भारताने मालिका गमावली

By admin | Published: January 18, 2016 03:30 AM2016-01-18T03:30:39+5:302016-01-18T03:30:39+5:30

भारताची कमकुवत गोलंदाजी आणि खराब क्षेत्ररक्षणाचा लाभ घेत आॅस्ट्रेलियन फलंदाज ग्लेन मॅक्सवेलने (९६) आक्रमक खेळी करीत टीम इंडियाच्या मालिकेत कायम राहण्याच्या आशेवर पाणी फेरले.

India lost the series | भारताने मालिका गमावली

भारताने मालिका गमावली

Next

मेलबोर्न : भारताची कमकुवत गोलंदाजी आणि खराब क्षेत्ररक्षणाचा लाभ घेत आॅस्ट्रेलियन फलंदाज ग्लेन मॅक्सवेलने (९६) आक्रमक खेळी करीत टीम इंडियाच्या मालिकेत कायम राहण्याच्या आशेवर पाणी फेरले. मॅक्सवेलच्या जोरावर रविवारी खेळल्या गेलेल्या तिसऱ्या वन-डे सामन्यात यजमान संघाने भारताचा ३ गडी राखून पराभव केला व पाच सामन्यांच्या मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी मिळवून दिली.
आॅस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. भारताने विराट कोहलीचे (११७) शतक आणि शिखर धवन (६८) व अजिंक्य रहाणे (५०) यांच्या जोरावर ५० षटकांत ६ बाद २९५ धावांची आव्हानात्मक मजल मारली, पण आॅस्ट्रेलियाने हे लक्ष्य खुजे ठरवले. आॅस्ट्रेलियाने सात चेंडू शिल्लक राखून ७ गड्यांच्या मोबदल्यात २९६ धावा फटकावल्या.
यजमान संघातर्फे मॅक्सवेलने ८३ चेंडूत ८ चौकार व ३ षटकारांच्या साहाय्याने ९६ धावांची खेळी केली. मॅक्सवेल सामनावीर ठरला. आॅसीला विजयासाठी एक धाव आवश्यक असताना मॅक्सवेल बाद झाला. यानंतर फॉकनरने विजयाची औपचारिकता पूर्ण केली. शॉन मार्शने (६२) अर्धशतकी खेळी केली.
भारतातर्फे युवा गोलंदाज बरिंदर शरण सर्वांत महागडा ठरला. त्याने ८ षटकांत ६३ धावा बहाल केल्या. उमेश यादवने ९.५ षटकांत ६८ धावांत २, ईशांतने १० षटकांत ५३ धावांच्या मोबदल्यात २, तर जडेजाने ४९ धावांत २ बळी घेतले. गतवर्षी भारताने बांगलादेशमध्ये मालिका गमावली होती, तर त्यानंतर मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतही पराभव स्वीकारावा लागला होता.
आजच्या लढतीत पुन्हा एकदा भारतीय गोलंदाजांची कामगिरी निराशाजनक ठरली. अंतिम संघात कर्णधार धोनीने दोन बदल करताना आश्विनच्या स्थानी ऋषी धवनला, तर मनीष पांडेच्या स्थानी गुरकिरतला संधी दिली, पण निकाल मात्र बदलता आला नाही.
लक्ष्याचा पाठलाग करताना शॉन मार्श (७३ चेंडू, ६२ धावा) आणि अ‍ॅरोन फिंच (२१) यांनी सलामीला ४८ धावांची भागीदारी केली. यादवने फिंचला बाद करीत ही भागीदारी संपुष्टात आणली. त्यानंतर शॉन मार्शने कर्णधार स्मिथसह (४१) दुसऱ्या विकेटसाठी ६४ धावांची भागीदारी करीत डाव सावरला. स्मिथला माघारी परतवणाऱ्या जडेजाने त्यानंतर जॉर्ज बेलीला (२३) तंबूचा मार्ग दाखवीत भारताला तिसरे यश मिळवून दिले. मार्शला ईशांतने बाद करीत आॅस्ट्रेलियाची ४ बाद १६७ अशी अवस्था केली. त्यानंतर मॅक्सवेल व फॉकनर यांनी सातव्या विकेटसाठी ८० धावांची भागीदारी करीत संघाचा विजय निश्चित केला. मॅक्सेवल
४४ व्या षटकांत सुदैवी ठरला. त्या वेळी उमेश व रोहित यांच्यादरम्यान
ताळमेळ नसल्यामुळे मॅक्सवेल
धावबाद होण्यापासून बचावला. फॉकनरने २५ चेंडूंना सामोरे जाताना नाबाद २१ धावा केल्या. त्याआधी, जॉन हेस्टिंग्सच्या (४ बळी) अचूक माऱ्यापासून सावरताना भारताने निर्धारीत ५० षटकांत ६ बाद २९५ धावांची आव्हानात्मक मजल मारली. (वृत्तसंस्था)
