नवीन आयफोन लाँचिंगची उत्सुकता शिगेला
By शेखर पाटील | Published: September 12, 2017 07:30 AM2017-09-12T07:30:30+5:302017-09-12T07:39:26+5:30
अॅपल कंपनी १२ सप्टेंबर रोजी एका भव्य कार्यक्रमात विविध उपकरणांचे लाँचिंग करण्यासाठी सज्ज झालेली असून यात आयफोनच्या तीन नवीन आवृत्त्यांसह अन्य उपकरणांची घोषणा होऊ शकते
अॅपल कंपनीने १२ सप्टेंबर रोजी स्टीव्ह जॉब्ज ऑडिटोरियममध्ये एका खास कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यात विविध उपकरणांची घोषणा होणार असल्याची बाब स्पष्ट आहे. प्राप्त माहितीनुसार या कार्यक्रमात आयफोनच्या तीन नवीन मॉडेल्ससोबत आयओएस प्रणालीचे ११वे व्हर्जन, अॅपल टिव्ही, अॅपल स्मार्टवॉच, होमपॉड आदींचे लाँचिंग होऊ शकते.
दशकपूर्तीनिमित्त खास मॉडेल
अॅपल कंपनी आपल्या मेगा लॉचींग कार्यक्रमात तीन नवीन आयफोन सादर करण्याची शक्यता आहे. या संदर्भात विविध लीक्सच्या माध्यमातून माहिती जगासमोर आलेली आहे. यात सर्वात लक्षवेधी ठरणारे मॉडेल हे आयफोन- असेल. या वर्षी आयफोनला बाजारपेठेत दाखल होऊन दहा वर्षे झाली आहेत. या दशकपूर्तीच्या निमित्ताने आयफोन-X हे मॉडेल सादर होऊ शकते. आता गमतीची बाब अशी की, याच कार्यक्रमात आयफोन-८ सादर होणार असला तरी यासोबत आयफोन-९ ऐवजी आयफोन-X ची घोषणा होण्याचे संकेत आहेत. याचे एकमेव कारण म्हणजे हा स्मार्टफोन अॅपल कंपनीच्या आयफोनच्या दशकपूर्तीनिमित्त खास लाँच करण्यात येत आहे. आयओएस-११ प्रणालीच्या बीटा आवृत्तीमधील सोर्स कोडच्या माध्यमातून तंत्रज्ञांनी याचे फिचर्सदेखील शोधून काढले आहेत. याचा विचार करता आयफोन-X या मॉडेलमध्ये ऑल स्क्रीन या प्रकारातील डिस्प्ले असेल. अर्थात यात कडांसाठी जागा सोडलेली नसेल. मात्र सेल्फी कॅमेरा, इयरपीस स्पीकर आणि सेन्सरसाठी याच्या वरील भागात एका कटच्या आकाराची जागा देण्याची शक्यता आहे. यात नवीन होम बटन असू शकते. याच्या डिस्प्लेवर फिंगरप्रिंट स्कॅनर नेमके कुठे असेल? याची माहिती समोर आली नसली तरी या आयफोनमध्ये फेस आयडी हे विशिष्ट फिचर असू शकते. यात चेहर्याने आयफोन लॉक/अनलॉक करण्याची सुविधा असेल. यात आयफोनचा कॅमेरा हा युजरच्या चेहर्याचे थ्री-डी स्कॅन करून त्याला स्मार्टफोन वापरण्याची सुविधा देणार असल्याची माहिती समोर आली आहे. याच्या मदतीने स्मार्टफोन लॉक/अनलॉक करण्याशिवाय सुरक्षितपणे पेमेंट करण्यासह विविध सिक्युरिटी फिचर्सचा वापर करता येणार आहे. यात युजर हा आयफोनच्या डिस्प्लेकडे कधी पाहतोय? याची माहितीदेखील मिळवण्याची प्रणाली देण्यात आलेली असेल.
आयफोन-X या मॉडेलमध्ये अॅनिमोजी म्हणजेच अॅनिमेटेड इमोजीची सुविधा असेल. यात युजर आपल्या चेहर्याच्या विविध हावभावांना थ्री-डी इमोजीचे स्वरूप देऊ शकतो. यात ध्वनीची जोड देण्याची सुविधादेखील असेल. तर यातील कॅमेर्यात डीएसएलआर कॅमेर्याच्या दर्जाच्या प्रतिमा घेता येतील. तसेच याच्या कॅमेर्यात बोके इफेक्टची सुविधाही असू शकते. याची रॅम तीन जीबी तर इनबिल्ट स्टोअरेजसाठी ६४, २५६ आणि ५१२ जीबी असे तीन पर्याय असू शकतात.
आयफोन-८ आणि आयफोन-८ प्लस
याच्या जोडीला अॅपल कंपनी आयफोन-८ आणि आयफोन-८ प्लस हे दोन नवीन मॉडेल्सदेखील सादर करण्याची शक्यता आहे. हे दोन्ही मॉडेल्स आयफोन-७ची पुढील आवृत्ती असेल असे मानले जात आहे. आजवर झालेल्या विविध लीक्सचा विचार केला असता या दोन्ही स्मार्टफोनमध्ये अनुक्रमे ४.७ आणि ५.५ इंच आकारमानांचे डिस्प्ले असण्याची शक्यता आहे. यातील अन्य काही फिचर्स हे आयफोन- नुसार असतील हे स्पष्ट आहे. यात ड्युअल कॅमेरा सेटअप, वायरलेस चार्जींग आदी फिचर्स असू शकतात.