धोनीने जिंकले मन, तर बंगालने सामना
By admin | Published: March 19, 2017 02:14 AM2017-03-19T02:14:03+5:302017-03-19T02:14:03+5:30
महेंद्रसिंह धोनीने काही गगनचुंबी षटकार ठोकताना चाहत्यांची मने जिंकली; परंतु बंगालच्या युवा संघाने जबरदस्त जिद्द दाखवत झारखंडवर ४१ धावांनी मात करीत विजय
नवी दिल्ली : महेंद्रसिंह धोनीने काही गगनचुंबी षटकार ठोकताना चाहत्यांची मने जिंकली; परंतु बंगालच्या युवा संघाने जबरदस्त जिद्द दाखवत झारखंडवर ४१ धावांनी मात करीत विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेत अंतिम फेरीत धडक मारली. आता बंगालची गाठ पडणार आहे ती तामिळनाडूविरुद्ध.
याआधी बंगालला २00८-0९ आणि २00९-१0 मध्ये अंतिम फेरीत सलग दुसऱ्यांदा पराभव पत्कारावा लागला होता. अभिमन्यू ईश्वरन (१0१ धावा) आणि श्रीवत्स गोस्वामी (१0१ धावा) यांची शानदार शतकी खेळी आणि मनोज तिवारीच्या स्फोटक ७५ धावांच्या बळावर बंगालने ५0 षटकांत ४ बाद ३२९ अशी विशाल धावसंख्या रचली. क्रिकेटमधील सर्वोत्तम फिनिशरपैकी एक असणाऱ्या धोनीने ६२ चेंडूंत ७0 धावांची वादळी खेळी करताना प्रतिस्पर्धी गोटात धडकी भरवली; परंतु झारखंडचा संघ ५0 षटकांत २८८ धावांत सर्वबाद झाला. धोनीने त्याच्या खेळीत चार षटकार ठोकले. त्याच्या या स्फोटक खेळीमुळे २ हजारांपेक्षा जास्त उपस्थित प्रेक्षक निराश झाले नाहीत. धोनीने आॅफस्पिनर आमिर गनीला लाँगआॅनवर दोन गगनचुंबी षटकार ठोकले. धोनीला इशांक जग्गी (४३ चेंडूंत ५९ धावा) चांगली साथ दिली; परंतु बंगालचे क्षेत्ररक्षण खूप चांगले होते. धोनी आणि जग्गी यांनी प्रज्ञान ओझा याचा चांगलाच समाचार घेतला. त्याआधी ईश्वरन आणि श्रीवत्स या दोघांनी शतकी खेळी करतानाच सलामीसाठी १९८ धावांची भागीदारी रचली. त्यानंतर तिवारीने त्याच्या खेळीत ७ चौकार आणि २ षटकार मारत बंगालचा विजय सुकर केला. ईश्वरनने ११७ चेंडूंचा सामना करताना ७ चौकार मारले आणि एक षटकार खेचला, तर गोस्वामीने ९९ चेंडूंत ११ चौकार मारताना १ षटकार ठोकला.
संक्षिप्त धावफलक
५0 षटकांत ४ बाद ३२९. (श्रीवत्स गोस्वामी १0१, अभिमन्यू ईश्वरन १0१, मनोज तिवारी ७५. वरुण अॅरोन २/८९, मोनू कुमार १/४0). झारखंड : ५0 षटकात २८८. (महेंद्रसिंह धोनी ७0, इशांक जग्गी ५९, सौरभ तिवारी ४८. प्रज्ञान ओझा ५/७१, सायन घोष २/५२, कनिष्क सेठ २/४८).