जिंकवलंस रे ‘विराट’...

By admin | Published: March 28, 2016 03:51 AM2016-03-28T03:51:33+5:302016-03-28T03:51:33+5:30

गोलंदाजांच्या नियंत्रित माऱ्यानंतर धडाकेबाज विराट कोहलीच्या शानदार नाबाद ८२ धावांच्या दणकेबाज खेळीच्या जोरावर टीम इंडियाने कांगारूंचा ६ विकेटने फडशा पाडला आणि टी-२० विश्वचषक

Jeongvalans Re 'Virat' ... | जिंकवलंस रे ‘विराट’...

जिंकवलंस रे ‘विराट’...

Next

मोहाली : गोलंदाजांच्या नियंत्रित माऱ्यानंतर धडाकेबाज विराट कोहलीच्या शानदार नाबाद ८२ धावांच्या दणकेबाज खेळीच्या जोरावर टीम इंडियाने कांगारूंचा ६ विकेटने फडशा पाडला आणि टी-२० विश्वचषक स्पर्धेची दिमाखात उपांत्य फेरी गाठली. मुंबईत ३१ मार्चला वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या उपांत्य लढतीत यजमानांसमोर आव्हान असेल ते आक्रमक वेस्ट इंडीजचे.
पंजाब क्रिकेट असोसिएशच्या स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारलेल्या आॅस्टे्रलियाने २० षटकांत ६ बाद १६० अशी समाधानकारक मजल मारली. विराट कोहलीच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर भारताने ५ चेंडू राखून विजयी लक्ष्य गाठले. सलग तिसऱ्या सामन्यात निर्णायक फलंदाजी केलेला विराट सामनावीर ठरला. विराटने ५१ चेंडंूत ९ चौकार व २ षटकार खेचत नाबाद ८२ धावांचा विजयी तडाखा दिला.
रोहित शर्मा व शिखर धवन यांनी सावध सुरुवात करताना खेळपट्टीचा अंदाज घेतला. धवनने एक चौकार व एक षटकारासह आॅसीवर दडपण आणण्याचा प्रयत्न केला. नॅथन कॉल्टर - नीलने धवनला बाद करून ही जोडी फोडली. यानंतर रोहित आणि सुरेश रैनाही फारशी चमक न दाखवता परतल्याने भारताची ३ बाद ४९ अशी अवस्था झाली. विराट - युवराज सिंग यांनी ४५ धावांची भागीदारी करून संघाला सावरले; मात्र क्रॅम्पमुळे हालचालींवर मर्यादा आल्याने तो आक्रमणाच्या नादात झेलबाद झाला. यानंतर खेळपट्टीवर ठाण मांडलेल्या विराटने कर्णधार महेंद्रसिंह धोनीसह संघाची पडझड रोखत टीम इंडियाचा उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित केला.
विराटने ३९ चेंडंूत अर्धशतक पूर्ण केल्यानंतर कांगारूंवर जबरदस्त हल्ला चढवला. अखेरच्या ३ षटकांत ३९ धावांची आवश्यकता असताना, त्याने फॉल्कनरच्या षटकात दोन चौकार व एका षटकारासह १९ धावा वसूल केल्या, तर १९व्या षटकात कॉल्टर - नीलला चार चौकार खेचताना त्याने आॅसीच्या हातून सामना हिसकावून घेतला. अखेरच्या षटकात ४ धावांची गरज असताना धोनीने आपल्या फिनिशर स्टाइलने फॉल्कनरला चौकार मारून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
तत्पूर्वी, सुरुवातीला झालेल्या धुलाईनंतर ठिकाणावर आलेल्या गोलंदाजांनी नियंत्रित मारा केल्याने आॅस्टे्रलियाचा डाव २० षटकांत ६ बाद १६० असे रोखला गेला. अखेरच्या षटकांत केलेल्या फटकेबाजीमुळे आॅसीला दीडशेचा पल्ला गाठण्यात यश आले. उस्मान ख्वाजा - अ‍ॅरॉन फिंच यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे आॅसीने चौथ्याच षटकात बिनबाद ५३ अशी जबरदस्त सुरुवात केली. पुढच्याच षटकात नेहराने ख्वाजाचा बळी घेतला. आश्विनने धोकादायक डेव्हीड वॉर्नरला फारवेळ टिकू दिले नाही. यानंतर ‘लोकल बॉय’ युवराजने कर्णधार स्टीव्ह स्मिथला माघारी धाडल्याने आॅसीचा डाव ३ बाद ७४ असा घसरला. या वेळी भारतीयांनी पकड मिळवली असली, तरी फिंचमुळे आॅस्टे्रलियाची धावसंख्या वाढत होती. १३व्या षटकात हार्दिक पांड्याने फिंचला बाद केले. फिंचने ३४ चेंडंूत ३ चौकार व २ षटकरांसह ४३ धावा फटकावल्या. यानंतर ग्लेन मॅक्सवेल आणि शेन वॉटसन यांनी संघाला दीडशेचा पल्ला गाठून दिला.

