श्रीहरी अणेंनी फडकवला स्वतंत्र विदर्भाचा झेंडा
By Admin | Published: May 1, 2016 08:48 AM2016-05-01T08:48:23+5:302016-05-02T14:48:12+5:30
महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा होत असताना स्वतंत्र विदर्भवादी नेते मात्र आजचा दिवस विदर्भात काळा दिवस म्हणून साजरा करत आहेत.
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. १ - संपूर्ण राज्यात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा होत असताना स्वतंत्र विदर्भवादी नेते मात्र आजचा दिवस विदर्भात काळा दिवस म्हणून साजरा करत आहेत.
नागपूरात विष्णुजी की रसोई, बजाजनगर चौक नागपूरमध्ये राज्याचे माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे आणि अन्य नेत्यांनी विदर्भाचा झेंडा फडकवला. श्रीहरी अणे यांनी विदर्भाचा झेंडा फडकवला. आज भाजपच्या जाहीरनाम्याची होळी करण्यात येणार आहे.
आज नागपूरात सर्व विदर्भवादी एकवटले आहेत. महाराष्ट्र दिनाच्या दिवशी आपल्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी या विदर्भवादी नेत्यांनी विविध कार्यक्रम आखले आहेत.
महाराष्ट्र दिनी वेगळया विदर्भाचा झेंडा फडकविल्यानंतर श्रीहरी अणे यांनी देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी या दोघांबद्दलचे मौन सोडले. गडकरी व फडणवीसांचे विदर्भाबाबतचे मौन दुर्दैवी असून दिलेले आश्वासन त्यांनी पाळले पाहिजे, असे प्रतिपादन अणे यांनी केले.
अणे यांनी यावेळी शिवसेना तसेच भाजपावरदेखील टीका केली. भाजपाच्या नेत्यांनी वेगळया विदर्भाचे आश्वासन दिले होते. परंतु त्याचे पालन केले नाही. त्यामुळे आता सर्व संघटनांनी एकत्र येऊन कार्यक्रमाचे ‘कॅलेंडर’ तयार करायचे आहे व प्रत्येक महिन्यात विदर्भाच्या समर्थनार्थ उपक्रम राबवायचा आहे.
हिवाळी अधिवेशनापर्यंत हे करायचे आहे. तोपर्यंत भाजपाने आपले आश्वासन पाळले तर ठीक नाही तर १ जानेवारीपासून भाजपाच्या विरोधात आंदोलन उभारले जाईल, असा इशारा अणे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना दिला.
कस्तुरचंद पार्क मैदानावर आकाशात काळे फुगे सोडण्यात आले. त्यावर 'जय विदर्भ' असे लिहीले होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विदर्भावर बोलत नाहीत हे दुर्देव आहे असे अणे यावेळी म्हणाले.