सिंधूवर अभिनंदनाचा वर्षाव !

By Admin | Published: August 20, 2016 05:38 AM2016-08-20T05:38:55+5:302016-08-20T05:38:55+5:30

काँगेस अध्यक्ष सोनिया गांधी, भाजप अध्यक्ष अमित शाह, गृहमंत्री राजनाथसिंग, वस्त्रोद्योगमंत्री स्मृती इराणी, केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी

Rain congratulations on Sindhu! | सिंधूवर अभिनंदनाचा वर्षाव !

सिंधूवर अभिनंदनाचा वर्षाव !

googlenewsNext

नवी दिल्ली : काँगेस अध्यक्ष सोनिया गांधी, भाजप अध्यक्ष अमित शाह, गृहमंत्री राजनाथसिंग, वस्त्रोद्योगमंत्री स्मृती इराणी, केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी सिंधूचे अभिनंदन केले. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, आंध्रचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू, प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी,आॅलिम्पिक पदक विजेते केंद्रीय मंत्री राज्यवर्धनसिंग राठोड, केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन, सोनिया गांधींनी सिंधूचे पदक हे भारतमातेच्या मुकुटातील अमूल्य ‘हिरा’ असल्याचे सांगून भावी पिढीसाठी सिंधूची कामगिरी प्रेरणादायी असेल, असे संदेशात म्हटले आहे.
माजी दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, नेमबाज अभिनव बिंद्रा, टेनिसपटू लियांडर पेस, महानायक अमिताभ बच्चन, सुपरस्टार रजनीकांत, बुद्धिबळाचा राजा विश्वनाथन आनंद, बिलियार्डस् चॅम्पियन पंकज अडवाणी, व्यावसायिक बॉक्सर विजेंदरसिंग, ग्रॅण्डस्लॅम चॅम्पियन महेश भूपती, भारतीय हॉकी संघाचा कर्णधार पी. आर. श्रीजेश, आॅलिम्पिक बॉक्सर शिवा थापा आदींनी सिंधूची पाठ थोपटली आहे.

राष्ट्रपती, पंतप्रधानांकडून अभिनंदन!
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रौप्य विजेत्या सिंधूचे अभिनंदन करीत भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. ‘देशासाठी गौरवपूर्ण क्षण. तू शानदार खेळ केलास! रौप्य जिंकून ऐतिहासिक कामगिरी केल्याबद्दल अभिनंदन!’, असे राष्ट्रपतींनी म्हटले आहे. मोदी यांनी टिष्ट्वटरवर लिहिले,‘ तुझी झुंजारवृत्ती दीर्घकाळ स्मरणात राहील. उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा!’ भारतीय आॅलिम्पिक संघटनेचे माजी अध्यक्ष तसेच अ.भा. क्रीडा परिषदेचे प्रमुख विजय कुमार मल्होत्रा यांनीदेखील सिंधूचे अभिनंदन केले.

खेळ भावनेची झलक
मारिनने विजयावर शिक्कामोर्तब केले आणि कोर्टवर चक्क ठाण मांडले. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहात होते. त्याचवेळी सिंधूने तिच्याकडे धाव घेतली. मारिनला आलिंगन देत सिंधूने खेळभावनेचा परिचय दिला.

मुलीचे यश अप्रतिम : रमण्णा
बॅडमिंटनमध्ये आॅलिम्पिक रौप्य पदक विजेत्या पी. व्ही. सिंधूवर वडील पी. व्ही. रमण्णा व आई विजया यांना गर्व वाटतो. माझ्या मुलीची कामगिरी अप्रतिम असल्याची त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अर्जुन पुरस्काराचे मानकरी असलेले माजी आंतरराष्ट्रीय व्हॉलिबॉलपटू रमण्णा पुढे म्हणाले,‘ सिंधू आणि कोच पुलेला गोपीचंद यांनी केलेल्या कठोर तपश्चर्येचा हा सुखद परिणाम आहे.

लक्षवेधी...
२१ वर्षांची सिंधू आॅलिम्पिक वैयक्तिक रौप्य जिंकणारी चौथी भारतीय खेळाडू ठरली. नेमबाज राज्यवर्धनसिंग राठोड(२००४ अथेन्स), नेमबाज विजय कुमार (२०१२ लंडन) आणि मल्ल सुशील कुमार(२०१२ लंडन)यांनी यापूर्वी रौप्यपदक जिंकले होते. विश्व चॅम्पियनशिपची दोन वेळा कांस्य विजेती असलेली सिंधू भारतासाठी आॅलिम्पिक पदक जिंकणारी पाचवी महिला आणि रौप्य पदक जिंकणारी पहिलीच महिला खेळाडू ठरली.

बक्षीसांचाही वर्षाव!
‘बाई’कडून सिंधूला ५०, गोपीचंद यांना १० लाख
भारतीय बॅडमिंटन संघटनेने (बाई) पी.व्ही. सिंधूला रौप्य पदकाबद्दल ५० लाखाचा रोख पुरस्कार आणि प्रशिक्षक गोपीचंद यांना १० लाख रुपये देण्याची घोषणा केली.
मध्य प्रदेशकडून सिंधूला ५० लाख
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी सिंधूचे अभिनंदन करीत ५० लाखाचा पुरस्कार देण्याची घोषणा केली.
फुटबॉल महासंघ : सिंधू-साक्षीला प्रत्येकी ५ लाख
अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे (एआयएफएफ) अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी सिंधू व साक्षी मलिक यांना प्रत्येकी ५ लाख देण्याची घोषणा केली आहे.

Web Title: Rain congratulations on Sindhu!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.