भारत-पाकिस्तान महायुद्ध! विराटसेना सज्ज
By admin | Published: June 18, 2017 03:24 AM2017-06-18T03:24:48+5:302017-06-18T06:13:02+5:30
अंगात रक्त सळसळत आहे. भावनांवर नियंत्रण राखणे आता आपल्या हातात नाही. भारताला जेतेपदाशिवाय दुसरे काहीच नको. पुन्हा एकदा पाकला हरवायचे आहे
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तानविरुध्द आज अंतिम लढत
लंडन : अंगात रक्त सळसळत आहे. भावनांवर नियंत्रण राखणे आता आपल्या हातात नाही. भारताला जेतेपदाशिवाय दुसरे काहीच नको. पुन्हा एकदा पाकला हरवायचे आहे आणि केवळ हरवायचेच नाही तर चॅम्पियन्स ट्रॉफीचा बचावही करायचा आहे. विराट सेनेची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. चार वर्षांपूर्वी धोनी सेनेने ‘साहेबांना’ धूळ चारत पटकाविलेली चॅम्पियन्स ट्रॉफी ती कुठल्याही परिस्थितीत पाकिस्तानने हिसकावून नेता कामा नये, यासासाठी विराट सेनेने कंबर कसली आहे. ४ जूनला विराट सेनेने पाकिस्तानला धूळ चारली होती; पण नियतीने पुन्हा एकदा या दोन शेजाऱ्यांना २०१७च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम लढतीत आमने-सामने आणले आहे. ‘रणांगणा’वर भारताविरुद्ध पाकला वारंवार नामुष्की पत्करावी लागली आहे. ‘रनसंग्रामा’तही कदाचित त्यांची तीच इच्छा असावी. पाकने केवळ नशिबाच्या जोरावर अंतिम फेरीत स्थान मिळविले, तर भारताने कामगिरीच्या जोरावर पात्रता मिळविली. आयसीसीच्या स्पर्धांमध्ये भारत पाकिस्तानचा ‘बाप’ आहे आणि आज, रविवारी ‘फादर्स डे’पण आहे. आयसीसी स्पर्धेत भारताने १३ वेळा जेतेपदाचा मान मिळविला, तर पाकिस्तानला केवळ दोनदा अशी कामगिरी करता आली.
कामगिरीत सातत्य राखणारा भारतीय संघ आज आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम लढतीत परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध खेळेल त्यावेळी सीमेच्या अल्याड-पल्याड घड्याळाचे काटेही थांबलेले असतील आणि चाहत्यांना रंगतदार क्रिकेटची मेजवानी मिळणार असल्याचे निश्चित आहे.
उभय देशांदरम्यानचे सध्याच्या राजकीय तणावामुळे क्रिकेटच्या या लढाईमध्ये रंगत निर्माण झालेली आहे. द्विपक्षीय क्रिकेट मालिकेला भारत सरकारची परवानगी न मिळाल्यामुळे उभय संघ केवळ आयसीसीच्या स्पर्धांमध्येच एकमेकांविरुद्ध खेळत असतात. गतचॅम्पियन भारताने स्पर्धेत पहिल्या लढतीत पाकिस्तानचा पराभव केला होता. कर्णधार विराट कोहलीने यापूर्वीच स्पष्ट केले की, त्याच निकालाची पुनरावृत्ती करण्यासाठी वेगळे काही करण्याची गरज नाही. त्या लढतीनंतर मात्र पाकिस्तानने आपल्या कामगिरीत सुधारणा केली आहे.
तसे बघता ही लढत केवळ क्रिकेट कौशल्याची नसून दडपण झुगारणे व मानसिक दृढता या बाबींची भूमिका विशेष महत्त्वाची आहे. सचिन तेंडुलकरने सेंच्युरियनमध्ये ती संस्मरणीय खेळी करीत हिशेब चुकता केला नव्हता तोपर्यंत चेतन शर्माच्या अखेरच्या चेंडूवर जावेद मियांदादचा षट्कार वर्षानुवर्षे भारतीय क्रिकेटपटूंच्या हृदयावर आघात करीत होता. दरम्यान, अजय जडेजा, व्यंकटेश प्रसाद, ऋषिकेश कानिटकर किंवा जोगिंदर शर्मा यांनी प्रतिष्ठेच्या लढतींमध्ये भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजाविली आहे. नवी दिल्लीपासून इस्लामाबादपर्यंत आणि कराचीपासून कोलकातापर्यंत कुठलाही क्रिकेट चाहता आपल्या संघाला पराभूत होताना बघण्यास इच्छुक नसतो. मैदानावरील २२ क्रिकेटपटूंसाठी ही क्रिकेटची एक लढत असेल; पण लाखो क्रिकेट चाहत्यांसाठी त्याच्याही पुढे काही असते. माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग आणि राशिद लतीफ यांच्या वक्तव्यामुळे आगीत तेल ओतण्याचे काम केले आहे. लढत जिंकणाऱ्या संघावर प्रेम व पुरस्कारांचा वर्षाव होईल, तर पराभूत होणाऱ्या संघाला टीकेला सामोरे जावे लागेल हे वेगळे सांगण्याची गरज नाही.
कर्णधार विराट कोहलीने म्हटले की, चूक करण्याची संधीच नाही. कामगिरीच्या आधारावर भारतीय संघाच्या तुलनेत पाकिस्तान संघ आसपासही नाही; पण तरी पाक संघ धक्कादायक विजय नोंदविण्यात सक्षम आहे. आज, रविवारच्या लढतीच्या निमित्ताने त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. एकतर्फी ठरलेल्या सलामी लढतीत भारताने १२४ धावांनी विजय मिळविला होता. त्यावेळी अनेकांच्या मते आता भारत-पाक लढतींमध्ये ती रंगत नाही. पाकिस्तान संघाच्या कामगिरीचा आलेख सातत्याने खालावत आहे. (वृत्तसंस्था)
भारत
विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, युवराज सिंग, एम. एस. धोनी, केदार जाधव, हार्दिक पांड्या, आर. अश्विन, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, दिनेश कार्तिक, मोहम्मद शमी, अजिंक्य रहाणे, उमेश यादव.
पाकिस्तान
सरफराज अहमद (कर्णधार), अमहद शहजाद, अझहर अली, बाबर आजम, मोहम्मद हफीज, शोएब मलिक, हसन अली, मोहम्मद आमिर, रुम्मान रईस, जुनेद खान, इमाद वसीम, फहीम अश्रफ, शादाब खान, फखर जमान, हारिस सोहेस.
सामना (भारतीय वेळेनुसार) : दुपारी ३ वाजल्यापासून.