दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना म्हणजे उपांत्यपूर्व लढत

By admin | Published: June 10, 2017 04:41 AM2017-06-10T04:41:30+5:302017-06-10T04:41:30+5:30

धावफलकावरील धावा आणि इंग्लंडमध्ये गोलंदाजांनी दाखविलेला फॉर्म बघितल्यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारतीय संघाचा उपांत्य फेरीतील

The match against South Africa is in the quarter-finals | दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना म्हणजे उपांत्यपूर्व लढत

दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना म्हणजे उपांत्यपूर्व लढत

Next

व्हीव्हीएस लक्ष्मण लिहितात...
धावफलकावरील धावा आणि इंग्लंडमध्ये गोलंदाजांनी दाखविलेला फॉर्म बघितल्यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारतीय संघाचा उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित मानला जात होता. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ असून कागदावरील बलाबल निकाल निश्चित करीत नाही, याची पुन्हा एकदा प्रचिती आली. बुधवारी पाकिस्तान संघाने क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या दक्षिण आफ्रिका संघाचा पराभव केला. त्यापासून प्रेरणा घेत श्रीलंका संघाने भारताने दिलेल्या ३२२ धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला.
श्रीलंका संघाने विशाल धावसंख्येचे लक्ष्य ज्या सहजतेने गाठले त्यामुळे मी प्रभावित झालो. पहिल्या १० षटकांत भारतीय संघाचे वर्चस्व असतानाही श्रीलंका संघाने दडपण बाळगले नाही. हार्दिक पांड्या आणि रवींद्र जडेजा गोलंदाजीला आल्यानंतर धनुष्का गुणतिलका व कुसल मेंडिस यांनी आक्रमक पवित्रा स्वीकारला. फलंदाजीला अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर त्यानंतर भारतीय संघ दडपणाखाली आला.
श्रीलंकेच्या फलंदाजांचे कौशल्य उत्तम होतेच, पण त्यांनी दाखवलेला संयम वाखागण्याजोगा होता. त्यांचा दृष्टिकोन सकारात्मक होता. लक्ष्याचा पाठलाग करताना त्यांनी दाखविलेली बेदरकार वृत्ती प्रशंसेस पात्र होती. गुणतिलका व मेंडिस यांनी दुसऱ्या विकेटसाठी उपयुक्त भागीदारी करीत विजयाचा पाया रचला. त्यानंतरही आलेले मधल्या फळीतील फलंदाजही ड्रेसिंग रुममधूनच सेट होऊन आल्याप्रमाणे खेळत होते. त्यानंतर कुसल परेरा आणि असेला गुणरत्ने यांनी विजय सुकर केला. या दोघांनी अ‍ॅन्जेलो मॅथ्यूजवरील दडपण कमी केले. मॅथ्यूज सात महिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर होता. त्यामुळे त्याच्या फलंदाजीमध्ये पूर्वीचा टच नव्हता.
भारतीय गोलंदाजांनी सुमार मारा केला असे नाही. पाकिस्तानविरुद्धच्या लढतीच्या तुलनेत भारताची क्षेत्ररक्षणातील कामगिरीही सुधारलेली दिली. पण, पांड्या व जडेजा यांच्याविरुद्ध धावा फटकावल्या गेल्यानंतर विराट कोहलीकडे विशेष पर्याय शिल्लक नव्हते. त्यामुळे त्याने स्वत:सह केदार जाधवचाही गोलंदाजीमध्ये उपयोग केला.
आता उपांत्य फेरी गाठण्यासाठी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विजय आवश्यक आहे. पाकिस्तानच्या फिरकीपटूंविरुद्ध दक्षिण आफ्रिका संघाचे फलंदाज संघर्ष करीत असल्याचे चित्र दिसले. त्यामुळे केदार जाधवच्या स्थानी आर. अश्विनला अंतिम ११ खेळाडूंमध्ये स्थान देण्याची वेळ आलेली आहे. अश्विनच्या जोडीला जडेजा दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांवर वर्चस्व गाजवण्यास सक्षम आहे. भारतीय फलंदाजांची कामगिरी उल्लेखनीय ठरत असल्यामुळे वेगवान गोलंदाजांचा समतोल कायम राखत फलंदाजाच्या मोबदल्यात एक अतिरिक्त गोलंदाज खेळविण्याचा पर्याय भारतासाठी उपयुक्त ठरू शकतो.
पराभवामुळे भारतीय संघ निराश झाला असेल, पण मनोधैर्य ढासळू देण्याची गरज नाही. शिखर धवनने शानदार खेळी केली तर रोहित शर्माने कामगिरीत सातत्य राखले. चांगल्या सुरुवातीनंतर एम.एस. धोनीला आक्रमक फलंदाजी करताना बघणे सुखावह होते.
मनोधैर्य उंचावलेल्या श्रीलंकेविरुद्धचा पराभव इशारा देणारा आहे. रविवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या लढतीला आता उपांत्यपूर्व फेरीचे स्वरूप प्राप्त झाले असून यात भारतीय संघ निश्चितच बाजी मारेल, असा मला विश्वास आहे. (गेमप्लॉन)

Web Title: The match against South Africa is in the quarter-finals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.