कूल कप्तानीचे पर्व संपले!
By admin | Published: January 4, 2017 10:45 PM2017-01-04T22:45:10+5:302017-01-04T22:59:37+5:30
भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार असलेल्या महेंद्रसिंग धोनीने मर्यादित षटकांच्या संघांचे कर्णधारपद सोडल्याचे बीसीसीआयने प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले आणि भायतीय क्रिकेटप्रेमीना
Next
>बाळकृष्ण परब/ ऑनलाइन लोकमत
बुधवारची संध्याकाळ भारतीय क्रिकेटसाठी काहीशी धक्कादायक ठरली. भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार असलेल्या महेंद्रसिंग धोनीने मर्यादित षटकांच्या संघांचे कर्णधारपद सोडल्याचे बीसीसीआयने प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले आणि भारतीय क्रिकेटप्रेमींना थोडासा धक्का बसला. थोडासाच कारण गेल्या काही दिवसांमधील भारतीय संघाची मैदानावरील कामगिरी पाहता हे होणारच होते. एकीकडे कसोटी क्रिकेटमध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ एकापाठोपाठ एक विजय मिळवत आगेकूच करत निघाला असताना दुसरीकडे देशाला दोन विश्वचषक जिंकून देणारा कर्णधार असलेल्या धोनीच्या नेतृत्वाखालील संघ मात्र मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये अडखळत होता. त्यामुळे सुरुवातीला दबक्या आणि नंतर उघडपणे धोनीकडून कर्णधारपद काढून घेण्याची मागणी होऊ लागली होती. त्याचीच परिणती अखेर आज धोनीच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्यात झाली.
आपला हटके अंदाज, कुठल्याही परिस्थितीत शांत राहण्याचा स्वभाव यामुळे धोनी 'कॅप्टन कूल' म्हणून नावारुपास आला. कारकिर्दीच्या सुरुवातीला घणाघाती फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या धोनीकडे 2007 साली झालेल्या पहिल्याच ट्वेंटी-20 विश्वचषक स्पर्धेपूर्वी अपघातानेच कर्णधारपद चालून आले. मग पुढे काय झाले हा आता भारतीय क्रिकेटमधील इतिहास बनला आहे. संधीचे सोने करणे म्हणजे काय हे धोनीने आपल्या कप्तानीतून दाखवून दिले. 2007 चा ट्वेंटी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर लगेचच एकदिवसीय संघाचे कर्णधारपद त्याच्याकडे चालून आले. कप्तानीच्या सुरुवातीच्याच काळात ऑस्ट्रेलियात तिरंगी मालिका जिंकल्याने धोनीच्या कुशल कप्तानीवर शिक्कामोर्तब झाले.
2008 ते 2011 हा मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील कप्तानीच्या दृष्टीने धोनीसाठी सुवर्णकाळ ठरला. याकाळात त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाचे वारू चौफेर उधळले. ऑस्ट्रेलियात तिरंगी मालिकेच्या विजेतेपदाबरोबरच श्रीलंका, इंग्लंड, न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका अशा बहुतांश सर्वच आघाडीच्या संघांना भारताने धूळ चारली. धोनीची कप्तानी यशोशिखरावर पोहोचली ती 2011च्या विश्वचषक स्पर्धेत. भारतीय मैदानावर झालेल्या विश्वचषकात धोनीच्या संघाने देशाला तब्बल 28 वर्षांनंतर विश्वचषकाला गवसणी घालून दिली. 2 एप्रिल 2011च्या रात्री मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या लढतीतील धोनीची ती कप्तानी खेळी आणि नंतरचा विश्वविजयाचा जल्लोष अद्याप क्रिकेटप्रेमींच्या नजरेसमोर आहे.
पण यानंतर मात्र धोनीची कप्तानी उरणीला लागली. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियात झालेले दारुण पराभव आणि संघात सुरू झालेल्या कुरबुरींमुळे धोनीच्या जादूई कप्तानीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले. या काळातही त्याच्या नेतृत्वात संघाला यश मिळत होते. पण त्यात पूर्वीची जादू राहिली नव्हती. त्यातच एन. श्रीनिवासन यांच्याशी त्याचे असलेले घनिष्ट संबंध आणि त्याकाळात भारतीय क्रिकेटमध्ये घोंघावलेले फिक्सिंगचे वादळ याच्या झळाही धोनीच्या नेतृत्वाला बसल्या. आपल्या मर्जीतल्या आणि विशेषकरून चेन्नई सुपरकिंग्जमधल्या खेळाडूंना तो झुकते माप देतो, असेही आरोप झाले. मात्र या सर्व आरोप-प्रत्यारोपातही त्याने चॅम्पियन्स ट्रॉफीत भारताला विजेतेपद मिळवून दिले. पण पुढच्याच वर्षी बांगलादेशमध्ये झालेल्या ट्वेंटी-20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारतीय संघ अपयशी ठरला.
जय पराजयांची मालिका सुरू असतानाच त्याने 2014च्या अखेरीस कसोटी क्रिकेटमधून एकाएकी निवृत्ती स्वीकारली. पण तरीही एकदिवसीय क्रिकेटमधील त्याची कप्तानी काही बहरली नाही. 2015च्या विश्वचषकात भारत उपांत्य फेरीत पोहोचला. मात्र त्यावेळी भारताला ऑस्ट्रेलियाचे आव्हान पार करता आले नाही. याच काळात भारतीय क्रिकेटच्या क्षितिजावर विराटच्या रूपात नव्या नेतृत्वाचा उदय झाला. त्याच्या नेतृत्वात संघाची कामगिरीही उंचावली. साहजिकच विराटच्या नेतृत्वाशी त्याच्या नेतृत्वाची तुलना होऊ लागली, त्यात विराटचे पारडे जड ठरले. 2019ची विश्वचषक स्पर्धा विचारात घेता नव्या नेतृत्वाला वाव देण्यासाठी धोनीने नेतृत्व सोडणे अपरिहार्य होते आणि अखेर आज तसे जाहीरही झाले. त्याबरोबरच भारतीय क्रिकेटमधील कप्तानीच्या एका देदीप्यमान आणि यशस्वी पर्वाची सांगता झालीय. मात्र पुढचा काही काळ तरी धोनीची फटकेबाजी मैदानावर अनुभवता येणार आहे, हेही नसे थोडके!