पाक संघ भारतात दाखल
By admin | Published: March 13, 2016 04:24 AM2016-03-13T04:24:16+5:302016-03-13T04:24:16+5:30
शाहीद आफ्रिदीच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान संघ आयसीसी विश्वकप टी-२० स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शनिवारी सायंकाळी कोलकात्यामध्ये दाखल झाला.
कोलकाता : शाहीद आफ्रिदीच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान संघ आयसीसी विश्वकप टी-२० स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शनिवारी सायंकाळी कोलकात्यामध्ये दाखल झाला.
पाक संघाच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावर कडक सुरक्षाव्यवस्था होती. पाकिस्तान संघ अबुधाबीमार्गे कोलकात्यामध्ये दाखल झाला. पाकिस्तान संघात १५ खेळाडू आणि सपोर्ट स्टाफच्या १२ सदस्यांचा समावेश आहे.
त्याआधी, पाक संघ कडक सुरक्षाव्यवस्थेत कराचीच्या अलामा इकबाल आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचला आणि अबुधाबीसाठी रवाना झाला. शुक्रवारी भारताचे गृहमंत्री राजनाथ सिंहांपासून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि कोलकाता पोलीस विभागाने सुरक्षाव्यवस्था पुरवण्याचे आश्वासन दिल्यानंतर पाकिस्तानचे गृहमंत्री चौधरी निसार खान यांनी पाकच्या राष्ट्रीय संघाला भारतात जाण्यास मंजुरी दिली.
भारताकडे रवाना होण्यापूर्वी पाकिस्तानचे मुख्य प्रशिक्षक वकार युनूस यांनी टिष्ट्वटरवर त्याची माहिती दिली. वकारने टिष्ट्वट केले, की विश्वकप स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आम्ही भारतात जात आहोत. जर आम्ही स्पर्धेतून माघार घेतली असती, तर विश्वक्रिकेटवर त्याचा वाईट परिणाम झाला असता. आता स्थिती पूर्वीच्या तुलनेत चांगली झाली असून, उभय देशांनी स्थिती सावरण्यास महत्त्वाची भूमिका बजावली.
पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार भारत-पाक लढत १९ मार्च रोजी धरमशालामध्ये होणार होती; पण सुरक्षेचा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर ही लढत कोलकात्यामध्ये स्थानांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला. पाक संघ उशिरा दाखल झाल्यामुळे त्यांचा शनिवारी बंगाल रणजी संघासोबत होणारा सराव सामना रद्द करण्यात आला.आम्हाला अद्याप एक सराव सामना खेळण्याची संधी आहे. श्रीलंकेविरुद्धचा सराव सामना राऊंड रॉबिन फेरीच्या पार्श्वभूमीवर आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. त्यात आम्ही चमकदार कामगिरी करण्यास प्रयत्नशील आहोत. भारतात आमचा चांगला पाहुणचार होतो, याची आम्हाला कल्पना आहे. पाकचे खेळाडू आणि अधिकारी वारंवार भारत दौऱ्यावर असतात. सुरक्षेचा मुद्दा आम्ही बोर्डावर सोडलेला असून, या वादाचा आमच्या कामगिरीवर परिणाम होणार नाही. आम्ही खेळावर लक्ष केंद्रित करण्यास प्रयत्नशील आहोत.
- वकार यूनीस