडे पाहण्याचे विविध दृष्टिकोन. याबाबत शिक्षणाची अगदीच सुमार परिस्थिती आहे.
शिक्षणाचं उद्दिष्ट काय? - मला वाटतं, शिक्षणातून मुलांची दृष्टी विस्तारली पाहिजे, त्याचबरोबर त्यांची बुद्धिमत्ता आणि चारित्र्याचाही विकास झाला पाहिजे. मात्र यांपैकी दृष्टी व चारित्र्य यांच्या विकासाकडे आपली शिक्षणव्यवस्था संपूर्णपणे दुर्लक्ष करते. अनेक शाळा, हजारो विद्यार्थ्यांशी बोलल्यानंतर आणि तिथली सर्व परिस्थिती पाहिल्यानंतर खूपच अस्वस्थ झालो. त्यासाठी आपल्यापरीनं काय करता येईल? स्वत:चंच खूप डोकं खाल्लं आणि ठरवलं, शाळकरी मुलांना हाताशी धरावं आणि त्या त्या ठिकाणच्या सामाजिक प्रश्नांसंदर्भात काहीतरी काम करावं. पण काय? स्पष्ट दिशा मिळत नव्हती. शिक्षणातून विचार-प्रबोधन कसं करता येईल या शोधात असताना डॉ. अभय बंग व विवेक सावंत यांच्या कल्पनेतील ‘सोशल ऑलिम्पियाड’ या अभिनव कार्यक्रमाशी माझा परिचय झाला. ‘निर्माण’ आणि ‘महाराष्ट्र नॉलेज फाउंडेशन’ यांच्या माध्यमातून ‘सोशल ऑलिम्पियाड’ची कल्पना प्रत्यक्षात उतरवण्याचे प्रयत्न मी सुरू केले.
या कार्यक्रमाअंतर्गत शालेय मुलं एक गट स्थापन करतात. तिथला प्रश्न स्वत:च शोधतात आणि एका स्थानिक मार्गदर्शकाच्या सहाय्यानं थेट कृतीच करतात. या कृती कार्यक्र मांचं, त्यांच्या क्षेत्नाचं, आवाक्याचं, वेळेचं कुठलंही बंधन विद्यार्थ्यांवर नसतं. आपल्या परिसरातील विविध प्रश्न ओळखणं व आपल्या परीनं त्या प्रश्नांचा मागोवा घेणं, त्यांवर उपाय शोधण्याचा प्रयत्न करणं असं त्याचं साधारण स्वरूप आहे.
गेल्या वर्षी महाराष्ट्रातील विविध भागांतील पाचवी दहावीच्या वयोगटातील २४३ मुलांनी आपसात २२ गट स्थापन केले व स्वत: निवडलेल्या एका अनुभवी मार्गदर्शकाच्या व सोशल ऑलिम्पियाडद्वारे जोडून दिलेल्या स्वयंसेवकांच्या सहाय्यानं वेगवेगळ्य़ा कृती कार्यक्र मांची आखणी केली. हे कृती कार्यक्रम, ते पार पडण्याच्या पद्धती, निवडलेले प्रश्न, त्यावरील शोधलेली उत्तरं हे सर्व या गटांनी स्वत: निवडलं होतं. उदाहरणार्थ वाघोलीच्या कीर्तीताईच्या गटानं शाळेमध्ये मुलांसाठी स्वच्छतागृह असण्याचा आग्रह धरला, जत्नेच्या दिवशी आपलं गाव कचरामुक्त ठेवण्यासाठी लोकांचं प्रबोधन केलं, स्वत: झाडू हाती घेऊन मुलांनी स्वच्छतेला सुरुवात केली, दिवाळीला पर्यावरणाची काळजी घेणारा संदेश दिला, मुलांनी स्वत:ही फटाके उडवले नाहीत.
पुण्यातील स्वच्छंद कट्टा गटानं परिसरातील लोकांमध्ये ओला व सुका कचरा वेगळा करण्यासाठी प्रबोधन केलं, परिसरातील फुलझाडांची निगा राखण्याचा प्रयत्न केला.
