रहाणे,पांडे यांच्यात चुरस
By admin | Published: February 5, 2016 03:33 AM2016-02-05T03:33:27+5:302016-02-05T03:33:27+5:30
टी-२० विश्वचषक तसेच आशियता चषकासाठी भारतीय क्रिकेट संघ निवडताना अजिंक्य रहाणे आणि मनीष पांडे यांच्यापैकी सातव्या स्थानावर कुणाला संधी द्यावी यावरून निवडकर्त्यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली : टी-२० विश्वचषक तसेच आशियता चषकासाठी भारतीय क्रिकेट संघ निवडताना अजिंक्य रहाणे आणि मनीष पांडे यांच्यापैकी सातव्या स्थानावर कुणाला संधी द्यावी यावरून निवडकर्त्यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.
भारताने आॅस्ट्रेलियात क्लीन स्वीप केल्याने अनदेक खेळाडूंचा संघात दावा वाढला. एक ते सहा स्थानासाठी तितकीशी स्पर्धा असणार नाही पण सातव्या स्थानावर फलंदाजीची संधी कुणाला द्यावी याबद्दल दुमत आहे. मनीष पांडे हा टी-२० त रहाणेच्या तुलनेत सरस आहे किंवा नाही, याचा वेध घेणे निवडकर्त्यांना कठीण जात आहे. भारताचा अव्वल स्थानावरील फलंदाज विराट कोहली याला लंकेविरुद्ध विश्रांती देण्यात आली आहे. यामुळेच फॉर्ममध्ये असलेल्या मनीष पांडेच्या संघातील समावेशाचे काम काहीसे सोपे झाले. कोहली हा बांगला देशात आशिया चषकादरम्यान संघात दाखल होईल तेव्हा टी-२० विश्वचषकासाठी निवडण्यात आलेल्या १५ खेळाडूंपैकी किमान एकावर टांगती तलवार असेल. टी-२० विश्वचषकासाठी आज शुक्रवारी संघ निवड होणार आहे. रोहित शर्मा, विराट कोहली, शिखर धवन, सुरेश रैना, युवराजसिंग, एम.एस. धोनी यांची निवड निश्चित मानली जात असल्याने सर्वांच्या नजरा असतील त्या अजिंक्य रहाणेच्या निवडीकडे.
रहाणेच्या क्लासबाबत कुणाला शंका असण्याचे कारण नाही. पण टी-२० मध्ये एक दोन धावा घेण्याच्या रहाणेच्या तंत्रावर धोनीने सवाल उपस्थित केला. रहाणेचा आॅस्ट्रेलियातील तिन्ही टी-२० सामन्यांत समावेश नव्हता. याचा अर्थ तो संघ व्यवस्थापनाच्या भविष्यकालीन योजनांचा भाग नाही. दौऱ्यातील तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात अखेरच्या षटकातील दोन चेंडूंवर युवराजने केलेल्या चमत्कारामुळे त्याचे स्थान निश्चित झाले आहे. याशिवाय २०११ च्या विश्वचषकात त्याने घेतलेले १५ बळीदेखील ध्यानात घेण्यात आले. धोनीने दिलेल्या संकेतानुसार कोअर संघ आधीच तयार आहे. केवळ एक दोन किरकोळ बदल होतील. ज्याच्या नावाचा विचार होऊ शकतो असा आणखी एक खेळाडू म्हणजे इरफान पठाण. त्याने आपल्या कामगिरीच्या बळावर मुश्ताक अली क्रिकेट करंडकात बडोद्याला अंतिम फेरी गाठून दिली होती. आशिष नेहराला देखील कव्हर करण्यासाठी ठेवले जाऊ शकते. हार्दिक पंड्याने देखील सीनियर खेळाडूंना प्रभावित केले आहे.
नेगी हा रवींद्र जडेजासाठी कव्हर म्हणून काम करेल. अक्षर पटेलची फलंदाजी समाधानकारक नाही तर दिल्ली संघाचा नेगी हा आठव्या आणि नवव्या स्थानावर देखील लांब फटकेबाजी करू शकतो. हरभजनसिंग याला देखील अश्विनला पर्याय म्हणून निवडले जाऊ शकते. अश्विन अपयशी ठरला तर भज्जीला संधी मिळेल. भुवनेश्वर कुमार जखमांमधून सावरल्यानंतर संघात परतला. त्याला संधी दिल्यास प्रभारी मारा करू शकतो.(वृत्तसंस्था)