भारत-इंग्लंड कसोटीचा खर्च करण्याची तयारी आहे काय!
By admin | Published: November 3, 2016 04:35 AM2016-11-03T04:35:03+5:302016-11-03T04:35:03+5:30
बीसीसीआयने बुधवारी आयोजनाचा खर्च आपण स्वत: उचलू शकाल काय, अशा आशयाची विचारणा या पत्राद्वारे केली आहे.
मुंबई : भारत-इंग्लंड यांच्यात आयोजित पाच कसोटी सामन्यांचे आयोजन करणाऱ्या पाचही राज्य संघटनांना बीसीसीआयने बुधवारी आयोजनाचा खर्च आपण स्वत: उचलू शकाल काय, अशा आशयाची विचारणा या पत्राद्वारे केली आहे.
याबाबतचे वृत्त खरे आहे काय, असे विचारताच सूत्रांनी स्पष्ट केले,
की आम्ही आयोजन करणाऱ्या
पाचही कसोटी केंद्रांना पत्राद्वारे विचारणा केली. खर्च उचलण्याची आपली तयारी कळवावी, असे सुचविले आहे.
सौराष्ट्र, आंध्र, पंजाब, मुंबई आणि तमिळनाडू या राज्य संघटनांना इंग्लंडविरुद्ध कसोटी सामन्यांचे आयोजन क्रमश: राजकोट, विशाखापट्टणम, मोहाली, मुंबई आणि चेन्नई येथे करायचे आहे. (वृत्तसंस्था)
>सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या लोढा समितीने बीसीसीआयशी संलग्न राज्य संघटनांना बोर्डाकडून मिळणाऱ्या निधीचा वापर करण्यास मज्जाव केला आहे. लोढा समितीच्या शिफारशी अमलात आणणाऱ्या आदेशाची बोर्डाकडून अंमलबजावणी होईस्तोवर निधी वापरास बंदी आहे. बीसीसीआयचे कामकाज पाहण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने आॅडिटरची नियुक्ती केली आहे. लोढा समितीच्या परवानगीशिवाय मोठे निर्णय घेण्यास बंदी असल्याने इंग्लंड दौऱ्याबद्दल बीसीसीआयने ईसीबीसोबत अद्यापही समझोता करार (एमओयू) केलेला नाही. आम्ही पूर्वपरवानगीशिवाय करारावर स्वाक्षरी करू शकत नसल्याचे सूत्रांचे मत आहे.