फेसबुक मॅसेंजरची मुसंडी, युजर्संची संख्या झाली 170 कोटी
By शेखर पाटील | Published: December 15, 2017 10:57 AM2017-12-15T10:57:34+5:302017-12-15T12:46:34+5:30
फेसबुक मॅसेंजरच्या युजर्सच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली असून याचे आता तब्बल १७० कोटी युजर्स असल्याची अधिकृत आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे.
फेसबुक मॅसेंजर अॅपचे एकूण १३० कोटी डाऊनलोड झाले असून उर्वरित युजर्स संगणकावरून याचा वापर करत असल्याचं कंपनीतर्फे जाहीर करण्यात आलं आहे. फेसबुक मॅसेंजरला आधी स्वतंत्र अस्तित्व नव्हते. २००८ साली याला फेसबुक चॅट नावाने लाँच करण्यात आलं होतं. प्रारंभी याला फक्त वेबवर वापरता येत होतं. यानंतर अँड्रॉइड व आयओएस प्रणालीसाठी याला सादर करण्यात आले. तर गेल्या तीन वर्षांपासून याला स्वतंत्र ओळख देण्यात आली. पहिल्या टप्प्यात फेसबुकच्या अॅपसोबत याला डाऊनलोड करणेदेखील अनिवार्य करण्यात आलं. यामुळे साहजीकच याचे डाऊनलोड वाढले. लवकरच या अॅपने एक अब्ज डाऊनलोडचा टप्पा पार पाडला. अर्थात डाऊनलोड वाढत असतांना याच्या प्रत्यक्ष वापरातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली. यासाठी फेसबुकने युजर्सला मॅसेंजरवरून विविध सुविधा प्रदान केल्या. यात पैशांची आदान-प्रदान करण्याची सुविधेसह विविध गेम्स, इमोजी, व्हिडीओ व व्हाईस कॉलींग, आकर्षक फिल्टर्स आदी देण्यात आल्यामुळे युजर्स मोठ्या संख्येने फेसबुक मॅसेंजरचा उपयोग करत आहेत. अलीकडेच फेसबुकने खास मुलांसाठी स्वतंत्र मॅसेंजर लाँच केला आहे. या पार्श्वभूमिवर, आता हा मॅसेंजर तब्बल १.७ अब्ज म्हणजेच १७० कोटी युजर्स वापरत असल्याची अधिकृत माहिती जाहीर करण्यात आली आहे.
वैयक्तिक आणि सामूहिक या दोन्ही प्रकारातील चॅटिंगसाठी फेसबुक मॅसेंजरचा वापर वाढत आहे. तर अलीकडच्या काळात यावर कृत्रीम बुध्दीमत्ता म्हणजेच आर्टीफिशियल इंटिलेजियन्सने युक्त असणारे चॅटबॉक्सदेखील मोठ्या प्रमाणात अवतरले आहेत. याच्या मदतीने अगदी भन्नाट पध्दतीच्या मनोरंजनासह विविध कंपन्यांना आपल्या ग्राहकांशी थेट संपर्काची स्वयंचलीत यंत्रणा उपलब्ध करण्यात आली आहे. अलीकडेच मॅसेंजरवर विविध चॅटबॉट सर्च करण्याची सुविधादेखील देण्यात आली आहे. फेसबुक मॅसेंजरवरील चॅटबॉट ही बाब अतिशय उत्कंठावर्धक असून यात प्रत्येक क्षणाला नवनवीन बाबींची भर पडत आहे.