डोन्ट वरी : स्मार्टफोनवरून फाइल्स डिलीट झाल्या !
By अनिल भापकर | Published: December 28, 2017 04:51 PM2017-12-28T16:51:33+5:302017-12-28T16:55:21+5:30
आता तुम्हाला तुमच्या मोबाईल वरून डिलीट झालेले फोटो आणि व्हिडिओ परत मिळू शकतात . डंपस्टर हे अॅप स्मार्टफोन युझर्स साठी खूप फायद्याचे सिद्ध होत आहे. आता आपण लहान मुलांच्या हातात बिनधास्त स्मार्टफोन देऊ शकतो कारण आता लहान मुलांकडून जर चुकून एखादी फाईल डिलीट झाली तरी आता तुमच्या मदतीला डंपस्टर हे अॅप तारणहार म्हणून काम करेल.
-अनिल भापकर
होय हे खरं आहे ! आता तुम्हाला तुमच्या मोबाईल वरून डिलीट झालेले फोटो आणि व्हिडिओ परत मिळू शकतात . जसे कि कॉम्प्युटरवर काम करताना समजा एखादी महत्त्वाची फाईल चुकून डिलीट झाली तर ती फाईल रिसायकल बिनमध्ये जाते हे आपल्याला माहीत आहे. रिसायकल बिनची ही सुविधा विंडोजच्या अगदी सुरुवातीच्या व्हर्जनपासून तर हल्लीच्या विंडोज व्हर्जन पर्यंत उपलब्ध आहे. म्हणजेच कॉम्प्युटरवर काम करताना चुकून एखादी फाईल डिलीट झाली तरी आपण बिनधास्त असतो. कारण आपल्याला माहिती असते की, ती डिलीट झालेली फाईल आपल्याला रिसायकल बिनमध्ये मिळणार आहे.
मात्र सध्याचे मिनी कॉम्प्युटर अर्थात स्मार्टफोनमध्ये अजून तरी अशी रिसायकल बिनची सुविधा अॅड्रॉईडने दिलेली नाही. त्यामुळे स्मार्टफोन हाताळताना जर चुकून तुमचा एखादा महत्त्वाचा फोटो किंवा फोटोजची संपूर्ण डिरेक्टरी किंवा दुसऱ्या कुठल्या फाईल्स डिलीट झाल्या तर मात्र त्या फाईल्स किंवा फोटोजला आपल्याला कायमचे गमवून बसावे लागते आणि त्यामुळे कदाचित तुमचा संपूर्ण दिवस खराब जाऊ शकतो . हल्लीच्या टच स्क्रीन मोबाइलच्या जमान्यात तर अशा चुकून फाईल किंवा फोटोज डिलीट होण्याची शक्यता फार वाढली आहे. कारण टच स्क्रीन मोबाइल हाताळताना नाजूक धक्क्यानेसुद्धा फाईल डिलीट होण्याचे प्रकारच बरेच वाढले आहेत. स्मार्टफोन लहान मुलंही बऱ्याचं वेळा घेऊन बसतात. या लहान मुलांकडूनही बऱ्याचदा स्मार्टफोनमधील महत्त्वाचा डेटा डिलीट होण्याचा धोका असतो. अशा वेळी हताश होण्याऐवजी आपण दुसरं काहीही करू शकत नाही.पण आता अॅण्ड्रॉईड स्मार्टफोनमध्ये डंपस्टर (dumpster ) या थर्ड पार्टी अॅपच्या मदतीने आपण हा धोका टाळू शकतो.
डंपस्टर अनडिलीट अँड रिस्टोअर पिक्चर्स अँड व्हिडिओ (dumpster ) या नावाने हे अॅप गुगल प्लेवर मोफत उपलब्ध आहे. हे अॅप स्मार्टफोनवर इन्स्टॉल करायचं. यामध्ये तुम्ही ठरवू शकता की काय काय तुम्हाला डंपस्टर करायचे आहे. अर्थात काय काय रिसायकल बिनमध्ये पाठवायचे आहे. जसे की, ईमेजेस, व्हिडिओ, आॅडिओ, डॉक्युमेंट, अदर फाईल्स, अॅप्स आदि सेटिंग या ठिकाणी तुम्हाला कराव्या लागतील. याशिवाय डंपस्टर ऑल हे ऑप्शन केल्यानंतर डंपस्टर सर्व स्मार्टफोन ची काळजी घेईल
डंपस्टर कसं काम करतं?
डंपस्टर अनडिलीट अँड रिस्टोअर पिक्चर्स अँड व्हिडिओ हे अॅप तुमच्या स्मार्टफोनवर इन्स्टॉल झाले की, ते विंडोजच्या रिसायकल बिनप्रमाणे काम करायला सज्ज होते. म्हणजेच तुमचा एखादा फोटो किंवा फाईल डिलीट झाला असता तो आपोआप डंपस्टर अर्थात रिसायकल बिनमध्ये जाऊन पडतो. तुम्ही डंपस्टर ओपन करून पाहिले असता तुम्ही डिलीट केलेला फोटो त्याच्या प्रिव्हूसह तिथे दिसतो. म्हणजेच यापुढे तुमच्या स्मार्टफोनवर तुमच्याकडून चुकून डिलीट झालेल्या सर्व फाईल्स आता या डंपस्टर अर्थात रिसायकल बिनमध्ये येऊन पडतील. आता या डिलीट झालेल्या फाईल्सचे काय करायचे हे तुम्ही ठरवू शकता. म्हणजेच त्या डिलीट झालेल्या फाईल्स रिस्टोअर करायच्या की कायमच्या डिलीट करायच्या. डंपस्टरमध्ये या फाईल्स शेअर करायची सुविधासुद्धा आहे. म्हणजेच या डिलीट झालेल्या फाईल्स तुम्ही फेसबूक, व्हॉटस्अॅप किंवा ब्लूटुथवर शेअर करू शकता किंवा ईमेलसुद्धा करू शकता. कॉम्प्युटरवर विंडोजच्या रिसायकल बिनमध्ये फक्त मुख्य हार्ड डिस्कवरील फाईलच डिलीट झाल्या की रिसायकल बिनमध्ये जातात.अन्य ड्राइव्ह जसे की नेटवर्क ड्राइव्ह, पेन ड्राइव्ह, कार्ड रीडरवरील फाईल्स डिलीट झाल्या असता त्या फाईल रिसायकल बिनमध्ये जात नाहीत मात्र डंपस्टरमध्ये फोन मेमरीमधील फाइल्स सोबतच मेमरी कार्ड वरील फाइल्स जरी डिलीट झाल्या तरी या फाइल्स डंपस्टर अर्थात रिसायकल बिनमध्ये जातात. मात्र जेव्हा मेमरी कार्ड वरील फाइल्स रिस्टोर केल्या जातात तेव्हा त्या फाइल्स मेमरी कार्डवरील मूळ ठिकाणी न जाता फोन मेमरी मध्ये रिस्टोर होतात . डंपस्टर हे अॅप स्मार्टफोन युझर्स साठी खूप फायद्याचे सिद्ध होत आहे. आता आपण लहान मुलांच्या हातात बिनधास्त स्मार्टफोन देऊ शकतो कारण आता लहान मुलांकडून जर चुकून एखादी फाईल डिलीट झाली तरी आता तुमच्या मदतीला डंपस्टर हे अॅप तारणहार म्हणून काम करेल.