कोहलीने गळा कापण्याचा इशारा केला,ऑस्ट्रेलियाच्या न्यूजपेपरचे गंभीर आरोप
By Admin | Published: March 10, 2017 07:51 PM2017-03-10T19:51:44+5:302017-03-10T20:27:41+5:30
कोहलीने आउट झाल्यानंतर एनर्जी ड्रिंकची बाटली टेबलावर फेकली ती ऑस्ट्रेलियाच्या एका अधिका-याला लागली.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 10 - बंगळुरू कसोटीमध्ये सुरू झालेल्या डीआरएसच्या खोटारडेपणाचा वाद काही थांबताना दिसत नाहीये. आता ऑस्ट्रेलियातील वृत्तपत्र 'द डेली टेलिग्राफ' ने भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि भारतीय संघाचे प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्यावर गंभीर आरोप लावले आहेत.
कोहलीला एलबीडब्ल्यू आऊट दिल्यानंतर कुंबळे रागाच्या भरात अंपायरच्या रूममध्ये गेला आणि आउट का दिलं याबाबत स्पष्टिकरण मागितलं, तर मॅच संपल्यानंतर कोहलीने ऑस्ट्रेलियाच्या अधिका-यांवर स्पॉर्ट्स ड्रिंकची बाटली फेकली, त्यामध्ये एक अधिकारी जखमी झाला असा आरोप टेलीग्राफने केला आहे. 2008मध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतील सिडनी टेस्ट मॅचमध्ये झालेल्या फेमस मंकीगेट वादात अनिल कुंबळेने आगीत तेल ओतण्याचं काम केलं होतं आणि आता कोहलीने बाटली फेकण्याच्या प्रकरणातही कुंबळेने आगीत तेल ओतण्याचं काम केलं असा गंभीर आरोप वृत्तपत्रात करण्यात आला आहे.
कोहलीने आउट झाल्यानंतर एनर्जी ड्रिंकची बाटली टेबलावर फेकली ती ऑस्ट्रेलियाच्या एका अधिका-याला लागली. कुंबळेने जाणून बुजून मॅच रेफ्री ख्रिस ब्रॉड यांच्यावर नाराजी व्यक्त केली त्यामुळे बीसीसीआयने प्रकऱण आयसीसीकडे नेलं. याशिवाय विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाचा फलंदाज पीटर हॅंड्सकॉम्बला गळा कापण्याचा इशारा केला असा आरोप वृत्तपत्राने केला आहे. कोहली श्रीलंकेच्या अर्जुन रणतुंगानंतर सर्वात खराब कर्णधार असल्याचंही या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.
काय आहे प्रकरण-
बंगळुरू कसोटीच्या दुस-या डावाच्या 21 व्या षटकात तिस-या चेंडूवर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथ पायचित झाला. सामन्याच्या चौथ्या दिवशी अनियमितपणे उसळी घेणा-या या खेळपट्टीवर बराच खाली राहिलेला तो चेंडू सरळ यष्ट्यांचा वेध घेणारा होता. त्यामुळे पंचांनीही क्षणाचाही वेळ न घेता त्याला बाद ठरवलं. चेंडू स्मिथच्या पायाला लागताच भारतीय खेळाडुंनीही जल्लोष करायला सुरूवात केली. मात्र, त्यावेळी ऑस्ट्रेलियाकडे तिस-या पंचांकडे दाद मागण्याच्या (डीआरएस) दोन्ही संधी उपलब्ध होत्या. आपण आऊट आहोत की नाही याबाबत स्मिथला शंका होती. त्यामुळे रिव्ह्यू घ्यावा की नाही हे विचारण्यासाठी स्मिथ नॉनस्ट्राइकला असलेल्या पिटर हॅन्डसकॉम्बकडे गेला. पण तेथून तो ऑस्ट्रेलियाचे खेळाडू बसलेल्या ड्रेसिंग रूमकडे पाहात होता, आणि तेथून त्याला कांगारूंचे खेळाडू इशारे करत होते. पंचांच्याही हे ध्यानात आलं ते स्मिथकडे पोहोचले आणि तू असं करू शकत नाही असं ते त्याला म्हणाले. दरम्यान भारतीय संघातील खेळाडू चांगलेच भडकले. जर स्मिथने रिव्ह्यू घेतला असता तर ऑस्ट्रेलियाचा एक रिव्ह्यूही वाया गेला असता. भारतीय खेळाडूंनी त्यावर जाहीर नाराजी व्यक्त केली. खेळाडूंचा वाढता आक्रोश पाहून पंचांनी मध्यस्थी केली आणि स्मिथला जायला सांगितलं.