पराभवाचा चौकार

By admin | Published: January 21, 2016 03:32 AM2016-01-21T03:32:07+5:302016-01-21T03:32:07+5:30

विराट कोहली आणि शिखर धवन यांच्या झुंजार द्विशतकी भागीदारीनंतरही भारताने चौथ्या वन डेतही पराभवाची नामुष्की ओढावून घेतली. केवळ ४६ धावांमध्ये तब्बल ९ फलंदाज एका पाठोपाठ

Defeat fours | पराभवाचा चौकार

पराभवाचा चौकार

Next

कॅनबेरा : विराट कोहली आणि शिखर धवन यांच्या झुंजार द्विशतकी भागीदारीनंतरही भारताने चौथ्या वन डेतही पराभवाची नामुष्की ओढावून घेतली. केवळ ४६ धावांमध्ये तब्बल ९ फलंदाज एका पाठोपाठ एक तंबूत परतल्याने भारताच्याच अंगावर पराभवाचा चौथा ओरखडा ओढला गेला. बुधवारी खेळल्या गेलेल्या सामन्यात विजयापर्यंत पोहोचूनदेखील भारत केवळ २५ धावांनी पराभूत झाला. आॅस्ट्रेलियाने ५ सामन्यांच्या मालिकेत ४-० अशी आघाडी कायम केली.
अ‍ॅरोन फिंचचे शानदार शतक आणि डेव्हिड वॉर्नरच्या ९३ धावांच्या बळावर नाणेफेक जिंकणाऱ्या आॅस्ट्रेलियाने ८ बाद ३४८ धावा उभारल्या. प्रत्युत्तरात भारतानेही ३८ व्या षटकापर्यंत १ बाद २७७ अशी दणकेबाज वाटचाल केली. पण ४६ धावांत ९ फलंदाजांनी गुडघे टेकताच लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला. आॅस्ट्रेलियासाठी केन रिचर्डसन याने १० षटकांत ६८ धावा देत ५ गडी बाद केले. कोहली-धवन यांनी दुसऱ्या गड्यासाठी २१२ धावांची भागीदारी करीत विजयाचा मार्ग सुकर केला होता. पण निर्णायक क्षणी फलंदाजांची बेजबाबदारवृत्ती आत्मघातकी ठरली.
कोहलीने ९२ चेंडूत ११ चौकार व एका षटकारासह १०६ धावा ठोकल्या. त्याचे हे २५ वे शतक होते. धवनने दीर्घकाळानंतर ११३ चेंडूत १४ चौकार व दोन षटकारांसह १२६ धावा फटकावल्या. त्याआधी रोहित शर्माने (४१ धावा) धवनसोबत आठ षटकांत ६५ धावा केल्या. रिचर्डसनने रोहितला बाद केले. धवन-कोहली तुफान हल्ला केल्याने भारत जिंकेल असे वाटत होते. पण हेस्टिंग्जने ३८ व्या षटकात धवनला जॉर्ज बेलीकरवी बाद करीत धक्का दिला.
खराब फॉर्ममध्ये असलेला कर्णधार धोनी भोपळा न फोडताच बाद झाला. ४० व्या षटकांत कोहली बाद होताच अवसान गळाले. हातावर चार टाके लागल्यानंतरही जखमी रहाणे मैदानावर आला. तो दोन धावा काढून परतला. गुरकिरत मान (५), रिषी धवन (९) हे दडपणात स्थिरावू शकले नाहीत.
भारतीय कर्णधार महेंद्रसिंह धोनीची विकेट हा सामन्याचा टर्निंग पॉर्इंट ठरला, असे मत सामनावीर केन रिचर्डसन याने व्यक्त केले.
अजिंक्य रहाणे फिट नसल्याने शिखर, विराट आणि धोनीवर जबाबदारी होती. या तिघांना बाद केले की भारतीय संघ दबावात येईल याची आम्हाला जाणीव होती.
पुढची फळी अनुभवहीन असल्याने जडेजावर सर्व काही अवलंबून असणार होते. परंतु एका षटकाने सामन्याचे चित्र बदलले.
रहाणे दुखापतग्रस्त, खेळणे शंकास्पद
कॅनबेरा : स्टार फलंदाज अजिंक्य रहाणे हा बुधवारी आॅस्ट्रेलियाविरुद्ध चौथ्या वन डे दरम्यान क्षेत्ररक्षण करताना जखमी झाला. रहाणेच्या उजव्या हाताला चार टाके लागले आहेत. तरीही तो फलंदाजीसाठी आला होता. २३ जानेवारी रोजी सिडनीतील पाचव्या वन डेत त्याचे खेळणे शंकास्पद वाटते. हाताचे टाके आठवडाभारात काढण्यात येणार आहेत. तरीही टी-२० मालिका तो खेळेलच हे ठामपणे सांगता येणार नाही. जखमी होताच रहाणे मैदानाबाहेर गेला. त्याचे स्थान मनीष पांडे याने घेतले.
आम्ही बाजी उलटविली
‘‘रिचर्डसनच्या माऱ्याच्या बळावर आम्ही बाजी फिरविण्यात यशस्वी ठरलो. विजयाचे श्रेय कधी पराभव न स्वीकारणाऱ्या सांघिक वृत्तीला जाते. विराट-धवन खेळत असताना आम्हाला मैदानात १५-१६ क्षेत्ररक्षकांची गरज आहे असे वाटत होते. पण संधी मिळताच लाभ घेत संघर्ष केला. त्याचे हे फळ आहे.’’
