कोहली भारताचा तिसरा सर्वांत यशस्वी कर्णधार
By admin | Published: February 14, 2017 12:17 AM2017-02-14T00:17:49+5:302017-02-14T00:17:49+5:30
फलंदाजीव्यतिरिक्त नेतृत्वामध्ये रोज नवे विक्रम नोंदविण्याच्या दिशेने वाटचाल करणारा विराट कोहली सोमवारी भारताचा तिसरा सर्वांत यशस्वी कर्णधार
हैदराबाद : फलंदाजीव्यतिरिक्त नेतृत्वामध्ये रोज नवे विक्रम नोंदविण्याच्या दिशेने वाटचाल करणारा विराट कोहली सोमवारी भारताचा तिसरा सर्वांत यशस्वी कर्णधार ठरला आहे. तो सर्वांधिक कसोटी सामन्यांत अपराजित असलेला भारतीय कर्णधार ठरला आहे.
भारताने सोमवारी बांगलादेशचा एकमेव कसोटी सामन्यात २०८ धावांनी पराभव केला. कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताचा हा १५ वा कसोटी विजय ठरला आहे. कर्णधार म्हणून २३ वा कसोटी सामना खेळणाऱ्या कोहलीने मोहम्मद अझरुद्दीनचा विक्रम मोडला. अझरुद्दीनच्या नेतृत्वाखाली भारताने ४७ सामन्यांत १४ विजय मिळवले. कोहली आता भारताचा तिसरा सर्वांत यशस्वी कर्णधार ठरला आहे. महेंद्रसिंग धोनी (६० सामन्यांत २७ विजय) आणि सौरव गांगुली (४९ सामन्यांत २१ विजय) त्याच्या तुलनेत आघाडीवर आहेत.
जागतिक क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून पहिल्या २३ कसोटी सामन्यांत कोहलीपेक्षा अधिक विजय केवळ आॅस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह वॉने (१७ विजय) मिळवले आहेत.
कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताला गेल्या १९ कसोटी सामन्यांत एकदाही पराभव स्वीकारावा लागलेला नाही. भारतासाठी हा नवा विक्रम आहे. यापूर्वी सुनील गावस्कर यांच्या नेतृत्वाखाली भारताने सलग १८ सामन्यांत अपराजित राहण्याचा पराक्रम केला आहे. सर्वाधिक काळ अपराजित राहण्याचा विक्रम वेस्ट इंडिजच्या (२७ सामने) नावावर आहे.
भारताने सलग सहाव्या कसोटी मालिकेत विजय मिळवला. आॅगस्ट २०१५ पासून भारताने एकही मालिका गमावलेली नसून, हा भारतासाठी नवा विक्रम आहे. (वृत्तसंस्था)