भारत :-
रोहित शर्मा झे. वॅड गो. रिचर्डसन ०६, शिखर धवन त्रि. गो. हेस्टिंग्स ६८, विराट कोहली झे. बेली गो. हेस्टिंग्स ११७, अजिंक्य रहाणे झे. मॅक्सवेल गो. हेस्टिंग्स ५०, महेंद्रसिंह धोनी झे. मॅक्सवेल गो. हेस्टिंग्स २३, गुरकिरतसिंग मान त्रि. गो. फॉकनर ०८, रवींद्र जडेजा नाबाद ०६, ऋषी धवन नाबाद ०३. अवांतर (१४). एकूण ५० षटकांत ६ बाद २९५. गोलंदाजी : रिचर्डसन १०-०-४८-१, हेस्टिंग्स १०-०-५८-४, फॉकनर १०-०-६३-१, बोलांड ९-०-६३-०, मॅक्सवेल ९-०-४६-०, मार्श २-०-१२-०.
आॅस्ट्रेलिया :-
शॉन मार्श झे. धोनी गो. ईशांत ६२, अ‍ॅरोन फिंच झे. धोनी गो. यादव २१, स्टिव्हन स्मिथ झे. रहाणे गो. जडेजा ४१, जॉर्ज बेली यष्टिचित धोनी गो. जडेजा २३, मॅक्सवेल झे. धवन गो. यादव ९६, मिशेल मार्श धावबाद १७, मॅथ्यू वॅड झे. धवन गो. ईशांत ०६, फॉकनर नाबाद २१, हेस्टिंग्स नाबाद ००. अवांतर (९). एकूण ४८.५ षटकांत ७ बाद २९६. गोलंदाजी : यादव ९.५-०-६८-२, शरण ८-०-६३-०, ईशांत १०-०-५३-२, ऋषी धवन ६-०-३३-०, गुरकिरत ५-०-२७-०, जडेजा १०-०-४९-२.
सलग तिसऱ्या पराभवासह मालिका गमाविणे निराशाजनक आहे. आम्ही आव्हानात्मक धावसंख्या उभारली होती; पण सुमार क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजांची साधारण कामगिरी यामुळे आम्हाला आव्हान कायम राखता आले नाही. सुमार क्षेत्ररक्षणामुळे आम्हाला पराभव स्वीकारावा लागला. फलंदाजांनी त्यांची भूमिका चोख बजावली; पण गोलंदाजांनी मोक्याच्या क्षणी निराशा केली. - महेंद्रसिंह धोनी, कर्णधार
या लढतीत आमच्या गोलंदाजांची कामगिरी उल्लेखनीय ठरली. त्यांनी भारताला ३०० धावांत रोखण्याची कामगिरी केली. भारतीय गोलंदाजांनी मधल्या षटकांमध्ये चांगला मारा केला. आम्ही मोक्याच्या क्षणी महत्त्वाच्या विकेट गमावल्या; पण त्यानंतर मॅक्सवेलने चमकदार खेळी करीत संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. आज त्याने शानदार फलंदाजी केली. - स्टिव्हन स्मिथ, कर्णधार आॅस्ट्रेलिया
विराट सात हजारी मनसबदार
भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने तिसऱ्या वन-डेदरम्यान एबी डिव्हिलियर्सचा विक्रम मोडताना वन-डे क्रिकेटमध्ये जगात सर्वांत वेगवान सात हजार धावा पल्ला गाठण्याचा पराक्रम केला. २७ वर्षीय विराटने सामन्याच्या १० व्या षटकात जेम्स फॉकनरच्या गोलंदाजीवर चौकार वसूल करीत हा टप्पा गाठला. कोहलीने आपल्या कारकिर्दीत १६९ वा वन-डे सामना खेळताना १६१ व्या डावामध्ये हा पराक्रम केला.
यापूर्वीचा विक्रम दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज फलंदाज एबी डिव्हिलियर्सच्या नावावर होता. त्याने १७२ सामन्यांत १६६ डावांमध्ये हा पराक्रम केला होता. एबीने हा विक्रम आॅस्ट्रेलियाविरुद्ध पर्थमध्ये १४ नोव्हेंबर २०१४ रोजी नोंदवला होता. यापूर्वी भारतातर्फे सर्वांत वेगवान सात हजार धावा फटकावण्याचा विक्रम सौरव गांगुलीच्या नावावर होता. सौरवने १७४ डावांमध्ये हा विक्रम नोंदवला होता. कोहली वन-डेमध्ये सात हजार किंवा त्यापेक्षा अधिक धावा फटकावणारा जगातील ३६ वा, तर भारताचा आठवा फलंदाज आहे.

Web Title: India lost the series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.