व्हॉट्सअॅपवर शेअर करता येणार लाईव्ह लोकेशन, युजर्ससाठी आणलं नवं फीचर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2017 10:33 AM2017-10-18T10:33:08+5:302017-10-18T10:55:38+5:30
व्हॉट्सअॅपने युजर्ससाठी नवं फीचर आणलं आहे. या नव्या फीचरमध्ये आता युजर्स त्याचं लाईव्ह लोकेशन शेअर करू शकतात.
मुंबई- व्हॉट्सअॅपने युजर्ससाठी नवं फीचर आणलं आहे. या नव्या फीचरमध्ये आता युजर्स त्याचं लाईव्ह लोकेशन शेअर करू शकतात. याआधीही व्हॉट्सअॅपवर लोकेशन शेअर करता येत होतं पण त्यातून लाईव्ह अपडेट्स मिळत नव्हते. व्हॉट्सअॅपच्या या नव्या फीचरमध्ये तुम्ही तुमचं लाईव्ह लोकेशन शेअर करू शकणार आहात. या लाईव्ह लोकेशनच्या माध्यमातून एकदा लोकेशन शेअर केल्यावर त्याचे लाईव्ह अपडेट्स लोकेशन ज्या व्यक्तीबरोबर शेअर केलं त्याला मिळतील.
कॉन्टॅक्ट लिस्टमधील एखाद्या व्यक्तीबरोबर लोकेशन शेअर केल्यावर ते नेहमी तुमच्या लोकेशनची माहिती देणार नसून लाईव्ह लोकेशन हे फिचर काही वेळासाठी काम करेल. जर तुम्हाला पुन्हा एखाद्या व्यक्तीला तुमच्या लोकेशनबद्दल माहिती द्यायची असेल, तर पुन्हा एकदा लाईव्ह लोकेशन शेअर करावं लागणार आहे. तुम्ही तुमच्या व्हॉट्सअॅपवरील कुठल्याही ग्रुप किंवा पर्सनल चॅटवर लोकेशन शेअर करू शकता.
लाईव्ह लोकेशनच्या माध्यमातून तुमचं लाईव्ह लोकेशनचे अपडेट्स मिळतील. जर तुमचा कोणाला भेटायचा बेत असेल, तुम्ही कुठे आहात? प्रवासाला कधी सुरूवात करणार आहात? सुरक्षित ठिकाणी आहात की नाही? याबद्दलची माहिती देण्यासाठी या लाईव्ह लोकेशनचा फायदा होणार आहे, अशी माहिती व्हॉट्सअॅपचे प्रोडक्ट मॅनेजर झफीर खान यांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिली आहे.
असं करा लाईव्ह लोकेशन शेअर
व्हॉट्सअॅपच्या चॅट विंडोवर Attach आयकनवर क्लिक करावं लागेल. तिथे लोकेशन शेअर करताना तुम्हाला किती वेळासाठी लाईव्ह लोकेशन शेअर करायचं आहे, त्याची मर्यादा विचारली जाईल. 15 मिनीट, 1 तास आणि 8 तास अशी वेळेची मर्यादा तिथे दाखविली जाईल. हे नवं फीचर व्हॉट्सअॅपच्या नव्या अपडेटबरोबर दिलं जाण्याची शक्यता आहे.