IPL 10 - कोण असेल सिकंदर?

By admin | Published: April 4, 2017 05:49 PM2017-04-04T17:49:26+5:302017-04-04T18:17:32+5:30

आयपीएलमधील प्रत्येकच लढत ‘फायनल’सारखी असते किंवा लढावी लागते, हे तर खरंच, पण गेल्या वर्षीच्या फायनलमध्ये जे दोन संघ आमनेसामने होते, त्याच दोन संघातील लढतींपासून आयपीएलच्या या हंगामाला सुरुवात होईल

IPL 10 - Who will be Alexander? | IPL 10 - कोण असेल सिकंदर?

IPL 10 - कोण असेल सिकंदर?

Next

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 4 - आयपीएलच्या दहाव्या सत्राचा थरारा उद्या दि. पाच एप्रिलपासून सुरू होईल. या सत्राचं पहिलं युद्धच ‘फायनल’पासून सुरू होईल. आयपीएलमधील प्रत्येकच लढत ‘फायनल’सारखी असते किंवा लढावी लागते, हे तर खरंच, पण गेल्या वर्षीच्या फायनलमध्ये जे दोन संघ आमनेसामने होते, त्याच दोन संघातील लढतींपासून आयपीएलच्या या हंगामाला सुरुवात होईल. हे दोन संघ आहेत गतवेळचा विजेता सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बेगलुरु. पाच एप्रिलपासून सुरू होणारा हा रणसंग्राम थेट २१ मेपर्यंत चालेल. दीड महिन्यापेक्षाही अधिक काळ आणि तब्बल साठ अटीतटीच्या लढती या महासंग्रामात पाहायला मिळतील. 

यावेळच्या आयपीएलचा विजेता कोण असेल याबाबात सामने सुरू होण्याच्या आधीच सट्टेबाजीला सुरूवात झाली असली तरी यावेळच्या विजेत्याचा अंदाज करणं मात्र फारच कठीण आहे. याचं कारण म्हरजे सर्वच संघातील अतिरथी महारथी समजले जाणारे खेळाडू यावेळी आयपीएलमध्ये खेळताना दिसणार नाहीत. शक्यता अशी आहे की, यातील काही खेळाडू संपूर्ण आयपीएलमध्ये एकही सामना खेळू शकणार नाही, तर काही हेवीवेट खेळाडू किमान सुरुवातीच्या सामन्यांमध्ये तरी खेळू शकणार नाहीत. कारण अनेक आहेत, काही जण जखमी आहेत, तर काहींना आपल्या देशाकडून खेळण्याची सक्ती आहे.

विराट कोहली, केएल राहूल, एबी डिव्हिलिअर्स, लसीथ मलिंगा, असेला गुणरत्ने, क्विंटन डीकॉक, जेपी ड्युमिनी, आर. अश्विन, मिशेल मार्श, मुरली विजय, उमेश यादव, रवींद्र जडेजा, मुस्तफिजूर रहमान.. अशी किती नावं घ्यायची? आॅस्ट्रेलियाविरुद्ध नुकत्याच झालेल्या कसोटी सामन्यांत विराट कोहली आणि आॅस्ट्रेलियन कर्णधार स्टीव स्मिथ यांच्यातलं मैदानावरचं आणि मैदानाबाहेरचं युद्ध चांगलंच गाजलं. हाच स्मिथ आता आयपीएलमध्ये पुण्याच्या संघाचं सारथ्य करतोय.

आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत विराट कोहलीला खांद्याच्या दुखापतीनं सतावलं आणि त्याला मालिकेतून बाहेर व्हावं लागलं. याच दुखापतीमुळे आता तो आयपीएलच्या सुरुवातीच्या काही सामन्यांनाही मुकणार आहे. त्याचवेळी त्याच्याच संघातलं दुसरं वादळ एबी डिव्हिलिअर्सही सुरुवातीचे काही सामने खेळू शकणार नाही अशी शक्यता आहे. उद्या सनरायझर्स हैदराबाद बरोबर तो मैदानात उतरू शकतो की नाही याकडे सगळ्यांचे डोळे लागले आहेत. उद्याच्या सामन्यात जर तो खेळू शकला, तर आरसीबीच्या डोक्यावरचं मोठं ओझं उतरले. कारण आरसीबीचा आणखी एक स्टार खेळाडू के. एल. राहूल तर खांद्याच्या दुखापतीमुळे संपूर्ण आयपीएलमधूनच बाहेर गेला आहे. त्यालाही आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत दुखापतीला सामोरे जावे लागले होते. 

आजही संभाव्य विजेत्यांमध्ये आरसीबीचा संघ हेवीवेट असला तरी तीन मोठे धक्के ते कसे पचवू शकतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. जे खेळाडू सध्याच्या आयपीएलमधून बाहेर आहेत किंवा काही काळ त्यांना मैदानापासून दूर राहावं लागणार आहे, त्या साऱ्यांनीच मैदान गाजवलं आहे आणि एकहाती सामना फिरवण्याची ताकद त्यांच्यात आहे. 

अर्थात टीट्वेंटी सामन्यांत त्या दिवशी कोण चांगलं खेळतं त्यावरच सामन्याचा निकाल अवलंबून असतो. जो जिता वही सिकंदर! त्यामुळे या सामन्यांचा अंदाज कोणीही लावू शकत नाही. नाहीतर आयपीएलच्या पहिल्या सत्रात अजिंक्यपद मिळवणाऱ्या आणि सर्वात कमकुवत समजल्या जाणाऱ्या राजस्थान संघानं अजिंक्यपद मिळवलं नसतं. असे अनेक झटके यंदाही पचवावे लागणार आहेत आणि अनपेक्षित निकालानं आश्चर्यचकितही व्हावं लागणार आहे.

जे खेळाडू आज मैदान गाजवताहेत त्यातील अनेक आयपीएलचेच फाइंड आहेत हेही खरं. त्यामुळे कोहलीपासून तर अश्विनपर्यंत अनेक खेळाडू आयपीएलच्या मैदानाबाहेर असले तरी त्यांची जागा दुसरे खेळाडू घेतील आणि क्रिकेटच्या क्षीतिजावर त्यांचा नव्यानं उदय होईल याचीही मोठी शक्यता आहेच. अनेक नवख्या खेळाडूंना घेऊन दिग्गजांना धक्का देण्याचं तंत्रही काही संघांनी आखलं आहे. या आयपीएलमध्ये चक्क अफगाणिस्तानच्या दोन खेळाडूंची वर्णी लागली आहे हेही आयपीएलच्या अनिश्चिततेचंच एक प्रतीक!या रणसंग्रामाला उद्यापासून सुरुवात तर होते आहे, बघू या कोण बाजी मारतं ते..

 

Web Title: IPL 10 - Who will be Alexander?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.