कोहलीला स्टम्पने भोसकायचा विचार होता : कोवान

By admin | Published: April 1, 2017 01:12 AM2017-04-01T01:12:45+5:302017-04-01T01:12:45+5:30

भारत-आॅस्ट्रेलियातील बॉर्डर-गावसकर कसोटी मालिका प्रतिस्पर्धी खेळाडूंमधील वादामुळे चांगलीच गाजली. मालिका

Kohli was thinking of knocking the stump: Cowan | कोहलीला स्टम्पने भोसकायचा विचार होता : कोवान

कोहलीला स्टम्पने भोसकायचा विचार होता : कोवान

Next

मेलबोर्न : भारत-आॅस्ट्रेलियातील बॉर्डर-गावसकर कसोटी मालिका प्रतिस्पर्धी खेळाडूंमधील वादामुळे चांगलीच गाजली. मालिका संपल्यानंतरही कटुपणा संपलेला दिसत नाही. आॅस्ट्रेलियाचा माजी फलंदाज एड कोवान याने विराट कोहलीबद्दल आणखी एक खळबळजनक विधान करून आगीत तेल ओतण्याचे काम केले आहे. कोहलीबद्दलच्या रागाची जाहीर कबुली देताना तो म्हणाला, ‘एका सामन्यादरम्यान मैदानातील स्टम्प उखडून कोहलीच्या पोटात भोसकावा, असे वाटले होते,’
रांची कसोटीत कोहलीविरुद्ध आॅस्ट्रेलिया असे युद्ध रंगले होते. पुढे मालिका संपेपर्यंत शाब्दिक हल्ले सुरूच राहिले. डीआरएस नियमांचे उल्लंघन केल्यावरून कोहली मैदानात स्मिथवर भडकला. त्यानंतर आॅस्ट्रेलियातील माध्यमांनी कोहलीला वारंवार टार्गेट केले. मालिका संपल्यानंतर कोहलीनेही आॅस्ट्रेलियाचे क्रिकेटपटू आता मित्र राहिलेले नाहीत, असे जाहीर विधान केल्यामुळे आयपीएल तोंडावर असताना उभय संघातील खेळाडूंमधील वाद आता शमण्याची चिन्हे दिसत नाहीत. कोवानने ‘फॉक्स स्पोर्ट्स’ला दिलेल्या मुलाखतीत वादग्रस्त वक्तव्य करताच सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
कोवान मुलाखतीत म्हणाला, ‘भारतीय संघाविरुद्धच्या संपूर्ण मालिकेत मी शांत होतो; पण एकवेळ कोहलीने माझ्याविरुद्ध अपशब्द वापरला. त्याने केलेली टीका वैयिक्तक होती. आपण काय बोलतोय हेही त्याच्या लक्षात आले नव्हते. खुद्द पंचांनी हस्तक्षेप करून कोहलीला त्याच्या चुकीची जाणीव करून दिली होती. कोहलीलाही आपण मर्यादा ओलांडत असल्याचे कळून चुकले होते. त्याने दिलगिरीदेखील व्यक्त केली होती. पण, त्याने केलेल्या टीकेने मी खूप दुखावलो होतो. इकडे मायदेशात माझी आई आजारी होती. त्यावेळी माझा राग अनावर झाला होता. स्टम्प काढून विराटच्या पोटात भोसकावा, असे मनात आले होते.’
कोवानच्या या विधानानंतर मुलाखत वादग्रस्त होत चालल्याचे लक्षात येताच कोवानने सारवासारव केली. तो पुढे म्हणाला, ‘तुम्ही मला चुकीचे समजू नका. विराट महान क्रिकेटपटू आहे. त्याच्या खेळाचा मीदेखील चाहता आहे. पण, त्याने केलेल्या विधानाने मी नाराज झालो होतो.’ (वृत्तसंस्था)



