भारतीय संघाच्या पराभवानंतर सानिया मिर्झाचं ट्विट

By admin | Published: June 19, 2017 08:59 AM2017-06-19T08:59:26+5:302017-06-19T09:04:53+5:30

भारताचा पराभव आणि पाकिस्तानचा विजय झाल्यानंतर टेनिसस्टार सानिया मिर्झानेही ट्विटरच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली

Sania Mirza tweeted after the defeat of the Indian team | भारतीय संघाच्या पराभवानंतर सानिया मिर्झाचं ट्विट

भारतीय संघाच्या पराभवानंतर सानिया मिर्झाचं ट्विट

Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 19 - आयसीसी चॅम्पिअन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानने भारताचा दारुण पराभव केला आणि सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस पडायला लागला. भारताचा पराभव आणि पाकिस्तानचा विजय झाल्यानंतर टेनिसस्टार सानिया मिर्झानेही ट्विटरच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. "क्रिकेटमध्ये पराभव झाला असला तरी हॉकीमध्ये जिंकलो आहोत. भारतीय आणि पाकिस्तान दोन्ही विजयी संघांचं अभिनंदन. खेळ सर्वांना समान पातळीवर आणतो", असं ट्विट सानिया मिर्झान केलं आहे. 
 
(पाकिस्तानविरोधात भारतीय हॉकी संघाने काळी फित बांधून खेळला सामना)
(पाकचा धुव्वा)
 
गोलंदाजांच्या सुमार कामगिरीनंतर कागदावर बलाढ्य भासणारे भारतीय फलंदाज मोक्याच्या क्षणी ढेपाळले आणि रविवारी चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम लढतीत परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघाकडून भारताला १८० धावांनी दारुण पराभव स्वीकारावा लागला. या पराभवासह पाकिस्तानने साखळी फेरीत पत्कराव्या लागलेल्या पराभवाची सव्याज परतफेड केली. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत पाकिस्तानने भारताविरुद्ध तिसऱ्यांदा विजय मिळविला. दोन लढतींमध्ये भारतीय संघाने बाजी मारली आहे. पाक संघ प्रथमच चॅम्पियन ट्रॉफीचा मानकरी ठरला.
फखर झमानच्या शतकी खेळीच्या जोरावर पाकिस्तानने ४ बाद ३३८ धावांची दमदार मजल मारली आणि लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या भारताचा डाव ३०.३ षटकांत १५८ धावांत गुंडाळला. भारतीय डावात हार्दिक पांड्याचा (७६ धावा, ४३ चेंडू, ४ चौकार, ६ षट्कार) अपवाद वगळता अन्य फलंदाजांची कामगिरी निराशाजनक ठरली.
 
लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात निराशाजनक झाली. तिसऱ्याच चेंडूवर मोहम्मद आमिरने रोहित शर्माला (०) खाते उघडण्यापूर्वीच माघारी परतवले. सुदैवी ठरलेल्या कोहलीला (५) पुढच्याच चेंडूवर आमिरने तंबूचा मार्ग दाखवीत भारताची २ बाद ६ अशी अवस्था केली. त्यानंतर आमिरने शिखर धवनचा (२१) अडथळा दूर करीत भारताची आघाडीची फळी कापून काढली. एकवेळ भारताची ६ बाद ७२ अशी अवस्था झाली होती. त्यानंतर हार्दिक पांड्या व रवींद्र जडेजा यांनी सातव्या विकेटसाठी ८० धावांची भागीदारी करीत रंगत निर्माण केली. आक्रमक अर्धशतकी खेळी करणारा पांड्या धावबाद झाल्यानंतर भारताचा डाव पुन्हा गडगडला. पाकिस्तानतर्फे आमिर व हसन अली यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले. शादाब खानने दोन तर जुनेद खानने एक बळी घेत त्यांना योग्य साथ दिली.
 
हॉकीमध्ये पाकचा धुव्वा -
भारत-पाक क्रिकेट लढतीबाबत अधिक चर्चा होत असताना फॉरवर्ड खेळाडूंच्या चमकदार कामगिरीच्या जोरावर भारताने रविवारी एफआयएच विश्व हॉकी लीग सेमीफायनलमध्ये परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा विक्रमी ७-१ गोलने धुव्वा उडविला आणि ‘ब’ गटात अव्वल स्थान कायम राखले.
 
लंडनमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम लढतीव्यतिरिक्त हॉकीमध्येही या दोन आशियाई दिग्गज संघांदरम्यानच्या लढतीवर सर्वांची नजर होती. त्यात भारताने अनुभवहीन पाकिस्तान संघाविरुद्ध खेळाच्या प्रत्येक विभागात वर्चस्व गाजवले. या पराभवामुळे पाकिस्तानचे विश्वकप स्पर्धेत स्थान मिळवण्याचे स्वप्न जवळजवळ भंगले. कारण या स्पर्धेतील हा त्यांचा सलग तिसरा पराभव ठरला.
 

Web Title: Sania Mirza tweeted after the defeat of the Indian team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.