जिल्हा परिषद शाळेवर शिक्षकच नव्हते. मुलांचं मोठं नुकसान होत होतं. बीड येथील डोमरी गुरु कुलच्या प्रगती गटानं आपल्या परिसरातील गटातील दोन मुलं रोज त्या शाळेवर जाऊन लहान मुलांची पूर्ण शाळा घेऊ लागले.
दौंड येथील उल्हास सरांच्या गटानं स्वत: विज्ञान खेळणी व प्रयोग शिकून घेतले व इतर वर्गातील, शाळांमधील मुलांना ते शिकवले, बिहरटवाडी गटानं तर गावातील विविध प्रश्न सोडवण्यासाठी ग्रामसभेमध्ये सहभाग घेतला व बदल घडवून आणण्यासाठी वयाचं बंधन नाही हे सिद्ध केलं.
हा सर्व अनुभवच खूप वेगळा आणि व्यापक होता. चांगले-वाईट खूप अनुभव आले, व्यवस्थेशी संवाद साधावा लागला, समाजाकडून कधी शाबासकी तर कधी रागावणं ऐकावं लागलं. यातूनही ही मुलं पुढे शिकत गेली. आपल्या परिसरातील समस्यांचा त्यांनी नुसता शोधच घेतला नाही, तर ते सोडवण्यासाठी स्वत: पुढाकार घेऊन प्रयत्न केला, करताहेत.
मुलांबरोबर काम करत असताना मीही खूप समृद्ध झालो. माझी विचारांची दिशा बदलली. जे करतोय, त्याचं खरंच खूप समाधान आहे. अजूनही बरंच काही करायचंय. काही नव्या गोष्टींवर काम सुरू आहे. स्वत:लाही पुन्हा पुन्हा पडताळून पाहतो आहे.
संपर्क :
‘सोशल ऑलिम्पियाड’ हा प्रत्यक्ष कृतीमधून दृष्टी, विचार व वृत्ती यांचा संतुलित व सकारात्मक विकास घडवून आणणारा एक उपक्रम आहे. यावर्षीच्या उपक्रमात सहभागी व्हावयाचं असल्यास किमान चार विद्यार्थ्यांच्या एकत्रित गटानं संपर्क साधावा.
अंतिम तारीख : २५ ऑगस्ट २0१४.
अधिक माहितीसाठी संपर्क : prafullaw@mkf.org.in
वेबसाईट : www.mkf.org.in/mso
अद्वैत दंडवते
मुक्काम : जळगाव
काम : कचरा वेचणार्यांसाठी काम करता करता त्यांच्या मुलांसाठी शाळा चालवणं.
माझं पदवीपर्यंत शिक्षणकॉर्मसमधून झालं. ‘सीएस’ (कंपनी सेक्रेटरी) करताना फायनलच्या आधी मी पुण्यातील एका नामांकित कंपनीत लागलो. कॉर्पोरेट जीवनात सेटल होत असतानाच जीवनाच्या दुसर्या बाजूचं दर्शन मला झालं. सतत चालणारा भ्रष्टाचार, जीवघेणी स्पर्धा आणि स्वत:चं अस्तित्व वाचवण्यासाठी जीवघेणी धडपड या सगळ्याचा मला त्रास व्हायला लागला. आयुष्यात जी मूल्यं आणि तत्त्व जपण्याचा थोडाथोडका प्रयत्न मी करत होतो त्याच्यापासून मी दूर जातोय, असं माझ्या लक्षात यायला लागलं आणि नोकरी सोडून मी जळगावला परत आलो.
माझ्या मनातील प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करत असतानाच जळगावला डॉ. अभय बंग यांचं ‘या जीवनाचं काय करू?’ हे भाषण ऐकलं. माझ्याच मनातील प्रश्न ते त्यांच्या भाषणातून मांडताएत असं वाटलं. याच ठिकाणी मी ‘निर्माण’शी जोडलो गेलो.
