पहिल्या दिवशी भारताचे वर्चस्व

By admin | Published: February 10, 2017 02:28 AM2017-02-10T02:28:46+5:302017-02-10T02:28:46+5:30

कर्णधार विराट कोहली व सलामीवीर मुरली विजय यांनी झळकावलेल्या वैयक्तिक शतकांच्या जोरावर भारताने बांगलादेशाविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात गुरुवारी पहिल्या दिवशी वर्चस्व गाजवले.

India's dominance over the first day | पहिल्या दिवशी भारताचे वर्चस्व

पहिल्या दिवशी भारताचे वर्चस्व

Next

हैदराबाद : कर्णधार विराट कोहली व सलामीवीर मुरली विजय यांनी झळकावलेल्या वैयक्तिक शतकांच्या जोरावर भारताने बांगलादेशाविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात गुरुवारी पहिल्या दिवशी वर्चस्व गाजवले.
कोहली १११ धावा काढून खेळपट्टीवर असून, विजयने १०८ धावांची खेळी केली. या दोघांव्यतिरिक्त चेतेश्वर पुजाराने ८३ धावांची खेळी केली आणि विजयसोबत दुसऱ्या विकेटसाठी १७८ धावांची भागीदारी करून डाव सावरला. भारताने दिवसअखेर पहिल्या डावात ३ बाद ३५६ धावांची मजल मारली. आजचा खेळ थांबला त्या वेळी शतकवीर कोहलीला अजिंक्य रहाणे (४५) साथ देत होता. दुखापतीतून सावरल्यानंतर रहाणेने पुनरागमन केले.
बांगलादेशाने पहिल्याच षटकात लोकेश राहुलला (२) तंबूचा मार्ग दाखवून चांगली सुरुवात केली; पण त्यानंतर त्यांचे गोलंदाज दिवसभर संघर्ष करीत असल्याचे चित्र दिसले. विजय, पुजारा व कोहली यांनी कमकुवत माऱ्यापुढे सहज धावा वसूल केल्या.
विजयने नववे शतक पूर्ण केले, तर कोहलीने दिवसअखेर १६व्या कसोटी शतकाला गवसणी घातली.
कोहलीने १४१ चेंडूंना सामोरे जाताना १२ चौकार लगावले, तर विजयने १६० चेंडू खेळताना १२ चौकार व १ षटकार मारला. पुजाराचे शतक मात्र हुकले. युवा आॅफस्पिनर मेहदी हसन मिराजने त्याला माघारी परतवले. पुजाराच्या १७७ चेंडूंच्या खेळीमध्ये ९ चौकारांचा समावेश आहे.
बांगलादेशाने ३ सत्रांमध्ये प्रत्येकी एक बळी घेतला. ताईजुल इस्लामने तिसऱ्या सत्रात विजयला क्लीन बोल्ड करून भारताला तिसरा धक्का दिला. त्यानंतर रहाणेने कोहलीला चांगली साथ दिली. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी १२२ धावांची अभेद्य भागीदारी केली आहे.
विजय वैयक्तिक ३५ धावांवर असताना सुदैवी ठरला. तो धावबाद होण्यापासून बचावला.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारणाऱ्या भारताच्या डावाची सुरुवात निराशाजनक झाली. सामन्याच्या चौथ्या चेंडूवर राहुल क्लीन बोल्ड झाला.
त्यानंतर विजय व पुजारा यांनी सातव्यांदा शतकी भागीदारी केली. भारतातर्फे सर्वाधिक शतकी भागीदारी नोंदवण्यात ते गौतम गंभीर व राहुल द्रविडसह संयुक्तपणे दुसऱ्या स्थानी आहेत. सर्वाधिक शतकी भागीदारी नोंदविण्याचा विक्रम संयुक्तपणे मोहिंदर अमरनाथ व सुनील गावस्कर आणि राहुल द्रविड व वीरेंद्र सेहवाग यांच्या नावावर आहे. त्यांनी प्रत्येकी आठ वेळा असा पराक्रम केला आहे. बांगलादेशातर्फे तास्किन अहमद, मेहदी हसन व ताईजुल इस्लाम यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.

धावफलक
भारत पहिला डाव :- लोकेश राहुल त्रि.गो. तास्किन २, मुरली विजय त्रि.गो. ताईजुल इस्लाम १०८, चेतेश्वर पुजारा झे. रहीम गो. मिराज ८३, विराट कोहली खेळत आहे १११, अजिंक्य रहाणे खेळत आहे ४५. अवांतर : ७. एकूण : ९० षटकांत ३ बाद ३५६. बाद क्रम : १-२, २-१८०, ३-२३४. गोलंदाजी : तास्किन अहमद १६-२-५८-१, कामरुल इस्लाम रब्बी १७-१-९१-०, सौम्य सरकार १-०-४-०, मेहदी हसन मिराज २०-०-९३-१, शाकीब अल-हसन १३-३-४५-०, ताईजुल इस्लाम २०-४-५०-१, सब्बीर रहमान ३-०-१०-०.

नंबर गेम...
८९.१६ इतक्या सरासरीने चेतेश्वर पुजाराने यंदाच्या प्रथम श्रेणी मोसमात धावा केल्या आहेत. घरच्या मैदानावर खेळताना त्याने यापूर्वी केवळ दोन वेळाच याहून अधिक सरासरीने
खेळी केली. २०१३-१४मध्ये पुजाराने ९८च्या सरासरीने, तर २०१२-१३मध्ये ९३.२३ सरासरीने फलंदाजी केली.
४३.२४ टक्के धावा या सामन्यात कोहलीने चौकारांच्या साह्याने केल्या. विशेष म्हणजे, पहिल्या दिवशी फलंदाजी करताना भारतीय फलंदाजाकडून झालेली ही चौथ्या क्रमांकाची हळुवार खेळी ठरली. परंतु, या फलंदाजांमध्ये त्याचा स्ट्राइक रेट सर्वाधिक ७८.७२
असा आहे.
१२ शतके चौथ्या क्रमांकावर खेळताना कोहलीच्या नावावर झाली आहेत. विशेष म्हणजे, केवळ सचिन तेंडुलकरच्या नावावर या क्रमांकावर खेळताना सर्वाधिक ४४ शतकांचा विक्रम आहे. तसेच, गुंडप्पा विश्वनाथनेदेखील चौथ्या क्रमांकावर खेळताना १२ शतके झळकावली आहेत.
0९ शतके कर्णधारपदी असताना कोहलीने झळकावली आहेत. मोहंमद अझरुद्दिननेही कर्णधार म्हणून ९ शतके झळकावली असून, सर्वाधिक शतके झळकावणारा भारतीय कर्णधार म्हणून सुनील गावसकर (११) यांच्या नावावर विक्रम आहे.
0७ देशांविरुद्ध कोहलीने आतापर्यंत कसोटी सामने खेळले असून, प्रत्येक देशाविरुद्ध त्याने शतक झळकावण्याचा पराक्रम केला आहे. कोहली अद्याप झिम्बाब्वे आणि पाकविरुद्ध कसोटी खेळलेला नाही.
0९ कसोटी शतके झळकावणारा मुरली विजय सर्वाधिक शतके झळकावणारा भारतीय सलामीवीर म्हणून संयुक्तपणे तिसऱ्या स्थानी आला आहे. गावसकर (३३) आणि वीरेंद्र सेहवाग (२२) यांनी सलामीवीर म्हणून सर्वाधिक शतके झळकावली आहेत.
या सामन्यापूर्वी बांगलादेशाने भारतात एकही कसोटी सामना खेळलेला नाही.

Web Title: India's dominance over the first day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.