अखेर सचिनला दिसला वाघोबा!
By admin | Published: February 22, 2016 03:04 AM2016-02-22T03:04:43+5:302016-02-22T03:04:43+5:30
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि वाघ यांच्यात दोन दिवसांपासून उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यातील पीचवर लपाछुपीचा सामना सुरू होता.
दोन दिवस कऱ्हांडल्यात : अभयारण्यावर समाधान व्यक्त
अभय लांजेवार उमरेड
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि वाघ यांच्यात दोन दिवसांपासून उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यातील पीचवर लपाछुपीचा सामना सुरू होता. शनिवारला पहाटेपासूनच अभयारण्य जवळ करणाऱ्या सचिन आणि कुटुंबीयांना वाघोबांनी दर्शन दिलेच नाही. पहिल्या दिवशी वाघोबा जिंकले. सचिनने मुक्काम ठोकला. वनविभागालाही घाम फुटला. दुसऱ्या दिवशीही वाघोबा दिसले नाही तर होणार कसे, अशा चिंतेत ‘फिल्डिंग’ लावण्यात आली. अखेरीस रविवारी सकाळी ८ वाजताच्या जंगल सफारीत तलाव परिसरात ‘चाँदी’चे दर्शन होताच सगळ्यांच्याच चेहऱ्यावर आनंद झळकला. पहिल्या दिवशी वाघोबा जिंकला असला तरी दुसऱ्या दिवशीच्या जंगल भ्रमंतीच्या खेळीत मात्र सचिनेच बाजी मारली. उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यातील दोन दिवसांच्या जंगल सफारीचा अनमोल ठेवा सचिनने साठवून ठेवत समाधान व्यक्त केले. दरम्यान, रविवारी सायंकाळी ६.३० वाजता सचिनने नागपूरकडे प्रस्थान केले.रविवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास अभयारण्याकडे जात असताना बाहेर प्रतीक्षा करणाऱ्या काही ‘फॅन्स’ला सचिनने आॅटोग्राफही दिले. लोकेश शादी या तरुणाने ‘सर, कैसा लगा उमरेड’ असे विचारताच सचिनने हसतच ‘अच्छा लगा’ असे उत्तर दिले. जिप्सी चालक असो गाईड, पर्यटक, वाहनचालक, वनकर्मचारी यांच्यासोबतही सचिन, पत्नी अंजली, मुलगा अर्जुन यांनी छायाचित्र काढले. सेल्फीही काढल्या. दोन दिवसाच्या या भेटीत मिस्टर इंटरनॅशनलने तेवढ्याच विनम्रतेने सगळ्यांना चांगली वागणूक दिली.
क्रिकेट आणि जीवन
एका सामन्यात बाद झाल्यानंतर तो थांबला नाही. त्यानंतरच्या अनेक सामन्यांत जिद्दीने सामोरे गेला. मैदानावर अनेकांना घामही फोडला. मन जिंकले. क्रिकेट जिंकले अन् जगही जिंकले. क्रिकेटचा ‘भगवान’ समजल्या जाणाऱ्या भारतरत्न सचिन तेंडुलकरला मात्र शनिवारी दिवसभर दर्शनासाठी वाघोबाने जंग जंग पछाडले. वाघोबा दिसल्याशिवाय जायचेच नाही, असाच काहीसा निर्धार सचिनने केला असावा. अखेरीस आज सचिनला वाघ दिसलाच. चाँदीचे दर्शन होताच सारेच थक्क झाले. दोन दिवसांच्या जंगल सफारीचे फलित झाल्याच्या प्रतिक्रिया सचिन तेंडुलकरच्या चेहऱ्यावर झळकत होत्या. क्रिकेटच्या मैदानावर तुटून पडणारा सचिन आज प्रत्यक्ष जीवनातही तेवढ्याच जिद्दीने अनेक कठीण प्रसंगांना तेवढाच सामोरे जातो, हेच या सफारीतून दिसून आले.