... तर मी धोनीच्या घरापुढे आंदोलन केले असते : गावसकर
By admin | Published: January 6, 2017 12:55 AM2017-01-06T00:55:45+5:302017-01-06T00:55:45+5:30
महेंद्रसिंग धोनी याने वन-डे आणि टी-२० मधून निवृत्त होण्याचा निर्णय न घेतल्यामुळे मी आनंदीत आहे.
नवी दिल्ली : महेंद्रसिंग धोनी याने वन-डे आणि टी-२० मधून निवृत्त होण्याचा निर्णय न घेतल्यामुळे मी आनंदीत आहे. पण त्याने क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला असता तर पुनरागमनासाठी त्याच्या घरापुढे आंदोलनाला बसणारा मी पहिला व्यक्ती असतो, असे वक्तव्य क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी केले आहे. झारखंडचा हा यष्टिरक्षक-फलंदाज संघात आणखी काही काळ चांगल्या प्रकारे योगदान देऊ शकतो, असे गावसकर यांना वाटते.
ते म्हणाले, महेंद्रसिंग धोनीने कर्णधार म्हणून निवृत्ती जाहीर केली तरी एक खेळाडू म्हणून तो जबरदस्त आहे. तो एका षटकात मॅचचे भविष्य बदलून टाकतो. भारताला एका खेळाडूच्या रूपात त्याची गरज आहे. खेळाडू म्हणून संघात राहण्याचा त्याचा निर्णय स्वागतार्ह आहे.’
धोनी कर्णधार नसल्याने यापुढे त्याच्यावर आता दडपण राहणार नाही. त्याची फलंदाजी तसेच यष्टिरक्षण आणखी बहरणार आहे. कोहली त्याला चौथ्या अथवा पाचव्या स्थानावर फलंदाजीला पाठवेल, अशी मला आशा आहे. या स्थानाखाली धोनीला फलंदाजीसाठी पाठविल्यास अर्थ उरणार नाही. धोनी उत्कृष्ट ‘फिनिशर’ असल्याने चौथे किंवा पाचवे स्थान त्याच्यासाठी योग्य ठरेल. धोनी आणि कोहली हे मैदानावर परस्परांना पूरक ठरतील. भारताला यामुळे सामन्यात कामगिरी सुधारण्यास मदत मिळणार आहे.
धोनीसाठी यष्टिरक्षण अधिक सोपे होईल, असा विश्वास व्यक्त करीत गावसकर पुढे म्हणाले, ‘गोलंदाजीतील बदल आणि इतर बाबींचा विचार करावा लागणार नसल्याने धोनी मोकळा राहणार आहे. सर्वत्र लक्ष घातल्यामुळे ध्यान विचलित होण्याची भीती असते.’
धोनीने नेतृत्व सोडल्याबद्दल गावसकर यांना आश्चर्य वाटले नाही. ते म्हणाले, ‘हा निर्णय अपक्षित होताच. मला वाटले की, धोनी चॅम्पियन्स ट्रॉफीपर्यंत कर्णधार राहील. भारत सध्या चॅम्पियन आहे. विराटकडे नेतृत्वाची धुरा सोपविली जाऊ शकते. कसोटीत विराटचे यश पाहता विराटकडे वन-डेची धुरा आल्यास आश्चर्य वाटणार नाही.’
धोनी २०१९ पर्यंत खेळणे सुरू ठेवेल का, या प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले, ‘त्याचे खेळणे इच्छा आणि फॉर्मवर विसंबून असेल. सध्या तरी खूप पर्याय उपलब्ध दिसत नाही. क्रिकेट अखेर अनिश्चिततेचा खेळ आहे. आपल्याला वाटते की धोनीनंतर कुणीही नाही, अशा वेळी कुणी तरी येतो आणि त्याचे स्थान घेतो.’ (वृत्तसंस्था)