भारतीय महिला हॉकी संघाची आगेकूच
By admin | Published: November 2, 2016 07:11 AM2016-11-02T07:11:42+5:302016-11-02T07:11:42+5:30
चौथ्या महिला आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत मंगळवारी साखळी फेरीतील तिसऱ्या लढतीत मलेशियाचा २-० ने पराभव केला
सिंगापूर : भारतीय महिला संघाने कामगिरीत सातत्य राखताना चौथ्या महिला आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत मंगळवारी साखळी फेरीतील तिसऱ्या लढतीत मलेशियाचा २-० ने पराभव केला. या विजयासह भारताने गटात अव्वल स्थान कायम राखले. भारतासह गटात कोरिया, चीन, जपान आणि मलेशिया या संघांचा समावेश आहे.
भारताने आज पहिली लढत खेळली. भारतावर बाद फेरीत स्थान मिळवण्याच्या आशा कायम राखण्याचे दडपण होते. भारतीय संघाने चमकदार कामगिरी करीत चाहत्यांना आनंद साजरा करण्याची संधी दिली.
सुरुवातीपासून आघाडी घेण्यास प्रयत्नशील असलेल्या मलेशियाने आक्रमक खेळ केला. भारताने चोख प्रत्युत्तर दिले. पूनम राणीने मैदानी गोल नोंदवित भारताला आघाडी मिळवून दिली. चांगल्या सुरुवातीचा लाभ घेत भारताने आघाडी कायम राखली. मलेशियन खेळाडूंना आपल्या गोलक्षेत्रात मुसंडी मारण्याची संधी दिली नाही. मलेशिया संघाला या लढतीत पेनल्टी कॉर्नर मिळविता आला नाही. त्यांनी मैदानी गोल नोंदविण्याचा प्रयत्न केला, पण भारतीय बचाव फळीने त्यांचे प्रयत्न हाणून पाडले. दीपिकाने ४५ व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल नोंदवित भारताला २-० अशी आघाडी मिळवून दिली.
यापूर्वी भारताला तीन पेनल्टी कॉर्नर मिळाले होते, पण त्यावर त्यांना गोल नोंदविता आला नाही. प्रत्येक वेळी भारताने वेगवेगळी व्यूहरचना वापरली, पण त्यांना यश आले नाही. दीपिकाने मात्र अनुभवाचा लाभ घेत भारताला २-० अशी आघाडी मिळवून दिली. या गोलच्या मदतीने दीपिकाने स्पर्धेत सर्वाधिक गोल नोंदविणाऱ्या खेळाडूंच्या यादीत अव्वल स्थान पटकावले. भारताने चौथ्या व अखेरच्या क्वॉर्टरमध्ये गोलचा बचाव करण्यासाठी पूर्ण शक्ती पणाला लावली आणि मलेशियाला पुनरागमन करण्याची संधी दिली नाही. भारताला यानंतर ४ नोव्हेंबर रोजी चीनच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. (वृत्तसंस्था)