- स्टीव्हन स्मिथ, कर्णधार आॅस्ट्रेलिया
हेल्मेट घालून अम्पायर मैदानात...
कॅनबेरा : भारत - आॅस्टे्रलिया मधील चौथ्या सामन्यात हेल्मेट घातलेले अम्पायर जॉन वॉर्ड चर्चेचे विषय ठरले.
आॅस्टे्रलियाचा फलंदाज अ‍ॅरोन फिंचने मारलेला चेंडू अम्पायर रिचर्ड केटेलबरो यांच्या उजव्या पायाला लागल्याने त्यांना मैदानाबाहेर जावे लागले आणि त्यांच्या जागी हेल्मेट घालून वॉर्ड आले. याआधी त्यांनी बिग बैश स्पर्धेत हेल्मेट घालून पुनरागमन केले होते. पुनरागमन यासाठी, कारण गतवर्षी डिसेंबर महिन्यात भारतात रणजी स्पर्धेत तमिळनाडू-पंजाब या सामन्यादरम्यान डोक्याला चेंडू लागल्याने ते क्रिकेटपासून दूर होते. यावेळी त्यांना रुग्णालयात भरती व्हावे लागले होते.
धोनीने स्वीकारली पराभवाची जबाबदारी
आॅस्ट्रेलियाविरुद्ध चौथ्या वन डेत फलंदाजी ढासळण्याची संपूर्ण जबाबदारी स्वत:च्या शिरावर घेत, या पराभवासाठी स्वत: जबाबदार असल्याची कबुली कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने दिली. कोहली आणि शिखर धवन यांच्या शतकी खेळीनंतर संघाला विजयी लक्ष्य गाठून देण्याची जबाबदारी माझी होती आणि मी त्यात अपयशी ठरलो, असे धोनीने सामन्यानंतर मान्य केले.
३४९ धावांचे लक्ष्य गाठतेवेळी संघाची स्थिती एक बाद २७७ अशी भक्कम होती पण ४६ धावांत नऊ फलंदाज बाद होताच ती सर्वबाद ३२३ झाली.
यावर धोनी म्हणाला, ‘ मी नाराज नाही, पण निराश आहे. या सामन्यात आम्ही उत्कृष्ट फलंदाजी करू शकलो असतो. डाव पुढे नेणे माझी जबाबदारी होती पण मीच बाद झालो. या पराभवाची जबाबदारी स्वीकारतो. युवा खेळाडूंवरही दडपण होते. आंतरराष्ट्रीय क्रिकेट दडपणात खेळले जात असल्याने योग्य फटका मारण्यासाठी झटपट विचार करावाच लागतो.’
धोनीने विराट आणि धवन यांचे कौतुक केले. तो पुढे म्हणाला, ‘दोघांनीही अप्रतिम फलंदाजी केली.’ त्याचवेळी गेल्या पाच वर्षांत फिरकीपटूंसह आमचा वेगवान मारादेखील निश्चित नसल्याने काही अतिरिक्त धावा मोठ्या प्रमाणावर जात असल्याकडे धोनीने लक्ष वेधले.
धा व फ ल क
आॅस्ट्रेलिया : डेव्हिड वॉर्नर त्रि. गो. ईशांत ९३, अ‍ॅरोन फिंच झे. ईशांत गो. यादव १०७, मिशेल मार्श झे. कोहली गो. यादव ३३, स्टीव्ह स्मिथ झे. गुरकिरत गो. ईशांत ५१, ग्लेन मॅक्सवेल झे. मनीष पांडे गो. ईशांत ४१, जॉर्ज बेली झे. रोहित गो. ईशांत १०, जेम्स फॉल्कनर त्रि. गो. यादव ००, मॅथ्यू वेड धावबाद ००, जॉन हेस्टिंग्स नाबाद ००, अवांतर १३, एकूण : ५० षटकांत ८ बाद ३४८ धावा. गडी बाद क्रम : १/१८७, २/२२१, ३/२८८, ४/२९८, ५/३१९, ६/३१९, ७/३२१, ८/३४८.
गोलंदाजी : यादव १०-१-६७-३, भुवनेश्वर ८-०-६९-०, ईशांत १०-०-७७-४, गुरकिरत ३-०-२४-०, धवन ९-०-५३-०, जडेजा १०-०-५१-०.
भारत : रोहित शर्मा झे. वेड गो. रिचर्डसन ४१,
शिखर धवन झे. बेली गो. हेस्टिंग्ज १२६, विराट कोहली झे. स्मिथ गो. रिचर्डसन १०६, महेंद्रसिंग धोनी झे. वेड गो. हेस्टिंग्ज ००, गुरकिरत झे. मार्श गो. लियॉन ५, रवींद्र जडेजा नाबाद २४, अजिंक्य रहाणे झे. स्मिथ गो. रिचर्डसन २, रिषी धवन झे. वॉर्नर गो. रिचर्डसन ९, भुवनेश्वर कुमार झे. स्मिथ गो. रिचर्डसन २, उमेश यादव झे. बेली गो. मार्श २, ईशांत शर्मा
झे. वेड गो. मार्श ००, अवांतर ६, एकूण : ४९.२ षटकांत सर्वबाद ३२३ धावा.
गडी बाद क्रम : १/६५, २/२७७, ३/२७७, ४/२७८, ५/२८६, ६/२९४, ७/३०८, ८/३११, ९/३१५, १०/३२३.
गोलंदाजी : लियॉन १०-०-७६-१, रिचर्डसन १०-१-६८-५, हेंस्टिंग्ज १०-०-५०-२, फॉल्कनर ७-०-४९-०, मार्श ९.२-०-५५-२, मॅक्सवेल १-०-१०-०, स्मिथ २-०-१६-०.

Web Title: Defeat fours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.