एलजी जी 6 च्या मूल्यात घट, आयफोनच्या आगमनाआधी दर युद्ध सुरू
By शेखर पाटील | Published: September 12, 2017 08:28 AM2017-09-12T08:28:56+5:302017-09-12T08:30:26+5:30
नवीन आयफोन लाँच होण्याआधीच एलजी कंपनीने आपल्या एलजी जी 6 या स्मार्टफोनचे मूल्य कमी केले असून हे मॉडेल आता ग्राहकांना ३७,९९० रूपयात ग्राहकांना खरेदी करता येणार आहे.
12 सप्टेबर रोजी आयफोनच्या तीन नवीन आवृत्त्या लाँच होत असून याच दिवशी सॅमसंग गॅलेक्सी नोट ८ हे मॉडेल भारतीय बाजारपेठेत दाखल होत आहे. या पार्श्वभूमीवर एलजी कंपनीने एलजी जी 6 या आपल्या फ्लॅगशीप मॉडेलचे मूल्य तब्बल १४ हजार रूपयांनी कमी केले आहे. यामुळे स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात एलजी कंपनीने दर कमी करून ग्राहकांना आकर्षीत करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे. एका अर्थाने ही दर युद्धाची नांदी मानली जात आहे.
या वर्षाच्या प्रारंभी झालेल्या मोबाइल वर्ल्ड काँग्रेसमध्ये एलजी जी ६ या मॉडेलचे अनावरण करण्यात आले होते. एप्रिल महिन्यात हा स्मार्टफोन भारतीय ग्राहकांसाठी ५१,९९० रूपयात सादर करण्यात आला होता. मध्यंतरी अमेझॉन इंडिया या शॉपिंग पोर्टलने आपल्या अमेझॉन प्राईम या सेवेच्या ग्राहकांना हे मॉडेल अल्प काळाकरीता सवलतीच्या दरात सादर केले होते. आता सर्व ग्राहकांना ही सवलत देण्यात येणार असून भारतीय बाजारपेठेत एलजी जी ६ हा स्मार्टफोन सर्वांना ३७,९९० रूपयात खरेदीसाठी उपलब्ध करण्यात आला आहे.
एलजी जी ६ मध्ये अनेक उत्तमोत्तम फिचर्स आहेत. या स्मार्टफोनच्या मागील बाजूस प्रत्येकी १३ मेगापिक्सल्स क्षमतांचे दोन कॅमेरे असतील. याच्या मदतीने अतिशय उत्तम छायाचित्रे घेता येतात. यातील दुसर्या कॅमेर्यात १२५ अंशापर्यंत विस्तारीत छायाचित्र घेता येणार आहे. तर ५ मेगापिक्सल्सच्या फ्रंट कॅमेर्यात रेग्युलर आणि वाईड व्ह्यूइंग मोड असतील. यामध्ये अॅडव्हान्स्ड इमेज स्टॅबिलायझेशन फिचर असून फोर-के क्षमतेचे व्हिडीओ चित्रीकरणही करता येणार आहे. मॉडेल वॉटरप्रुफ आणि डस्टप्रुफ आहे. यात क्विकचार्ज ३.० तंत्रज्ञानयुक्त ३३०० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी असेल. तसेच यात फिंगरप्रिंट स्कॅनरही देण्यात आले आहे.
एलजी जी ६ स्मार्टफोनमध्ये ५.७ इंच आकारमानाचा क्युएचडी (१४४० बाय २८८० पिक्सल्स) आणि १८:९ असे प्रमाण असणारा फुल व्हिजन डिस्प्ले आहे. यामध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन ८२१ हा प्रोसेसर प्रदान करण्यात आला आहे. याची रॅम चार जीबी तर ६४ स्टोअरेज असून मायक्रो एसडी कार्डच्या सहाय्याने ते दोन टीबी इतके वाढविणे शक्य आहे. तर या स्मार्टफोनमध्ये गुगल असिस्टंट हा व्हर्च्युअल डिजीटल असिस्टंट प्रदान करण्यात आला आहे.