नंबर गेम...
विराट कोहली
२०१५-१६ मध्ये ४ डावांत १८४ धावा केल्या आहेत. यामध्ये तो दोन वेळा नाबाद राहिला. त्याची सर्वाेच्च धावसंख्या नाबाद ८२ आहे. त्याने १८ चौकार व ४ षटकार ठोकले. त्याचा स्ट्राईक रेट १३२.३७ असा राहिला आहे.
२०१०-१६ दरम्यान ३९ डावांत १५५२ धावा केल्या आहेत. यामध्ये नाबाद ९० ही त्याची सर्वाेच्च धावसंख्या आहे. यामध्ये त्याने १६२ चौकार व ३१ षटकारांसह १५ अर्धशतके ठोकली आहेत.

शेन वॉटसनचा निरोप....
या स्पर्धेनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करणार असल्याचे घोषित केलेल्या आॅस्टे्रलियाचा अष्टपैलू शेन वॉटसनसाठी ही अखेरची लढत ठरली. या सामन्यात त्याने नाबाद १८ धावा आणि २ बळी, अशी शानदार अष्टपैलू खेळी करून संघाच्या विजयासाठी चांगले प्रयत्न केले. मात्र, विराटच्या खेळीपुढे तो अपयशी ठरला. यापुढे वॉटसन बिग बॅशसह इतर टी-२० लीगमध्ये खेळताना दिसेल.

माझ्या कारकिर्दीतील आजवरची ही सर्वोत्तम खेळी ठरली. युवराजसह केलेली भागीदारी खूप महत्त्वाची ठरली, तर यानंतर धोनीने मला शांत राहण्यास मदत केली. आमच्यामध्ये चांगले सामंजस्य असल्याने आम्ही नेहमी वेगात धावा पळतो. माझ्या ‘टॉप थ्री’ इनिंगपैकी ही एक खेळी निश्चित आहे. तसेच यावेळी भारतीय प्रेक्षकांचा मिळालेला पाठिंबा महत्त्वाचा ठरला. त्यांच्या पाठिंब्यामुळे प्रतिकूल परिस्थितीतून विजयी मार्गावर येण्यासाठी प्रोत्साहन मिळाले.
- विराट कोहली

विराटच्या फलंदाजीचा आनंद घेण्याची ही पहिलीच वेळ नव्हती. तो शानदार फलंदाजी करीत आहेच. केवळ त्याच्यावर विसंबून राहता कामा नये. इतरांनीही सातत्याने धावा काढणे आवश्यक आहे. - महेंद्रसिंग धोनी

धावफलक :
आॅस्टे्रलिया : उस्मान ख्वाज झे. धोनी गो. नेहरा २६, अ‍ॅरोन फिंच झे. धवन गो. पांड्या ४३, डेव्हीड वॉर्नर यष्टीचीत धोनी गो. आश्विन ६, स्टीव्ह स्मिथ झे. धोनी गो. युवराज २, ग्लेन मॅक्सवेल त्रि. गो. बुमराह ३१, शेन वॉटसन नाबाद १८, जेम्स फॉल्कनर झे. कोहली गो. पांड्या १०, पीटर नेव्हील नाबाद १०. अवांतर - १४. एकूण : २० षटकांत ६ बाद १६० धावा.
गोलंदाजी : आशिष नेहरा ४-०-२०-१; जसप्रीत बुमराह ४-०-३२-१; रविचंद्रन अश्विन २-०-३१-१; रवींद्र जडेजा ३-०-२०-०; युवराज सिंग ३-०-१९-१; हार्दिक पांड्या ४-०-२६-२.
भारत : रोहित शर्मा त्रि. गो. वॉटसन १२, शिखर धवन झे. ख्वाजा गो. कॉल्टर - नील १३, विराट कोहली नाबाद ८२, सुरेश रैना झे. नेव्हील गो. वॉटसन १०, युवराज सिंग झे. वॉटसन गो. फॉल्कनर २१, महेंद्रसिंह धोनी नाबाद १८. अवांतर - ५. एकूण : १९.१ षटकांत ४ बाद १६१ धावा; गोलंदाजी : जोश हेजलवूड ४-०-३८-०; नॅथन कॉल्टर - नील ४-०-३३-१; शेन वॉटसन ४-०-२३-२; जेम्स फॉल्कनर ३.१-०-३५-१; ग्लेन मॅक्सवेल २-०-१८-०; अ‍ॅडम झम्पा २-०-११-०.

Web Title: Jeongvalans Re 'Virat' ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.