आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेवर लक्ष
By admin | Published: February 14, 2017 12:16 AM2017-02-14T00:16:59+5:302017-02-14T00:16:59+5:30
खेळाडूंचे लक्ष पूर्वीपासून आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेवर केंद्रित झाले आहे, अशी प्रतिक्रिया भारताचा कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केली.
हैदराबाद : खेळाडूंचे लक्ष पूर्वीपासून आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेवर केंद्रित झाले आहे, अशी प्रतिक्रिया भारताचा कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केली. बांगलादेशविरुद्ध सोमवारी पाचव्या व अखेरच्या दिवशी विजय मिळविल्यानंतर तो पत्रकार परिषदेत बोलत होता. आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेला पुणे येथे २३ फेब्रुवारीपासून प्रारंभ होत आहे.
कोहली म्हणाला, ‘भारतीय संघ आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत कामगिरीत सातत्य राखण्यास उत्सुक आहे. यंदाच्या मोसमात इंग्लंडविरुद्धची मालिका मोठी होती. त्यात आम्ही
४-० ने सरशी साधली. आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतही कामगिरीत सातत्य राखण्यास प्रयत्नशील आहोत. आमचे प्रत्येकाचे लक्ष आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेवर केंद्रित झाले आहे.
फलंदाजीसाठी अनुकूल खेळपट्टीवर गोलंदाजांच्या कामगिरीची प्रशंसा करताना कोहली म्हणाला, ‘ही खेळपट्टी निश्चितच फलंदाजीसाठी अनुकूल होती. नाणेफेक जिंंकल्यानंतर मोठी धावसंख्या उभारण्यास मदत झाली. बांगलादेशने पहिल्या डावात चांगली फलंदाजी केली. आम्ही योजनेनुसार खेळ करण्यास प्रयत्नशील होतो. आम्हाला आता मोठी मालिका खेळायची असून, गोलंदाजांना सूर गवसला आहे. एकूण विचार करता आमच्यासाठी ही लढत सकारात्मक ठरली.’ कोहली पुढे म्हणाला, ‘गोलंदाजांनी प्रतिस्पर्धी फलंदाजांना बाद करण्याची पद्धत शोधून काढली. त्यामुळे संघाचे मनोधैर्य उंचावण्यास मदत झाली. ईशांतचा स्पेल शानदार होता. जर संघात दोन जागतिक दर्जाचे फिरकीपटू असतील तर तुम्ही वेगवान गोलंदाजांवर विश्वास दाखवू शकता. वेगवान गोलंदाज व फिरकीपटू यांच्यादरम्यानची भागीदारी शानदार होती. उमेश खरेच चांगली गोलंदाजी करीत आहे.’ (वृत्तसंस्था)