इन्फोसिसच्या नारायण मूर्तींना जीवनगौरव
By admin | Published: September 13, 2015 02:56 AM2015-09-13T02:56:32+5:302015-09-13T02:56:32+5:30
इन्फोसिस या अग्रगण्य कंपनीचे संस्थापक पद्मविभूषण नारायण मूर्ती यांना १६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
नागपूर : भारतात माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात क्रांती आणणारे आणि इन्फोसिस या अग्रगण्य कंपनीचे संस्थापक पद्मविभूषण नारायण मूर्ती यांना १६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. इंजिनिअर्स फोरमच्यावतीने दरवर्षी एम. विश्वेश्वरैया यांच्या जयंतीनिमित्त इंजिनिअर्स डे साजरा केला जातो. त्यानिमित्त सिव्हिल लाईन्स येथील राणी कोठी येथे हा पुरस्कार समारंभ होणार आहे.
देशात १५ सप्टेंबरला एम. विश्वेश्वरैया यांची जयंती साजरी करण्यात येते. यंदा भारतीय आयटी क्षेत्राला एका वेगळ्या उंचीवर नेणारे नारायण मूर्ती यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात भारतीय सॉफ्टवेअर उद्योग आणि त्याचे जगाला योगदान विषयावर नारायण मूर्तीचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. अध्यक्षस्थानी व्हीएनआयटीचे चेअरमन विश्राम जामदार राहतील, अशी माहिती पत्रकार परिषदेत फोरमचे अध्यक्ष सुरेश शिंदे यांनी दिली.
या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी भारतीय सॉफ्टवेअर उद्योग आणि भारतीयांचे जगाला योगदान विषयावर निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात २६ महाविद्यालयातील १०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. स्पर्धेत व्हीएनआयटीच्या प्रथमेश जोशीनो प्रथम, प्रियदर्शनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रदीप आटोलेने द्वितीय, सेन्ट विन्सेन्ट पलोटी कॉलेज आॅफ इंजिनिअरिंगच्या रिया चक्रवर्तीने तृतीय क्रमांक पटकाविला आहे.(प्रतिनिधी)