कोहलीने छोटा ब्रेक घ्यावा : हॅडिन
मेलबोर्न : स्वत:ची फलंदाजी आणि नेतृत्व याचे मूल्यमापन करण्यासाठी टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याने आॅस्ट्रेलियाविरुद्ध नुकत्याच संपलेल्या मालिकेनंतर छोटा ब्रेक घ्यावा, अशी सूचना आॅस्ट्रेलियाचा माजी यष्टिरक्षक- फलंदाज ब्रॅड हॅडिन याने केली आहे. आयपीएलचे दहावे सत्र ५ एप्रिलपासून सुरू होत आहे. कोहलीच्या खेळण्यावर सध्या प्रश्नचिन्ह कायम असताना हॅडिनने खेळातून ब्रेक घेण्याची केलेली सूचना कोहलीच्या जिव्हारी लागण्याची शक्यता आहे.
क्रिकइन्फोतील आपल्या स्तंभात हॅडिनने लिहिले, ‘खांद्याच्या दुखापतीमुळे विराट आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्यांना मुकणार आहे. त्याचे न खेळणे निराशादायी आहे, पण ही चांगली गोष्ट सिद्ध होऊ शकते. यादरम्यान, विराट नेतृत्व आणि फलंदाजी याबद्दल शांतपणे चिंतन करू शकेल. खेळापासून काही वेळ दूर राहून मागच्या आठवड्यात काय घडले, कुणाचे चुकले, बोलताना कुठल्या गोष्टींचे पथ्य पाळायला हवे, मैदानावर संयम ढळू न देता वेळ कसा घालवावा, आदी गोष्टींवर तो विचार करू शकतो.’ नुकतीच पार पडलेली मालिका संघर्षमय होती. आॅस्ट्रेलियाने भारताला चांगली झुंज दिली. कोहलीला स्वत:च्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत आतापर्यंत सर्वांत कठीण प्रसंगांचा सामना करावा लागला, असेही हॅडिनने लिहिले आहे. (वृत्तसंस्था)


कोहलीचे ‘ते’ वक्तव्य भावनेच्या भरात : वॉर्न
मेलबोर्न : ‘आॅस्ट्रेलियन क्रिकेटपटू आता आपले मित्र राहिलेले नाहीत,’ हे वक्तव्य भारतीय कर्णधार विराट कोहलीने भावनेच्या भरात केले असावे. या वक्तव्याबद्दल त्याने फेरविचार न केल्यास आपली निराशा होणार असल्याचे महान लेगस्पिनर शेन वॉर्नने म्हटले आहे.
नुकत्याच पार पडलेल्या कसोटी मालिकेनंतर कोहलीने हे वक्तव्य करताच उभय देशातील खेळाडूंमध्ये सुरू असलेले मतभेद आणखी ताणले गेले. आॅस्ट्रेलियन खेळाडू आणि माध्यमांनी विराटला बालिश, हेकेखोर आणि गर्विष्ठ संबोधले. त्यावर दोन दिवसांनंतर विराटने घूमजाव करीत आपले वक्तव्य चुकीच्या पद्धतीने हाताळण्यात आल्याचे सांगून काही खेळाडूंबद्दल मी हे वक्तव्य केले होते, अशी सारवासारव केली. विराटच्या वक्तव्यावर निराश झालेला वॉर्न म्हणाला, ‘विराट चांगला मुलगा आहे. मैदानावरील त्याच्या आक्रमकतेमुळे मला तो मनापासून आवडतो. त्याने स्वत:च्या वक्तव्याचा फेरविचार न केल्यास माझी घोर निराशा होईल.’
‘अनेकदा मीदेखील मर्यादा ओलांडली. पण, सामना आटोपताच आम्ही दिलगिरी व्यक्त करीत परस्परांमध्ये मिसळून आनंद साजरा करीत होतो,’ असे वॉर्नने सांगितले. (वृत्तसंस्था)

Web Title: Kohli was thinking of knocking the stump: Cowan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.