फायनलमध्ये न खेळवल्याने हरभजन सिंग नाराज
By admin | Published: May 25, 2017 10:48 AM2017-05-25T10:48:51+5:302017-05-25T11:16:27+5:30
आयपीएलच्या प्ले-ऑफ आणि अंतिम सामन्यात माझी निवड व्हायला हवी होती असं हरभजन सिंग बोलला आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 25 - मुंबई इंडियन्सने अटीतटीच्या सामन्यात पुण्याचा पराभव करत अंतिम सामना जिंकला असल्याने खेळाडू आनंदात असताना संघातील एक खेळाडू मात्र नाराज आहे. आयपीएलच्या प्ले-ऑफ आणि अंतिम सामन्यात माझी निवड व्हायला हवी होती असं हरभजन सिंग बोलला आहे. रणनीतीचा भाग म्हणून आपल्याला डावलण्यात आल्याच्या दाव्याशी आपण सहमत नसल्याचं हरभजन सिंगने सांगितलं आहे. मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने रणनीतीचा भाग म्हणून हरभजनला खेळवत नसल्याचं सांगितलं होतं.
एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत हरभजन सिंगने आपली नाराजी व्यक्त केली आहे. "बाहेर बसून फक्त खेळ पाहत राहणे नक्कीच चीड आणणारं असतं, पण अशावेळी तुमच्या हातात काही नसतं", असं हरभजन सिंग बोलला आहे. गेल्यावर्षीपर्यंत मी संघ व्यवस्थापनाचा भाग होतो. त्यांच्याकडेच संघ निवडीची जबाबदारी असते. मात्र यावेळी मला माझ्या कुटुंबासोबत वेळ घालवायचा होता", असं हरभजनने सांगितलं.
"व्यवस्थापनाच्या निर्णयाचा मी आदर करतो. मी याबद्दल जास्त आरडाओरड करणार नाही. महेला जयवर्धने बोलला होता की पुणे संघात अनेक उजव्या हाताचे फलंदाज आहेत त्यामुळे लेग स्पिनरला खेळवत आहोत, पण कोणत्याही फॉरमॅटमधील माझा रेकॉर्ड पाहिला तर उजव्या हाताचे फलंदाज मी जास्त बाद केलेत", असं म्हणत हरभजनने निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
"मी संघात असायला हवा होतो असं मला वाटतं. पण आम्ही जिंकलो हे जास्त महत्वाचं आहे", असंही हरभजनने सांगितलं.