Apple iPhone Event : टिम कुकने लॉन्च केली अॅपल वॉच
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2017 11:25 PM2017-09-12T23:25:05+5:302017-09-12T23:25:05+5:30
सीईओ टिम कुक यांनी एलटीई सपोर्टसह अॅपल वॉचचे लॉचिंग केलं आहे. ही वॉच 19 सप्टेंबरपासून बाजारात उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
कॅलिफोर्निया, दि. 12 : सीईओ टिम कुक यांनी एलटीई सपोर्टसह अॅपल वॉचचे लॉचिंग केलं आहे. ही वॉच 19 सप्टेंबरपासून बाजारात उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. अॅपल वॉच जगात प्रथम क्रमांकावर असून, गेल्या तिमाहीत अॅपल वॉचच्या विक्रीत 50 टक्के वाढ झाली आहे. अॅपल वॉच वापरणारे जगातील 97 टक्के लोक समाधानी असल्याचे यावेळी कुक यांनी सांगितले.
अॅपलची ही तिसऱ्या श्रेणीतील वॉच तूम्हाला गुगल मॅप दाखवेल, गाणे ऐकवेल, ऐवढेच नाही तर तुम्हाला त्यावरुन कॉलही करता येईल. या वॉचमध्ये तुमच्या ह्दयाचे ठोकेही मोजले जातील. एका मिनिटात किती वेळा श्वास घेतला हेही कळू शकेल. अॅपलच्या या नव्या वॉचची डिझाईन यावेळी अधिक आकर्षक करण्यात आली आहे. तुमचा अॅपल फोन घरी विसरला तरी या वॉचमुळे तुमची अडचण होणार नाही. या वॉचमध्ये जवळपास चार कोटी गाण्यांचा संग्रह करता येणार आहे. ही वॉच वॉटरप्रुफ असणार आहे. अॅपल वॉचमधील पहिल्या श्रेणीतील घडाळ्याची किंमत 249 डॉलर, दुसऱ्या श्रेणीची 329 डॉलर तर तिसऱ्या श्रेणीची 399 डॉलर ऐवढी असणार आहे. तिसऱ्या श्रेणीतील वॉच ही एकप्रकारे तुमचा मनगटावरील मोबाईलच असेल.
अॅपल वॉचच्या लॉचिंगपूर्वी स्टीव्ह जॉब्स थिएटरचे उदघाटन करण्यात आले. यावेळी अॅपलचे सीईओ टीम कुक यांनी स्टीव्ह जॉब्स यांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी ते म्हणाले की, अॅपल स्टीव्ह जॉब्स यांचे स्वप्न आपण पूर्ण करत आहे. आगामी काळात जगातील प्रत्येक व्यक्तीच्या हातात आयफोन असेल.
एक हजार व्यक्ती बसतील इतकी स्टीव्ह जॉब्स थिएटरची क्षमता आहे. या वर्षाअखेर पर्यंत अॅपलचे मुख्यालय नव्या इमारतीत स्थलांतरीत होणार आहे. 75 एकर जमीनीवर अॅपलचे स्टिव्ह जॉब्स स्पेसशिप आहे, यामध्ये 9 हजाराहून अधिक वृक्ष आहेत.
कॅलिफोर्नियातील कुपेरटिनो येथील अॅपलच्या नव्या कॅम्पसमधील स्टीव्ह जॉब्स थिएटरमध्ये हा सोहळा रंगला. अॅपलचा हा कॅम्पस पाहण्याची पहिल्यांदाच संधी मिळाली. स्टीव्ह जॉब्स थिएटरमधील हा पहिलाच कार्यक्रम आहे. पहिल्यांदाच पत्रकारांसाठी स्टीव्ह जॉब थिएटरमध्ये प्रवेश देण्यात आला आहे.
- वॉचची वैशिष्ट्ये
२२ सप्टेंबर रोजी अॅपल वॉच सीरिज-३ मार्केटमध्ये उपलब्ध होणार
तुमच्या हृदयाचे ठोके वाढले तर अॅपल वॉच तुम्हाला सुचना देणार
अॅपल वॉच तुमच्या हृदयाचे ठोके ही मोजणार
चौपाटीवर जाताना किंवा वॉकिंगवर जाताना तुमचा मोबाइल घरी ठेऊन केवळ घड्याळ हातात घालून जाऊ शकता
अॅपल वॉचमुळे प्रत्येकवेळी तुम्हाला आयफोन सोबत ठेवायची गरज नाही
अॅपल सीरिज-३ वॉचमध्ये इलेक्ट्रॉनिक सिम असणार
अॅपल सीरिज-३ वॉचमध्ये जलद वायफायसाठी डब्ल्यू२ चीप लावण्यात येणार