नोकिया आशा मालिकेचे होणार पुनरागमन
By शेखर पाटील | Published: January 19, 2018 11:58 AM2018-01-19T11:58:57+5:302018-01-19T12:03:19+5:30
एचएमडी ग्लोबल कंपनीने आता नोकिया आशा या मालिकेचे पुनरागमन करण्याचे संकेत दिले असून याच्या अंतर्गत विविध मॉडेल्स सादर करण्यात येणार आहे.
एचएमडी ग्लोबल कंपनीने आता नोकिया आशा या मालिकेचे पुनरागमन करण्याचे संकेत दिले असून याच्या अंतर्गत विविध मॉडेल्स सादर करण्यात येणार आहे. कधी काळी लोकप्रियतेच्या शिखरावर आरूढ असणार्या नोकिया कंपनीवर मध्यंतरी कठीण वेळ आली होती. या कंपनीला मोबाइल उत्पादनाच्या युनिटची विक्री करावी लागली. नंतर एचएमडी ग्लोबल कंपनीने नोकिया ब्रँडला पुनर्स्थापित करण्याचे प्रयत्न केले असून यात ते बर्यापैकी यशस्वी झाले आहेत.
एक वर्षाच्या आत एचएमडी ग्लोबलने नोकिया ब्रँडचे फिचरफोन्स आणि स्मार्टफोन्स लाँच केले असून याचे तब्बल १.३ कोटींपेक्षा जास्त मॉडेल्स विकले गेले आहेत. यात अगदी प्राथमिक स्वरूपाच्या फिचरफोन्ससह फ्लॅगशीप म्हणजेच उच्च श्रेणीतील मॉडेल्सचाही समावेश होता. याच पद्धतीनं नोकिया ब्रँड विविध किंमतपट्टयातील मॉडेल्स सादर करण्याच्या तयारी आहे. यासोबत आता नोकिया आशा या मालिकेचेही पुनरागमन होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.
नोकिया आशा या मालिकेतील काही मॉडेल्स २०११ ते २०१३च्या दरम्यान चांगल्या प्रमाणात लोकप्रिय झाले होते. विशेष करून नोकिया आशा ५०१ हे मॉडेल भारतीय बाजारपेठेत चांगले विकले गेले होते. या पार्श्वभूमीवर, एचएमडी ग्लोबल कंपनी या मालिकेला पुनरूज्जीवीत करणार असल्याची माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वीच एमएमडी ग्लोबल कंपनीकडे या मालिकेचा ट्रेडमार्क हस्तांतरीत करण्यात आला असून येत्या काही दिवसात या मालिकेत काही मॉडेल्स लाँच करण्यात येणार असल्याचा अंदाज यातून व्यक्त करण्यात आला आहे.