पराभूत होऊनही बांगलादेशने रचला अनोखा विक्रम
By Admin | Published: June 16, 2017 05:03 PM2017-06-16T17:03:38+5:302017-06-16T17:03:38+5:30
काल झालेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दुसऱ्या उपांत्य लढतीत भारताने बांगलादेशची दाणादाण उडवली. या लढतीत
>ऑनलाइन लोकमत
मँचेस्टर, दि. 16 - काल झालेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दुसऱ्या उपांत्य लढतीत भारताने बांगलादेशची दाणादाण उडवली. या लढतीत भारतीय संघाने 9 गडी राखून अगदी आरामात विजय मिळवला. मात्र भारताकडून दारुण पराभव पत्करणाऱ्या बांगलादेशच्या संघाने या लढतीत एक अनोखा विक्रम नोंदवला आहे. भारतासमोर विजयासाठी 265 धावांचे आव्हान ठेवल्यानंतर गोलंदाजी करताना बांगलादेशच्या गोलंदाजांनी एकही अतिरिक्त धाव दिली नाही. त्यामुळे एकदिवसीय सामन्यात संपूर्ण डावात एकही अतिरिक्त धाव न देण्याचा पराक्रम बांगलादेशच्या संघाने केला आहे.
पहिल्यांदाच आयसीसीच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेची उपांत्य फेरी गाठलेल्या बांगलादेशने भारतीय संघासमोर मोठे आव्हान उभे करण्याचा प्रयत्न केला. पण बलाढ्य भारतीय संघासमोर त्यांची डाळ शिजली नाही. बांगलादेशने दिलेले 265 धावांचे आव्हान भारताने रोहित शर्मा, शिखर धवन आणि विराट कोहलीच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर बघता बघता पार केले. मात्र बांगलादेशी गोलंदाजांचा मारा स्वैर झाला तरी त्यांनी अवांतर धावा मात्र दिल्या नाहीत. भारताच्या संपूर्ण डावात वाइड आणि नोबॉल सोडाच साध्या बाय आणि लेग बायच्या धावाही बांगलादेशी संघाने दिल्या नाहीत.
(... आणि बांगलादेशी वाघांचे झाले मांजर !)
(... आणि बांगलादेशी वाघांचे झाले मांजर !)
संपूर्ण डावात एकही अतिरिक्त धाव न देण्याचा पराक्रम बांगलादेशच्या संघाने याआधीही केला होता. गेल्या वर्षी आशिया चषक ट्वेंटी-20 स्पर्धेत पाकिस्तानविरुद्धच्या लढीतीत बांगलादेशी गोलंदाजांनी अशी कामगिरी केली होती. त्यावेळी त्यांनी संपूर्ण डावात एकही अवांतर धाव दिली नव्हती.