वीटभट्टी कामगाराचा मुलगा न्यायाधीश
By admin | Published: April 18, 2016 04:48 AM2016-04-18T04:48:45+5:302016-04-18T04:48:45+5:30
मातीने लिपलेल्या भिंतीचे घर. वर टिनाचा इमला. दरवाजा असून नसल्या सारखा. घरात अठराविश्व दारिद्र्य अशा परिस्थितीत
सुनील हिरास ल्ल दिग्रस
मातीने लिपलेल्या भिंतीचे घर. वर टिनाचा इमला. दरवाजा असून नसल्या सारखा. घरात अठराविश्व दारिद्र्य अशा परिस्थितीत दिग्रसच्या रमाईनगरातील एका वीटभट्टी कामगाराचा मुलगा न्यायाधीश झाला. वृत्तपत्र वाटून आणि प्रसंगी विटभट्टीवर राबून शिक्षण पूर्ण करणाऱ्या या तरुणाचे नाव आहे कुंडलिक सुधाकर खंडारे.
दिग्रसच्या रमाईनगरात खंडारे परिवार राहतो. सुधाकर खंडारे वीटभट्टीवर कामगार तर आई मिराबाई मोलमजुरी करून संसाराला हातभार लावते. अशा दाम्पत्याच्या पोटी कुंडलिक आणि सखाराम ही दोन मुले जन्माला आली. मात्र परिस्थितीचा बाऊ न करता परिस्थितीशी दोन हात करीत कुंडलिकने यश संपादित केले. त्याचे प्राथमिक शिक्षण नगर परिषदेच्या गवळीपुरा शाळेत झाले. त्यानंतर १२ वीपर्यंतचे शिक्षण राष्ट्रीय शाळेत घेतले. १२ वी नंतर स्थानिक कला महाविद्यालयातून बीए केले. शिक्षण घेत असताना पहाटे वृत्तपत्र वाटायचे आणि सुटीच्या दिवशी वीटभट्टीवर जाऊन मजुरी करायची, असा कुंडलिकचा दिनक्रम होता. अशा परिस्थितीत पदवी घेतल्यानंतर कुंडलिकने नागपूरच्या विधी महाविद्यालयात प्रवेश घेतला. एलएलबी करतानाही तो वडिलांसोबत वीटभट्टीवर काम करीत होता. दरम्यानच्या काळात त्याचे लग्नही झाले.
परंतु शिक्षणाचे ओढ स्वस्त बसू देत नव्हती. त्यामुळे नागपूर येथे राहून त्याने एलएलबी पूर्ण केले. ६२ टक्के गुणाने एलएलबी पास झाल्यानंतर नागपूरच्या उच्च न्यायालयात प्रॅक्टीस सुरू केली. सर्वसामान्यांना न्याय मिळावा म्हणून त्याने कमी शुल्कात आणि प्रसंगी मोफतही मार्गदर्शन केले. प्रॅक्टीस सुरू असतानाच कुंडलिकने एलएलएमला प्रवेश घेतला. ही परीक्षाही त्याने ८६ टक्के गुणाने उत्तीर्ण केली. दरम्यान उच्च न्यायालयात शासनासाठी कायदेवियषक सल्लागार म्हणून त्यांचे नामांकन झाले.
आपल्या समाजातील उच्च पदस्थ अधिकाऱ्यांकडे पाहून कुंडलिकच्या आकांशांनी पुन्हा भरारी घेण्याचे ठरविले. एमपीएससीच्या माध्यमातून न्यायाधीश पदाची तयारी केली आणि पहिल्याच प्रयत्नात तो उत्तीर्ण झाला. एका विटभट्टीवर राबणाऱ्या कामगाराचा मुलगा न्यायाधीश झाला. मात्र त्याचे यश पाहण्यासाठी त्याचे वडील सुधाकरराव आज हयात नाहीत. गत वर्षी पक्षाघाताने त्यांचे निधन झाले. आपल्या संघर्षाच्या काळात साथ देणाऱ्या भाऊ सखाराम याच्या शिक्षणासाठीही त्याने पुढाकार घेतला. मुलगा न्यायाधीश झाल्याचा आनंद आईच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसतो.
मला गरिबीची लाज नव्हती. परंतु गरीब परिस्थितीची चिड होती. यातून बाहेर पडण्याचा मी सातत्याने प्रयत्न केला. आज यश मिळाले. परंतु हा आनंदाचा क्षण पाहण्यासाठी आज वडील हवे होते, असे जड अंतकरणाने कुंडलिक सांगतो.