आयपीएलमधील १ मे रोजीचा सामना पुण्यातच
By admin | Published: April 21, 2016 05:19 AM2016-04-21T05:19:47+5:302016-04-21T05:19:47+5:30
रायझिंग पुणे सुपरजायंंट व मुंबई इंडियन्समध्ये १ मे रोजी होणारा आयपीएल सामना पुण्यात खेळण्यास उच्च न्यायालयाने बीसीसीआयला परवानगी दिली.
रायझिंग पुणे सुपरजायंंट व मुंबई इंडियन्समध्ये १ मे रोजी होणारा आयपीएल सामना पुण्यात खेळण्यास उच्च न्यायालयाने बीसीसीआयला परवानगी दिली. ३० एप्रिलनंतरचे आयपीएलचे सामने राज्याबाहेर हलवण्याचा आदेश उच्च न्यायालयाने बीसीसीआयला आठवडाभरापूर्वी दिला होता. त्यानंतर १ मेचा आयपीएल सामना पुण्याच्या एमसीए स्टेडियममध्ये खेळण्याची परवानगी मागण्यासाठी बीसीसीआयने उच्च न्यायालयात अर्ज केला.
एका दिवसात विशाखापट्टणमला सोय करणे कठीण आहे, असे म्हणत बीसीसीआयने १ मेचा सामना पुण्यामध्येच खेळण्याची परवानगी न्या. व्ही.एम. कानडे व न्या. एम.एस. कर्णिक यांच्या खंडपीठाकडे मागितली. ‘ही स्थिती अपवादात्मक असल्याने व एका दिवसात सामन्याची तयारी अन्य स्टेडियमवर करणे अशक्य असल्याचे कारण बीसीसीआयने दिल्याने आम्ही त्यांची विनंती मान्य करत आहोत. १ मेचा सामना पुण्यामध्ये खेळण्याची परवानगी आम्ही देत आहोत,’ असे म्हणत खंडपीठाने बीसीसीआयला दिलासा दिला.
> सामना इतरत्र हलवण्यातील अडचण काय?
२९ एप्रिल रोजी पुण्याची लढत गुजरातबरोबर पुण्यातच होणार आहे. त्यामुळे बीसीसीआय व पुण्याच्या आयोजकांना १ मेचा सामना एका दिवसात अन्य ठिकाणी हलवणे अशक्य आहे. राज्याबाहेर सामना ठेवला तर पुणे संघाच्या खेळाडूंना आणि कर्मचाऱ्यांना ३० एप्रिलला दुपारनंतरच हलवणे शक्य आहे. कारण २९ एप्रिलचा सामना रात्री खेळला जाणार आहे.