यानंतर मी पुणे विद्यापीठातून समाजशास्त्रात एम. ए. केलं. सामाजिक प्रश्नांवर काम करत असताना फक्त भावनिक आवाहन न करता परिस्थितीचा सखोल अभ्यास करून सांख्यिकी स्वरूपात वस्तुस्थिती लोकांसमोर मांडायची व तो प्रश्न सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करायचे या कल्पनेतून मी, माझी पत्नी प्रणाली तसेच मित्र सुशील अशा तिघांनी ‘वर्धिष्णू- सोशल रिसर्च अँन्ड डेव्हलपमेंट सोसायटी’ची स्थापना केली.
या संस्थेमार्फत पहिला विषय आम्ही हाती घेतला तो म्हणजे कचरावेचकांचा. शहरातील लोकांना त्यांचं घर, रस्ते साफ तर हवे असतात मात्र हे साफ कोण करतं याविषयी त्यांना फारसं घेणं-देणं नसतं. त्यांना कचरापेटीत आकंठ बुडालेला एखादा छोटा मुलगा पाहून वाईट तर वाटतं; पण कोण हे लोक? कसे जगत असतील हे? काय प्रश्न भेडसावत असतील यांना? आपण २ मिनिटंदेखील सहन करू शकत नाही अशा घाणीत आणि वासात कसे काम करत असतील हे? असे प्रश्न त्यांना पडत नाहीत.
कचरावेचकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील करून घेण्यासाठी प्रयत्न करायचे असतील तर सर्वप्रथम त्यांची सामाजिक आर्थिक परिस्थिती समजून घ्यायला हवी. याच उद्दिष्टानं आम्ही वर्धिष्णूच्या माध्यमातून जळगावातील महानगरपालिका कर्मचार्याव्यतिरिक्त कचरा वेचून आयुष्य जगणार्या लोकांचे सामाजिक व आर्थिक सर्वेक्षण केलं. यावरून मिळालेल्या माहितीच्या आधारे शिक्षण, आरोग्याचे प्रश्न तसेच व्यसनं व रोजगार या मुद्यांवर काम करण्यास सुरुवात झाली. याअंतर्गत कचरावेचकांची तसेच एकूण असंघटित क्षेत्रात काम करणार्या लोकांची जास्त लोकसंख्या असलेल्या जळगावातील तांबापुरा या भागात मुलांसाठी आम्ही सायं-शाळा सुरू केली. आज या शाळेत सुमारे ३0 मुलं-मुली शिकत आहेत. ही सर्व कचरावेचक अथवा कचरावेचकांची तसेच या परिसरात राहणार्या असंघटित कामगारांची मुलं आहेत. यापैकी बहुतांश मुलं ही एकतर शाळा सोडलेली किंवा कधीही शाळेत न गेलेली आहेत.
पुढील काळात संघटनेच्या माध्यमातून कागदी व कापडी पिशव्या तयार करणं, कागदाच्या लगद्यापासून वह्या तयार करणं ही कामं लवकर सुरू होतील.
कुष्ठरोग्यांच्या बाबतीत बाबा आमटे नेहमी ‘गिव्ह देम चान्स, नॉट चॅरिटी’ असं म्हणायचे. कचरावेचकांसोबत काम करताना त्यांच्यावर उपकार म्हणून काम न करता त्यांना आत्मसन्मानानं आणि स्वाभिमानानं आयुष्य जगता यावं म्हणून आम्ही प्रयत्न करत आहोत.
हळूहळू आमच्या कामाची सुरुवात होत आहे. उद्दिष्टांबाबत स्पष्टता येत आहे. अनेक लोकांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही एक एक पाऊल टाकत आहोत. धडपडत आहोत. परत उठून चालायला शिकत आहोत. स्पर्धा, पैसा आणि सत्ता यांच्या पलीकडे सामाजिक बांधिलकी असलेलं अर्थपूर्ण आयुष्य जगण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहोत.
- संपर्क dwaitdandwate@gmail.com